माणसं एकत्र येतात, हेवेदावे सोडून एक होतात, ही आपली संस्कृती आहे, पण ही संस्कृती आता राजकारणात पुन्हा एकदा रुजताना दिसते आहे हे अतिशय चांगले आहे. पुन्हा असे म्हणण्याचे कारण असे की, पूर्वी आपल्याकडे लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करण्याची, त्यांच्या विचारांचा आदर करण्याची प्रवृत्ती होती, पण गेल्या काही दिवसांपासून त्या संस्कृतीला हरताळ फासला होता. विशेषत: कायम सत्तेत राहणाºया काँग्रेसला सत्तेपासून दूर जावे लागल्यापासून ही संस्कृती लयाला गेली होती. सभागृहात चांगल्या दर्जेदार चर्चा होणे बंद झाले आणि सभागृहाबाहेर दंगे करण्याचे, माध्यमांना सामोरे जाण्याचे प्रमाण वाढले, पण हे दूषित होणारे वातावरण सध्या समंजस राजकारण्यांनी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
महाराष्ट्रावर संकट कोसळल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आस्थेने चौकशी केली, त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन करून दिलासा दिला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रात जे सामंजस्याचे राजकारण पहायला मिळाले ते निश्चितच कौतुकास्पद असे म्हणावे लागेल. यामध्ये कोल्हापूरच्या घटनेचा उल्लेख करावा लागेल. कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी दौरा होता. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर दौºयावर आहेतच. शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना जेव्हा देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात शाहुपुरीत आहेत हे समजले तेव्हा त्यांनी आपण होऊन त्यांना फोन लावला आणि कळवले की, आपण हा पाहणी दौरा एकत्रित करू, प्रशासनावरही त्यामुळे ताण पडणार नाही आणि जनतेच्या हिताचे काम होईल. याला लगेच सकारात्मक प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पाहणी दौरा केला. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत समंजसपणाची बाब होती. परस्परांचा मान राखण्याची, आदर करण्याची आणि मतांची कदर करण्याची ही जी संस्कृती पुन्हा इथे रुजते आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बाब आहे.
सत्ताधारी आणि विरोधक हे काही परस्परांचे शत्रू नसतात. ते लोकशाहीचे पहिले दोन खांब असतात, पण गेल्या काही दिवसांत लोकशाहीच्या या तत्त्वाला काळीमा फासण्याचे काम होत होते. ते बदलून समंजस लोकशाहीचे वातावरण तयार करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे विरोधकांचा आदर करण्याची फारमोठी परंपरा आहे. पंडित नेहरूंनी अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक करणे, भारत-पाक युद्धानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा दुर्गा म्हणून गौरव करणे, आॅपरेशन ब्ल्यू स्टारनंतर भाजपकडून इंदिरा गांधींचे कौतुक करणे, राजीव गांधींनी अटलजींचा मान राखणे ही फक्त काही उदाहरणे आहेत, पण त्या परंपरेचे पालन आता पुन्हा होताना दिसत आहे हे फार महत्त्वाचे आहे. जनतेला हेच हवे आहे.
आज सामान्य माणसांना राजकारणातील चिखलफेक नको आहे. लोकशाहीचे मंदिर जे आहे त्या सभागृहात चांगल्या चर्चा, चांगली भाषणे होणे जनतेला अपेक्षित आहे. लोकशाही रुजवण्याचे काम होणे आवश्यक आहे, पण गेल्या काही वर्षांत विरोधकांनी कामकाज होऊ द्यायचे नाही, सरकारने कुठेतरी हट्टीपणा करायचा, असले प्रकार वाढीस लागले आहेत. पूर्वीच्या काळातील नेत्यांची सभागृहातील भाषणे ही सभागृहासाठी पर्वणी असायची. यशवंतराव चव्हाण, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, त्यानंतर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, नारायण राणे अशा नेत्यांनी सभागृहात दीर्घकाळ भाषणे करून वाहवा मिळवली आहे, पण आजकाल सभागृहात चर्चा न होता गोंधळ होतो. फक्त टीका, चिखलफेक होताना दिसते. यामुळे सामान्य जनता कुठेतरी दुखावताना दिसते आहे. हे सगळे प्रकार जनतेला नको आहेत. सामान्य जनतेने नेत्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात पाठवले आहे, पण तिथे होणारा गोंधळ, यातून काहीच काम होताना दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आज सकारात्मक विचारांचे नेते उद्धव ठाकरे, त्याला प्रतिसाद देणारे देवेंद्र फडणवीस अशी पिढी हे वातावरण बदलू शकेल यात शंका नाही.
जनतेच्या दृष्टीने दोघांचेही महत्त्व सारखेच आहे. त्यामुळे परस्परांचा आदर राखून केलेले सामंजस्याचे राजकारण हे जनतेला अभिप्रेत असलेले राजकारण आहे. एकूणच महाराष्ट्रातील आलेल्या संकटग्रस्त परिस्थितीने हे वातावरण बदलण्याची संधी निर्माण केली असेच म्हणावे लागेल. संकट काळात एकत्र आले त्याप्रमाणे राज्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी या दोघांनी पुन्हा एकदा सामंजस्याचे राजकारण करून एकत्र आले पाहिजे. एकत्र याचा अर्थ सरकार स्थापन करणे असे नाही, पण राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे. तसेच कोरोना लॉकडाऊनच्या काळात फार मोठा फटका सेवा क्षेत्राला बसला आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक विकासकामे रखडली आहेत. महाराष्ट्रातील चित्रपट उद्योग, कलाकार यांचे असंख्य प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी असेच एकत्र आले पाहिजे, तर खºया अर्थाने लोकशाहीची बूज राखली गेली, असे म्हणता येईल.