शुक्रवारी दहावीचा निकाल लागला. सगळेच विद्यार्थी पास झाले याचा आनंद आहे, पण यांचे भवितव्य काय असणार आहे? हा निकाल म्हणजे एकप्रकारची भुरळ आहे असेच वाटते, कारण लाखो विद्यार्थी दहावी पास झाले आहेत. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. कित्येकांनी शंभर टक्के गुणही मिळवले आहेत. त्यामुळेच या सर्वच विद्यार्थ्यांच्या पुढील अकरावी प्रवेशाचे काय होणार ही चिंता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली किंवा प्रवेश परीक्षा घेतली, तर त्या स्पर्धेत कोण टिकेल? ती खरी दहावीची परीक्षा असेल. शंभरपैकी शंभर गुण मिळवणाºया किती विद्यार्थ्यांना यात यश मिळेल हे सांगता येणार नाही, पण जे विद्यार्थी ७0 ते ८0 टक्के मिळवलेले आहेत त्यांचे काय होणार? कमी गुण मिळवून जे पास झालेले आहेत, पन्नास, साठ टक्केवाल्यांचे भवितव्य काय असणार, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन मिळाला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची जी आकडेवारी जाहीर केली आहे, ती आश्चर्यकारक अशीच आहे. मूल्यमापन आणि कोणालाच नापास करायचे नसल्याने खिरापत वाटल्यासारखे मार्क दिले गेले. त्यामुळे दहावीच्या निकालाचा गर्दी रोखण्याचा स्पीडब्रेकर होता तो काढून टाकला गेला. सगळेच सुसाट सुटले. त्यामुळे आता खरा प्रश्न ट्रॅफिक जामचा होणार आहे. त्यावर राज्य सरकारने काय धोरण आखले आहे? सर्वांना पास केले आहे, पण सर्वांना अकरावी प्रवेश मिळणार आहे का? याचे नियोजन कसे असणार आहे? दरवर्षी दहा ते पंधरा टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात तरीही अनेकांना अकरावी प्रवेश मिळत नाही. आता ही वाढलेली दहा ते पंधरा टक्केची गर्दी कुठे ठेवणार आहोत हे शिक्षण विभागाने सांगितले पाहिजे. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे, तो म्हणजे ९९.८४ टक्के. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातल्या इतर विभागांच्या निकालात पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १०० टक्के असा आहे. राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४.६५ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे सर्वच शहरात अकरावी प्रवेशाची समस्या निर्माण होणार आहे. या प्रवेशासाठी फारमोठी आर्थिक उलाढाल करावी लागणार आहे. खाजगी शिक्षण संस्थांकडून विद्यार्थी, पालकांना प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात लुटले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून, त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे, तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून, त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. ही आकडेवारी पाशवी अशी आहे. सर्वांनी यशस्वी झाले पाहिजे, पास झाले पाहिजे, शिक्षणाची संधी प्रत्येकाला असली पाहिजे हे नक्की, पण इतके गुण मिळवूनही विद्यार्थी ज्ञानी झाले आहेत का? शाळांनी आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा, त्याची जाहीरात करता यावी यासाठी अंतर्गत मूल्यांकनात सढळ हस्ते मार्क दिले आहेत हे त्याचे कारण आहे. जे विद्यार्थी जेमतेम ७५ टक्के कसेबसे मिळवू शकतात, त्यांना ९५ टक्के मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता प्रवेशासाठी शिक्षणाचे बाजारीकरण झाले तर आश्चर्य वाटायला नको. हा जो मोहजाळ निर्माण केला आहे त्यावर काहीतरी उपाय होणे गरजेचे आहे. शंभर टक्के विद्यार्थी पास झाले, पण त्यांना पुढे शिकण्याची, प्रवेशाची संधी मिळाली नाही तर त्यासारखा दुसरा अनर्थ कोणताही असणार नाही हे नक्की. आपल्याकडे चांगले मार्क मिळाले की विद्यार्थी सायन्स साईड घेतो, मध्यम मार्क मिळाल्यावर कॉमर्स आणि उर्वरित कला शाखेकडे जातात. अशी परंपरा तयार झालेली आहे. त्यामुळे कला शाखेकडे चांगले गुण मिळालेले विद्यार्थी कधी येत नव्हते. प्रत्येकाला डॉक्टर, इंजीनिअर व्हायचे असल्याने विज्ञान शाखाच निवडली जायची. आता या विज्ञान शाखेकडे जाणाºयांची संख्या किती वाढली आहे याचा विचार करावा लागेल. त्यामुळे या गुणांच्या मृगजळात सामान्य विद्यार्थ्यांना असामान्य मार्क मिळाल्याने एकप्रकारची भुरळ घातली जात आहे असे वाटते, पण काही असो त्यांच्या पुढील शिक्षणाची सोय होणे अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा