गुरुवार, २९ जुलै, २०२१

पेगाससचे बुमरँग


एखादे शस्त्र आपण वापरतो; पण ते आपल्यावरच बुमरँगसारखे उलटणार नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. आपण पाळलेले कुत्रे कितीही प्रामाणिक असले, तरी ते आपल्याला चावणारच नाही असे नाही. किंबहुना ते चावतेच. अगदी तोच प्रकार या अधिवेशनाच्या तोंडावर मोदी सरकारबाबत झालेला दिसून येत आहे. मोदी सरकारचे अधिवेशन म्हणजे काहीतरी नवीन कामगिरी करणार आणि काही महत्त्वाची विधेयके पास करणार आणि त्याची देशभर हवा होणार, असा काही अधिवेशनातला अनुभव असताना या अधिवेशनात मात्र मोदी सरकारची पूर्णपणे कोंडी झालेली दिसून येत आहे. असं म्हणतात की, मोदी सरकारला सगळा देशच नियंत्रित करायचा आहे. अर्थात हा जो त्यांच्यावर सतत आरोप होतो आहे, त्याला पाठबळ देणारा एक गौप्यस्फोट दोन दिवसांपूर्वी झाला आणि त्यातून मोदी सरकारला पहिल्यांदाच कोंडीत पकडायची विरोधकांना संधी मिळाली. ते प्रकरण म्हणजे हे पेगाससचे प्रकरण आहे. पेगासस हे इस्रायली हेरगिरीचे तंत्रज्ञान असून, ही हेरगिरी मोबाइल फोनच्या माध्यमातून केली जाते, म्हणजे या यंत्रणेद्वारे तुम्ही कोठे आहात, कोणाशी काय बोलत आहात येथपासून तुम्ही पाठवलेले किंवा तुम्हाला आलेले संदेश, ई-मेल याची सर्व इत्यंभूत माहिती मिळवता येते.


मोदी सरकारने हे तंत्रज्ञान इस्रायलकडून घेऊन त्याद्वारे भारतातील तीनशे जणांच्या फोनवर पाळत ठेवली होती व त्यांचा सारा व्यक्‍ितगत तपशील सरकारने अनधिकृतरीत्या गोळा करून हेरगिरीचा कळस केला असल्याचा आरोप होत आहे. ही बाब भारतातील कोणा विरोधी पक्ष नेत्यांनी उघड केलेली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांच्या एका समूहाने उघड केली आहे. त्या प्रकरणात सारवासारव करताना सरकारची मोठीच तारांबळ उडालेली दिसून आली. सरकारने या आरोपाचा तातडीने इन्कार केला असला, तरी तो परिणामकारक नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: अमित शहा यांना या प्रकरणात खुलासा द्यावा लागला आणि भारताची प्रगती ज्यांना बघवत नाही अशा देशविघातक शक्‍तींनी रचलेले हे कुभांड आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या विविध नेत्यांनी ठिकठिकाणी याबाबत माहिती देण्याचा प्रकार केला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले नाही, त्यामुळे भाजपला पत्रकार परिषदा घेऊन सांगण्याची ही नामुष्की आली. म्हणजेच संसदेत स्पष्ट बहुमत असतानाही विरोधकांनी कामकाज बंद पाडले हे फारच धक्कादायक म्हणावे लागेल.

पण यातील जे नवनवीन तपशील हाती येत आहेत, त्यातून सरकारच्या सहभागाची बाब अधिकच ठळकपणे समोर आली आहे. यातला एक लक्षणीय मुद्दा असा की, हे तंत्रज्ञान इस्रायल कोणाही खाजगी संस्थांना विकत नाही. ते केवळ एखाद्या सरकारलाच विकत घ्यावे लागते. त्यामुळे भारतात, जर या यंत्रणेचा वापर करून हेरगिरी झाली असेल, तर ती सरकारनेच केलेली असू शकते ही बाब स्पष्टपणे लोकांपुढे आली आहे. एखाद्या फोनमध्ये गुप्तपणे हेरगिरी करणारी यंत्रणा कार्यरत आहे की नाही, याची शहानिशा फॉरेन्सिक पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे ज्या-ज्या व्यक्‍तींवर पाळत ठेवली गेली आहे त्यातील काहींनी आपल्या फोनची अशा प्रकारे तपासणी करून घेतली आहे, त्यात अशा हेरगिरी करणाºया यंत्रणेचा वापर झाला आहे, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने केवळ इन्कार केल्याने हे प्रकरण आता शांत होण्यासारखे नाही. अर्थात हेरगिरी केली म्हणून विरोधकांनी इतके का भ्यावे लागले हा प्रश्न आहेच. देशविघातक कृत्य करणाºयांना आपली हेरगिरी होत असेल, तर काळजी करायला पाहिजे. विरोधक इतकी भीती का बाळगत आहेत, हे पण अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीकडून काही देशविघातक कृत्य होत असेल, तर त्याची हेरगिरी करणे, पाळत ठेवणे स्वाभाविक आहे. आता काँग्रेसचे काही नेते, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह यांच्यासारखे लोक पाकिस्तानला मदत करू पाहतात. ३७० कलम रद्द करण्यासाठी पाकिस्तानचे समर्थन करतात. अशांची हेरगिरी होणे आवश्यकच आहे; पण जे कांगावा करत होते, भाजपवर टीका करत होते, त्यांची कोणी हेरगिरी केली असण्याची सूतराम शक्यता नाही; पण टीका करण्यासाठी वक्तव्ये करत रहायचे. केली हेरगिरी म्हणून बिघडलं कुठं? काही सापडणारच नसेल, तर घाबरायचं कारण काय? आज संपूर्ण जग हे दशहतवादाच्या सावटाखाली आहे. हा दशहतवाद पोसण्याचे काम कुणी करत असेल आणि त्याची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी सरकार काही करत असेल, तर त्यांच्या तपासाचा भाग असू शकतो. संशयीत म्हणून कोणत्याही तपास यंत्रणेला कोणाचीही चौकशी करायचा हा अधिकार आहे. त्यामुळे विनाकारण कांगावा करण्याचे कामही विरोधकांनी करता कामा नये. आमची प्रायव्हसी, सिक्रेट जातील याची नाहक चिंताही करण्याचे कारण नाही. हेरगिरीत तुमच्या नग्नावस्थेला काहीही महत्त्व नसते, खाजगी आयुष्यात काय करत आहात याच्याशी काही देणे-घेणे नसते, देशविघातक काही करत असाल, तरच त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आपण जर कोणतेही देशविघातक कृत्य करत नाही, तर हेरगिरी झाली, म्हणून चिंता करण्याचे कारण काय? आता प्रत्येक रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतात, दुकाने, मॉल, सार्वजनिक ठिकाणी असतात. हे तपासाचे, हेरगिरीचेच भाग आहेत. माणसांना चुका करताना रेड हँड पकडण्याची ती साधने आहेत. त्यामुळे त्याची चिंता विरोधकांना का वाटते? उलट याला विरोध करून हे हत्यार बुमरँगसारखे विरोधकांवरही उलटू शकते हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: