मंगळवार, १३ जुलै, २०२१

कारवाईला कशाला घाबरता?


शनिवारी ईडीने अनिल देशमुखांना तिसº­यांदा समन्स बजावले. त्याविरोधात आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत; पण संपूर्ण राज्याला प्रश्न पडला आहे की, अनिल देशमुख चौकशीला, कारवाईला का घाबरत आहेत? कर नाही त्याला डर कशाला? इडीनं कारवाई करू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालय कशी काय शिफारस करू शकेल? का करावी? अनिल देशमुख जेवढे चौकशीपासून पळतील तेवढा संशयाचा धूर त्यांच्याबाबत वाढत जाईल. आधी कोरोनाचे कारण सांगितले, मग वयाचे सांगितले आणि आता सर्वोच्च न्यायालयात माझ्यावर कारवाई करू नये यासाठी याचिका करणे म्हणजे अप्रत्यक्ष गुन्ह्याची कबुलीच नव्हे का?


किती विचित्र बाब आहे ही. म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने तिसºयांदा समन्स बजावलं आहे. अनिल देशमुखांना ईडीने सोमवारी ५ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तिथेही हजर न राहता ते दिल्लीत गेले. पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दोनच दिवसांचे आहे. या अधिवेशनाला लोकप्रतिनिधी म्हणून हजर राहणे त्यांचे कर्तव्य होते; पण ईडीच्या चौकशीला हजर राहण्याची नोटीस आली. जेव्हा बोलावले तेव्हा गेले नाहीत, त्यामुळे नेमके अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही तारीख पडली, म्हणजे जनतेने ज्या कारणासाठी निवडून दिले त्या कामाकडेही दुर्लक्ष त्यांनी केले आहे. असे लोकप्रतिनिधी निवडून काही उपयोग आहे का? इतकी पाचावर धारण बसल्यासारखे देशमुख घाबरत का आहेत? याचा अर्थच त्यांनी काहीतरी घोळ केला असावा, या संशयाला वाव आहे. त्यांनी सरळ चौकशीला सामोरे जावे आणि सत्य काय आहे ते सांगून मोकळे व्हावे; पण चौकशीला सामोरे न जाता अनिल देशमुखांनी ईडीच्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. ईडीला आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावं, तसंच आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं, असं अनिल देशमुखांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. ही अत्यंत खेदजनक आणि चुकीची गोष्ट आहे. शेण खायचं आम्ही आणि नंतर मला त्याचे वाईट परिणाम नकोत म्हणून प्रार्थना करायची. केलेल्या कर्माची फळं ही भोगावीच लागतील. काही केलं नाही, तर चौकशीला का घाबरत आहात? काय ते खरंखरं सांगून टाका. तुम्हाला हे करायला कोणी भाग पाडलं ते सांगा. तुमच्यावर कोणाचा दबाव होता हे सांगा. माकडीणसुद्धा गळ्याशी आल्यावर आपल्या पिल्लाला पाायाखाली घालते हे वास्तव आहे. त्याप्रमाणे कोणत्या वरिष्ठ माकडाने अनिल देशमुखांचा बळी देण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याचे नाव घ्या. अशीही आता राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. सत्तरी ओलांडली आहे. यापुढे काही मिळेल याची अपेक्षाही नाही. मग खरं बोलून स्वत:ची गेलेली अब्रु अनिल देशमुखांनी परत मिळवावी हेच उत्तम आहे.

ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला कोणी दिला हा प्रश्नच आहे. असं असेल तर उद्या प्रत्येक गुन्हेगार, आरोपी आपण केलेल्या कृत्याबद्दल पोलिसांची कारवाई नको म्हणून न्यायालयात हजर राहील. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची ईडी चौकशी करणार, अशी बातमी आल्यावर कसलेही समन्स आलेले नसताना शरद पवार उठले आणि थेट ईडीच्या कार्यालयातच गेले. करा माझी चौकशी म्हणाले. आपल्या नेत्याचा हा बाणेदारपणा अनिल देशमुख का बाळगू शकत नाहीत? ईडीच्या चौकशीला राज ठाकरेही हजर राहिले होते. चौकशी करण्याचा अधिकार अशा यंत्रणांना आहे. चौकशी करणे याचा अर्थ दोषी आहे असे होत नाही; पण आपली चौकशी केली आणि त्यातून सत्य बाहेर पडले, तर कारवाई होईल ही जी भीती अनिल देशमुखांना वाटते आहे तिथेच पाणी मुरते आहे, कारण त्यांना कदाचित हे करण्यास दुसº­या कोणी भाग पाडले असेल. त्यांची नावे घ्यावी लागतील. त्यामुळे अशा व्यक्ती चौकशीला जाऊ नकोस, पळून जा असे सल्ले देत असावेत. अनिल देशमुख म्हणतात, माझ्याविरुद्ध सुरू असलेली कारवाई कायद्याला धरून नाही, पूर्वग्रहदूषितपणे सुरू असल्याचे मला जाणवत आहे. त्यामुळे माझ्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मला जे घटनात्मक अधिकार आहेत त्याचा वापर मला करता येईल, अशी अपेक्षा आहे, म्हणजे अनिल देशमुखांना अधिकाराची हक्काची जाणिव आहे; पण कर्तव्याचा पुरेपूर विसर पडला आहे, असेच म्हणावे लागेल. आज त्यांचे कर्तव्य ईडीला, पोलिसांना सहकार्य करण्याचे आहे. समन्स मिळाल्यावर अनिल देशमुख शनिवारीच दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी कायदेतज्ज्ञांची भेट घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुखाची ईडी चौकशी करणार आहे. या आधी ईडीने अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर छापाही मारला होता. त्यांच्या दोन पीएंनी याची कबुलीही दिली होती. त्यामुळे अनिल देशमुख घाबरले आहेत. अनिल देशमुख यांची अटक ही अटळ आहे हे सर्वांनी ओळखले आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या चौकशीत आपली नावे येऊ नयेत, म्हणून त्यांना असे भरकटवले जात असावे. अनिल देशमुख यांची होत असलेली पळापळ, चौकशीला सामोरे जाण्याचे नसलेले त्यांचे स्वरूप हीच त्यांची गुन्ह्याची अप्रत्यक्ष कबुली आहे. त्याचप्रमाणे अनिल देशमुख आपले नाव घेऊ नये, यासाठी काही वरिष्ठ शक्ती भांबावल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयात पाठवले जात असावे हे स्पष्ट होत आहे. ते जेवढी चौकशीला जाण्याचे टाळतील तेवढा संशयाचा धूर वाढत जाईल आणि त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार होतील यात शंका नाही.


या आधी ईडीने अनिल देशमुखांना दोनदा समन्स बजावलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढतं वय ही कारणं पुढं करून अनिल देशमुखांनी ईडीला सध्यातरी चौकशी करू नये किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चौकशी करावी अशी विनंती केली होती, तसेच देशमुखांनी ईडीकडून ५ जुलैपर्यंतची वेळ मागितली होती; पण ही टाळाटाळ त्यांना अधिक अडचणीत आणणार आहे. त्यांना जर आपल्यावरचा कलंक पुसायचा असेल, तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे आणि आपल्याला हे दुष्कृत्य कोणी करायला सांगितले त्याचे नाव घ्यावे आणि मोकळे व्हावे हेच उत्तम.

5 july

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: