सध्या राज्यात जनहितापेक्षा फक्त राजकारणाचा उत आलेला दिसून येत आहे. राज्यकर्ते कसे चुकीचे वागत आहेत, हे दाखवण्यासाठी विरोधक आणि विरोधक कसे मुर्ख आहेत हे भासवण्यात सत्ताधारी वेळ घालवत आहेत. यात जनतेचे अपार नुकसान होत आहे. जनतेला घरात बसवून ठेवले आहे त्याचा गैरफायदा सत्ताधारी आणि विरोधक घेताना दिसत आहेत. त्यासाठी सध्या राज्यात आरक्षण विरुद्ध लसीकरण, असा सामना सुरू झाला आहे. या राजकारणात आरक्षणाचा आणि लसीकरणाचा बोºया वाजला आहे.
लसींच्या तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. याचे नेमके कारण काय आहे हे जाणून न घेता किंबहुना माहिती असूनही केवळ केंद्रावर ठपका ठेवण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष हे तुटून पडत आहेत. लसीकरणाचे नियोजन चुकले, घाई केली, निर्यातच का केली वगैरे वगैरे. त्यावरून भाजपच्या नेत्यांना बोलतं करायचा प्रयत्न सरकारी पक्ष करताना दिसत आहे, तर त्याला उत्तर देण्यासाठी मराठा आरक्षणाचे हत्यार विरोधकांनी उचललेले दिसते. राज्य सरकारने न्यायालयात नीट बाजू न मांडल्यामुळे न्यायालयाने आरक्षणाचा कायदाच रद्द केल्याचा दावा विरोधक करत आहेत.
आज वेळ काय आहे, परिस्थिती काय आहे, सर्वसामान्य जनता कशी अडचणीत आहे याचा कसलाही विचार न करता भाजप आणि काँग्रेसचे नेते पत्रप्रपंच करण्यात गुंतले आहेत. शनिवारचा दिवस तर माश्या मारण्याच्या विषयावरून वाया घालवला. ही राजकारणाची वेळ आहे का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून शिवसेना आणि राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या हातात सत्तेची चावी आहे, रिमोट आहे हे भासवून महाविकास आघाडीचे प्रमुखपद शरद पवारांकडे आहे ना शिवसेनेकडे आहे, असे भासवण्यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहून सरकारचा कारभार कळवला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील, संभाजीराजे आदी नेते मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झाले आहेत. हे आरक्षण रद्द होण्यास हे सरकार कारणीभूत असल्याचे बिंबवण्यासाठी चंद्रकांत दादा पुढाकार घेत आहेत.
तुमचा लसीकरणाचा कार्यक्रम फसला, लसीकरणाचे नियोजन चुकले यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आक्रमक झाली आहे, तर त्याचा आवाज बंद करण्यासाठी भाजपने मराठा आरक्षण कसे तुमच्यामुळे मिळू शकत नाही हे दाखवण्यासाठी वक्तव्ये करत आहेत. यात सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे कुणीच लक्ष देत नाही. आज नोकरभरती थांबली आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. परीक्षा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. करिअरच्या उंबरठ्यावर अनेक जण अडकून पडले आहेत. याचे कोणालाही भान नाही. सरकारला सत्ता टिकवण्याची, तर विरोधकांना सत्ता खेचण्याची घाई झाली आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण आणि मराठा आरक्षण या दोन तलवारी उपसून सत्ताधारी आणि विरोधक लढत आहेत. हे या राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.
खरं तर आता लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने होणार आहे, असा विश्वास देण्याची गरज आहे. स्फुटनिकची लस येणार आहे. डिसेंबरपर्यंत २१६ कोटी लसींचा पुरवठा होणार आहे. याचा अर्थ शंभर कोटी जनतेला त्याचा लाभ मिळू शकतो. इतक्या मोठ्या देशात शंभर कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी सहा-सात महिने लागणे स्वाभाविक आहे. आजपर्यंत १८ कोटी जनतेचे लसीकरण झालेले आहे. असे असताना त्यात राजकारण करण्याची काहीच गरज नाही. १८ वर्षांच्या पुढच्यांना लसीकरण देण्याचा आग्रह राज्य सरकारने केला. त्यात लसींचा पुरवठा किती होतो आहे, दुसºया डोसचे लोकांनी काय करायचे याचा कसलाही अभ्यास न करता १ मे ही तारीख जाहीर केली गेली. आता १८ वर्षांपुढच्या जनतेनला अजून थांबावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यात तिसºया लाटेची भीती घातली जात आहे. हे सगळे कशासाठी चालले आहे? सर्वसामान्य जनतेला समजते आहे की, नियोजन कुणाचे चुकते आहे. केंद्राकडून होणारा लसीचा पुरवठा अनियमीत आहे; पण तो उत्पादन अपुरे असल्यामुळे आहे. तरीही देशात सर्वात वेगवान लसीकरण महाराष्ट्रात झालेले आहे. जर महाराष्ट्रावर केंद्राला अन्याय करायचाच असता, तर उत्तर प्रदेश किंवा गुजरातमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले असते; पण केवळ राजकारणासाठी केंद्राच्या नावाने ओरडायचे धोरण सत्ताधाºयांनी बाळगले.
तर यावर काहीही न बोलता मराठा आरक्षणाबाबत सरकार कसे कमी पडले, बाजू कशी नीट मांडली नाही हे ठसवण्यात विरोधक गुंतले आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालावर एकत्र बसून काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, केंद्राला त्याबाबत कायदा करणे भाग पाडू आणि हे आरक्षण मिळवून देऊ, असे सांगण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी करायला पाहिजे. सरकारने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हातात हे असल्याचे दाखवून दिले आहे. तर त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही पंतप्रधानांकडून हे काम करूनच घेऊ, असे सांगण्याचे धारीष्ठ्य फडणवीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील आदी भाजप नेते का दाखवू शकले नाहीत? त्यामुळे फक्त लसीकरण विरुद्ध आरक्षण, असा सामना करायचा हेच काम सध्या राज्यात दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा