२०२० आणि २०२१ ही सलग दोन वर्ष खºया अर्थाने वारी झाली नाही, तरीही ही वारी नित्यनेमाने करणारा आमचा वारकरी मनाने गेले १९ दिवस चालत त्या ‘मानस वारी’चा अनुभव घेत आहे. गेले १९ दिवस सुरू असलेली ही पंढरीची वारी आजअखेर पंढरपुरात येऊन दाखल झाली. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या या विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आणि आपल्या जीवनाचे कृतकृत्य झाले असे समजायचे. हा भोळा भक्तीभाव या वारीत पहायला मिळतो. आमचा वारकरी हा विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तो केव्हाही आसुसलेला असतो. असे असताना आषाढी एकादशीचे असे काही महत्त्व आहे. कोरोनामुळे दोन वर्ष या दिवसाला विठ्ठलाच्या दर्शनाला मुकावे लागले आहे; पण मनाने मात्र आपण सर्व जण पांडुरंगाचे दर्शन घेतले पाहिजे नव्हे तिथे आहोतच.
नेमके काय आहे हे आषाढी एकादशीचे महत्त्व तेही समजून घेतले पाहिजे. आषाढी एकादशीलाच ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या मागचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाºया कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात.
या देवशयनी आषाढी एकादशीचे नेमके महत्त्व आता जाणून घेतले पाहिजे. ज्या दिवसासाठी आमचा वारकरी अत्यंत व्याकूळ झालेला असतो, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतूर झालेला असतो. देवांच्या या निद्राकालात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. त्याची सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. विष्णूला आपला पालनकर्ता, तारणहार किंवा रक्षक म्हटले आहे. त्याचे स्मरण यासाठीच केले जाते. विष्णूची अनेक नामे आहेत, परंतु या दिवशी श्रीविष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्यांना वेळेअभावी किंवा प्रकृती, वयमानानुसार चालत वारी करता येत नाही ते लोक वाहनाने का होईना येऊन पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतात.
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपºयातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो आणि वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.
पुराणातील एका कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल, असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्यांचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो. ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते आणि ते गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला, आहे असे म्हटले आहे.
एका कथेनुसार मृदुमान्य राक्षसाशी विष्णू खूप वेळ युद्ध करत होता. त्या युद्धात विष्णूला झोप आली, म्हणून त्याने गुहेत येऊन झोप घेतली. तेव्हा त्याच्या शरीरातील अकरा इंद्रियांमधील तेजापासून एक शक्ती तयार झाली. त्या शक्तीचे नाव एकादशी. त्या एकादशीने त्या राक्षसाचा वध केला. तेव्हा जागा झालेल्या विष्णूने या एकादशीला वर दिला की, जो कोणी तुझ्या या नावाने उपवास करेल त्याचे रक्षण मी करेन. अशा एकादशीबद्दल अनेक कथा आहेत. थोडक्यात काय तर परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
शास्त्रार्थाने, आयुर्वेद आणि वैद्यक शास्त्रानुसार आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ हा प्रकृतीसाठी जपण्याचा दिवस असतो. यालाच आपल्याकडे चातुर्मास म्हणतात. या काळात व्रते केली जातात. व्रत म्हणजे जागृत राहणे. जागे राहिले, काळजीपूर्वक वागले म्हणजे कोणतेही संकट येत नाही. या जागे राहण्याच्या काळाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासूनची असते. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि तिसरी लाट येऊ नये म्हणून जागृत राहण्याचे असेच व्रत यावर्षी करावे लागणार आहे, म्हणजेच देव झोपले की, आपण जागले पाहिजे. या काळात कांदा, वांगे खाल्ले जात नाही. याचे कारण या काळात ते शरीरास अपायकारक असते, म्हणून त्याचे प्रमाण कमी करायचे असते. देवाला आवडत नाही म्हणून कांदा खायचा नाही, तर तुमच्या शरीराला, पोटाला मानवणार नाही म्हणून तो खायचा नसतो. या काळात जप केला जातो. हा जप नामस्मरणाचा असला, तर तो स्वत:ला जप असेच सांगत असतो. अशा प्रकारे एकादशी, वारी हे जागृती निर्माण करणारे घटक आहेत. जागृती निर्माण करणाºया शक्ती आहेत. त्यांचा सन्मान म्हणजेच भक्ती शक्तीयुक्त, असा वारकरी संप्रदाय. अशी वारी केली की, ती वारंवार करावी असे वाटते. त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्यायची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा