आयपीएलचा २०२१चा हंगाम घेणे ही काहीच गरज नव्हती. नुकताच दोन-तीन महिन्यांपूर्वी गेल्यावर्षीचा हंगाम झाला होता. भारतात खेळवता आला नाही म्हणून तो दुबईला खेळवला गेला; पण त्यानंतर लगेचच पुढचा हंगाम वेळेत सुरू करण्याची घाई केली; पण त्याचे दुष्परिणाम दिसून आल्यावर ही स्पर्धा अर्ध्यात सोडून देण्याची नामुष्की आली. हा अट्टाहास कशासाठ होता? क्रिकेटसाठी की क्रिकेटच्या नावावर चालणाºया जुगारासाठी? पण हा जुगार अर्ध्यावर सोडला हे एका अर्थी बरे झाले. जुगाराच्या या पटावर खेळाडूंचे आयुष्य पणाला लावले गेले होते.
खरं म्हणजे देशात कोरोनामुळे दररोज हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना, आयपीएलचा धुरळा सुरू राहणे ही खरोखरच दुर्दैवी बाब होती. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी बाजारपेठा बंद असताना दुसरीकडे आयपीएलचा जल्लोष कानावर पडत होता. अर्थात, करोनाच्या प्रत्येक लाटेबाबत नागरिकांना सजग केले जात असताना, आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू आणि आयोजकही संपूर्णपणे अलिप्त कसे राहू शकतात, असा प्रश्न आहे. शेवटी जसजशी खेळाडूंना लागण होते आहे असे दिसू लागले आणि परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आला, तेव्हा बाकीच्या देशांच्या दबावामुळेही स्पर्धा स्थगित केली गेली. मुळात इतक्या लवकर त्याचे आयोजन करणे चुकीचे होते. काही आवश्यकता नव्हती; पण या आयपीएलवर चालणाºया सट्टा बाजाराच्या जोरामुळे हा अट्टाहास करण्यात आला का?, असा प्रश्न पडतो; पण त्यामुळे चांगले खेळाडू बळीचे बकरे बनवले गेले त्याचे काय? जर लागण झालेल्या एखाद्या खेळाडूच्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तर काय? जनपळ भर म्हणतील हाय हाय अशीच अवस्था होणार ना?
यावर्षीच्या स्पर्धा सुरक्षितरीत्या होत असल्याचा आयोजकांकडून वारंवार दावा केला जात होता. बायोबबल म्हणजेच जैव सुरक्षित वातावरण तयार केल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका राहत नाही; परंतु काही दिवसांपासून काही संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बायोबबलदेखील कोरोनाला रोखू शकत नाही, हे सिद्ध झाले. साहजिकच आयोजकांनी आयपीएलचे सामने अनिश्िचत काळासाठी स्थगित केले. सर्वात अगोदर कोलकाता नाइट रायडरच्या दोन खेळाडूंना बाधा झाली आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली; परंतु जगभरात आणि विशेषत: भारतात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आयपीएलचे आयोजक आणि खेळाडूंना या स्थितीची काहीच माहिती नव्हती का? किंवा कोरोनाचे गांभीर्य समजले नव्हते का, असा प्रश्न पडतो. बायोबबल नावाच्या सुरक्षा यंत्रणेचा दाखला वारंवार दिला जात होता. मग अचानक खेळाडूंना कोरोनाची लागण कशामुळे झाली. कोरोनाचा विषाणू कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही वेळी तुमच्यावर हल्ला करत आहे. असे असताना आयपीएलमध्ये सामील झालेले खेळाडू आणि सर्व कर्मचारी, कामगार हे बायोबबलच्या जिवावर किती दिवस सुरक्षित राहतील? आता कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे खापर बीसीसीआय किंवा अन्य संस्थांवर फोडले जाणे स्वाभाविक आहे आणि ही त्यांची जबाबदारी आहे. बायोबबल कुठे कुठे लावणार होते हे संयोजक? फक्त स्टेडियमवर बायोबबल लावून सामना सुरक्षित होईल; पण खेळाडू अन्यत्र फिरत असतात, राहण्याचे ठिकाण, त्यांची निवासाची केलेली व्यवस्था हे काही बायोबबलमध्ये घेणे शक्य नव्हते. त्यामुळे कारण नसताना सुरक्षिततेचे दावे करून ही स्पर्धा आयोजित केली आणि त्याची फजीती झाली. पण निदान उशिराने शहाणपण सुचले आणि त्या अर्ध्यात सोडून रद्द केल्या गेल्या हे योग्यच झाले. आयपीएल रद्द झाल्याने कोणाचे काही नुकसान होण्याची शक्यता नाही. झालेच तर मूठभर आयोजकांचे होईल; पण त्यांना हे नुकसान म्हणजे दर्या में खसखस असेच आहे; पण यामुळे जर उद्रेक झाला असता, तर वाईट झाले असते.
लाजिरवाणी बाब म्हणजे देशात दररोज साडेतीन ते चार लाख लोक बाधित होत असताना आणि आॅक्िसजनअभावी हजारो लोकांचा मृत्यू होत असताना, सर्वत्र शोकाकुल वातावरण असताना आयपीएलचा जल्लोष सुरू राहतो ही बाब खूपच खेदजनक आहे. खेळाडू आणि आयोजकांना देशातील भयावह स्थितीचा अंदाज कसा आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. देशातील हजारो नागरिक कोरोना खर्चाचा भार सहन करू शकत नसल्याचे चित्र आहे. औषध आणि आॅक्िसजन न मिळाल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी आयपीएलमध्ये पैशांचा महापूर वाहत होता. आयपीएलचे आयोजन केल्याने बीसीसीआयवर प्रचंड टीकेची झोड उठली; परंतु त्याची त्यांनी तमा बाळगली नाही. बाहेरच्या देशातील खेळाडू भारताला आर्थिक मदत करत होते. त्यानंतर या स्पर्धा रद्द केल्यानंतर अनेक खेळाडू मदत करण्यासाठी पुढे आले; पण तोपर्यंत ते या जुगाराच्या सोंगटीप्रमाणे पडणाºया दानासारखे पळत होते.
स्पर्धेच्या प्रारंभी कोविडची लाट अधिक पसरली नव्हती, परंतु स्पर्धा सुरू झाल्यानंतर संसर्ग पसरण्याला वेग आला. आयपीएलवर टीकेची धार आणखी तीव्र होण्यामागे आॅस्ट्रलियन खेळाडूची टिप्पणी कारणीभूत ठरली. त्यांनी भारतातील कोरोनाच्या स्थितीवरून काळजी करण्यास सुरुवात केली आणि काही खेळाडूंनी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात खेळाडू आणि बीसीसीआयचे संबंध पाहता भारतीय खेळाडू बीसीसीआयला तीव्र विरोध किंवा सल्ला देऊ शकत नाहीत, परंतु एकानंतर एक खेळाडू आणि सहकारी आजारी पडू लागले तेव्हा बीसीसीआयकडे स्पर्धा रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नाही; हे वरातीमागून घोडे असाच प्रकार होता; पण त्या स्पर्धा रद्द केल्या हे बरे झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा