गुरुवार, २९ जुलै, २०२१

जलसाक्षरतेची गरज


आपल्याकडे भरपूर पाऊस आहे, भरपूर पाणी आहे; पण त्याचे नियोजन व्यवस्थित नाही. त्यामुळे आपल्याला पाण्याच्या संकटाला तोंड देण्याची वेळ वारंवार येते. मागचा आठवडा पूर, जलप्रलय अशा परिस्थितीत गेला; पण हे अतिरिक्त पाणी फक्त निचरा करणे, वाया घालवणे याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. धरणात पाणी जास्त झाले की, त्याचा विसर्ग करायचा, तो नाही केला, तर बॅकवॉटरला पूर आणि सोडले की, धरणक्षेत्रातील गावांत पूर. इथून-तिथून धरणाचेही आमच्याकडे संकट होताना दिसत आहे. धरणं बांधायची, पाणी अडवायचे, ते जास्त झाले की, सोडायचे, त्यामुळे अतिरिक्त पाण्याचे नियोजन संचय आपल्याला करताच येत नाही. त्यामुळे मार्च महिना संपला की, सर्वत्र पाण्याची ओरड सुरू होते. निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस पडायला जवळपास अडीच ते तीन महिने असताना, ही धरणे असूनही पाण्याची ओरड, पाणी कपात सुरू होते. हा नियोजनाचा अभाव आहे.


सरकार कुणाचे आहे किंवा सत्ता कोणाकडे आहे यावर पाण्याचे नियोजन अवलंबून नसते, तर ते शासकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. सतत वाढत जाणारी लोकसंख्या, वाढते शहरीकरण, वाढती बांधकामे यामुळे पाण्याचा मेळ घालणे हे सोपे काम नसते; पण अवघड जरी असले, तरी ते अशक्य नसते. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, जलव्यवस्थापन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या जनजागृतीप्रमाणे पाण्याच्या नियोजनाबाबत आपण जागृती निर्माण करू शकलो, तर बºयाच समस्या सुटतील. यासाठी जलसाक्षरतेचा प्रसार होणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात जलशास्त्र यावर संशोधन होऊन तो विषय अभ्यासक्रमात महत्त्वाचा असला पाहिजे.

गणिताला जेवढे महत्त्व आपण देतो, तेवढेच महत्त्व किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व जलशास्त्र, जलनियोजन या विषयांना दिले पाहिजे, कारण भविष्यातील सगळी गणिते ही पाण्यावर मांडली जाणार आहेत. वाढते नागरिकीकरण, वेगाने होणारे औद्योगिकीकरण, पाश्‍िचमात्य जीवनशैलीचे अंधानुकरण, लोकसंख्येचा भस्मासूर, लोकसंख्येचा भार न पेलणारी शहरे, उध्वस्त होत चाललेली ग्रामीण संस्कृती, पाण्याचा प्रचंड गैरवापर, पाण्याचे वाढते प्रदूषण, जलाशयातील पाणी वाटपासंबंधी असलेले ग्रामीण आणि नागरी वाद, नदीच्या पाणी वाटपाचे सर्व स्तरावरील वाद, नागरी विरुद्ध ग्रामीण असा एक वाद, पाण्याचे राजकारण आणि राजकारणासाठी पाणी ही आजच्या जलसमस्येची मूळ कारणे आहेत.


जलस्त्रोतांशी समाजाचे असलेले नाते आजकाल खंडीत झालेले दिसते. पाण्याचे पावित्र्य संपले आहे, नदीचे मातृत्व नाहीसे झाले आहे. आजकाल नद्यांना गटारीचे रूप आले आहे. गटारगंगा हा शब्द रूढ होऊन पवित्र गंगेचे विडंबन होताना दिसत आहे. जलाशयाची समाजमनातील अन्य साधने नष्ट होताना दिसत आहेत. बाव, विहीर, कूप, सागर, पुष्करणी, हे शब्दच आता कालबाह्य वाटू लागले आहेत. पाण्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे अध:पतन होऊन त्याला बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याचे व्यापारी मूल्य वाढत आहे. आपण जलातून जीवन साकारण्याची कल्पनाच विसरून गेलो आहोत. माणूस आणि पाणी यांचे युगानुयुगाचे नाते आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर पुन्हा प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे.

यासाठी जलव्यवस्थापन आणि जलशास्त्राचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत. ग्रामीण संस्कृती म्हणजे आम्हाला कमीपणा वाटतो. शहरी माणूस म्हणजे सुधारलेला, असा भ्रम करून दिला जातो; पण पाण्यासाठी ग्रामीण संस्कृती टिकवली, म्हणजे त्याचे महत्त्व टिकून राहील. आपल्याकडील संस्कृतीत गंगेला फार महत्त्व आहे. किंबहुना पाण्याला प्रतिशब्द म्हणजेच गंगा असाही शब्द रूढ झालेला आहे. विकास गंगा आपण म्हणतो, तेव्हा या गंगाचा शब्द पाण्याशी आहे. ज्ञानगंगा असे म्हणतो, तेव्हा ज्ञानाचा शब्द पाण्याशी आहे. नद्यांचे प्रवाह आणि उगम हे त्यासाठीच फार महत्त्वाचे राहिले आहेत. विविध नद्यांचे आपल्याकडे केले जाणारे उत्सव हे या नद्यांनी आपल्याला भरभरून पाणी द्यावे, यासाठी असतात. प्रत्येक नदीला आपल्याकडे आईची उपमा दिली आहे. गंगामाई, कृष्णामाई, गोदाई, वर्धामाय ही नावे आजकाल नाहीशी होताना दिसत आहेत. नद्यांचे मातृत्व संपल्याने आता निर्जीव पाणी आम्हाला प्यावे लागत आहे. कोणत्या तलावाचा अथवा धरणाचा उत्सव केलेला आपण कधी पाहिलेला नाही. याचे कारण धरणाचा उल्लेख करतानाच त्याची पातळी किती? त्यात डेड वॉटर किती याचा विचार केला जातो. नदी मात्र शेवटच्या थेंबापर्यंत वाहतच राहते. असे वाहणे आणि प्रवाहित होणे हे फार महत्त्वाचे आहे. हे प्रवाहित राहण्यासाठी जलव्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे आहे.


प्रत्येक शाळा, आस्थापना, कंपन्या, फर्ममधून जलव्यवस्थापनाकडे लक्ष दिले गेले पाहिजे. आपल्याकडे असलेला पाण्याचा साठा किती आहे? असणारे कर्मचारी किती आहेत? असलेले विद्यार्थी किती आहेत? त्यांना आवश्यक पाणी किती आहे? आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असेल तर ते वाया न घालवता त्याचा काय वापर करता येईल याचे नियोजन होणे महत्त्वाचे आहे. दररोज नळाला येणारे पाणी ताजे म्हणून भरायचे आणि आदल्या दिवशी शिल्लक राहिलेले पाणी ओतून द्यायचे, असे प्रकार घरोघर घडत असतात. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू लागल्यावर ते वाया जाणारे पाणी किती महत्त्वाचे होते हे लक्षात येते. पैसे असतात तोपर्यंत काही वाटत नाही; पण पैसे खर्च झाल्यावर ज्याप्रमाणे आपण किती अनावश्यक खर्च केला याचा विचार करून काटकसर करतो तोच विचार पाण्याबाबत व्हायला पाहिजे. जलकोष किंवा पाण्याची बँक यांसारखे प्रयोग राबवता आले पाहिजेत. यासाठी सरकारने, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमचे जादा असलेले पाणी दुसºयांना देता आले पाहिजे, त्यातून अर्थार्जन करता येईल काय आणि आपल्या अडचणीच्यावेळी त्यातून आपल्याला पाणी मिळवता येईल काय, याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. आज पाण्याची साठवण कमी होण्याचे कारण, म्हणजे पाणी जमिनीत मुरत नाही हे आहे. शहरे वाढली, खेडी शहरांमध्ये सामील झाली. त्यामुळे डांबरीकरण, काँक्रिटीकरण वाढले. जमिनीत मुरणारे पाणी वाहून जाऊ लागले. आम्ही पेरलंच नाही तर उगवणार कसे? पाणीसुद्धा पेरलं पाहिजे, तरच ते मिळणार आहे, हा विचार कधी आमच्या मनाला सुचला नाही. यासाठी शहरीकरणावर नियंत्रणे आली पाहिजेत. काँक्रिटीकरणावर मर्यादा घातल्या पाहिजेत. खेड्यांकडे जा, याचा अर्थ हा आहे. खेड्यांतील संस्कृती ही समृद्ध संस्कृती आहे, तिचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला, तर जलव्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन याबाबतचे महत्त्व आम्हाला पटेल. जलव्यवस्थापनाच्या अभ्यासाबाबत सरकारने आग्रही राहिले पाहिजे. समाजशास्त्राचा, नागरिकशास्त्राचा, अर्थशास्त्राचा आणि भौतिक, जीव, रसायन अशा सर्व शास्त्रांचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाण्यावर लिहिलं पाहिजे, पाण्याबाबत वाचलं पाहिजे, पाण्यासंबंधी शिकलं पाहिजे, पाण्यासंबंधी शिकवलं पाहिजे, हा दृष्टीकोन रूजवला पाहिजे. तो दृष्टीकोन रूजवला, तर देशात कोठेही हंडा मोर्चे निघणार नाहीत. पाणीदार दृष्टीचे प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी आणि पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटण्यासाठी, पाण्याचे राजकारण संपुष्टात येण्यासाठी जलव्यवस्थापनाचे शिक्षण देण्याची गरज आहे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: