१९७०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत एका दमदार अभिनेत्रीचे पदार्पण झाले. तो काळ तमाशाप्रधान चित्रपटांचा होता. त्यामुळे लावणी नृत्य हा मराठी चित्रपटाचा अविभाज्य भाग होता. या काळात दादा कोंडके यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि सोंगाड्यातून आपली नायिका म्हणून उषा चव्हाणला समोर आणले. दादा आणि उषा चव्हाण यांचे अनेक चित्रपट झाले. त्यामुळे दादा कोंडके म्हटले की, त्यांच्या जोडीने उषा चव्हाणचे नाव यायचे. उषा चव्हाण ही दादांमुळे मोठी झाली, असा समज झाला होता; पण दादांशिवायही उषा चव्हाणने स्वत:च्या जोरावर अनेक नामांकित चित्रपट दिलेले आहेत.
दादा आणि उषा चव्हाण यांच्यात दरार निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेला चित्रपट म्हणजे सचिन पिळगांवकर यांचे वडील शरद पिळगांवकर यांनी निर्माण केलेला नाव मोठं लक्षण खोटं हा चित्रपट. अरुण सरनाईक, धुमाळ असे दिग्गज असलेल्या या चित्रपटाची नायिका होती उषा चव्हाण. यात तिचा नायक होता बाळ धुरी. जबरदस्त कथानक आणि हिट गीते यांनी हा चित्रपट तुफान चालला. यातील गाणी आजही सुपरहिट या गटात आहेत. विशेष म्हणजे या रावजी, बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजी ही लावणी उषा चव्हाण हिच्यावर चित्रीत झालेली आहे. मंगेशकरांची आणि चव्हाणांची अशा दोन उषांनी हे गाणं अजरामर केलेले आहे. या गाण्यावरच पंचवीस वर्षांनी सुरेखा पुणेकर हिचा सोळा हजारात देखणी हा कार्यक्रम हिट झाला. दादांशिवाय मी चालू शकते हे उषाने या चित्रपटातून दाखवून दिले त्याचा राग दादांनी काढला आणि तुमचं आमचं जमलंमध्ये अंजनाशी जमवलं आणि उषा चव्हाणशी जमलं नाही, हे दाखवलं.
दादांना सोडून उषा चव्हाणने दिलेला आणखी एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चोरावर मोर. हा पण सचिन प्रस्तुत शरद पिळगांवकर यांचाच चित्रपट होता. मुरलीधर कापडींचे त्याला दिग्दर्शन होते. यात उषा चव्हाणचा डबलरोल होता. जी पी सिप्पी रमेश सिप्पींच्या सीता और गीताशी मिळता जुळता हा चित्रपट ग्रामीण ढंगात तयार केला होता. यात अशोक सराफ आणि रवींद्र महाजनी हे दोन नायक उषा चव्हाणबरोबर होते; पण नायिकाप्रधान असलेल्या या चित्रपटात उषा चव्हाणने धमाल उडवून देत आपणही हिंदीतील हेमा मालिनीपेक्षा काहीच कमी नाही हे दाखवून दिले होते. उषा चव्हाण दादांशिवाय सुपरहिट चित्रपट देऊ शकते हे तिने पुन्हा इथे दाखवून दिले होते.
उषा चव्हाणचा आणखी एक डबलरोल असलेला चित्रपट म्हणजे सुनबाई ओटी भरून जा. राम कर्वे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मा. दा. देवकाते यांचे होते. रहस्यमय, कोर्टरूम ड्रामा असलेल्या या चित्रपटात उषा चव्हाणने आपल्या अभिनयाची खूप व्हरायटी दाखवली होती. नऊवारी साडी, पाचवारी साडी, बेलबॉटम ते सिगारेट ओढेपर्यंत अनेक प्रकार या चित्रपटात उषा चव्हाणने करून आपण लवचिक किंवा आजच्या भाषेत फक्त तमासगिरीण नाही, तर व्हर्सटाईल अॅक्टर आहोत हे दाखवून दिले होते. यात अविनाश मसुरेकर हा तिचा नायक होता. बाकी निळू फुले, संजय जोग अशी भली मोठी जंत्री असली, तरी चित्रपटाचा केंद्रबिंदू उषा चव्हाण होती. त्या काळात दादांशिवाय उषा चव्हाणला चित्रपट मिळत होते. उषा चव्हाणसाठी चित्रपट बनत होते. लावणी आणि घरंदाज अशा नायिकांमध्ये जयश्री गडकर आणि आशा काळे यांची मक्तेदारी मोडून काढत उषा चव्हाण गाजत होती.
उषा चव्हाणचा आणखी एक दादांशिवाय गाजलेला चित्रपट म्हणजे रानपाखरं. १९६०च्या दशकातील नायक आणि विनोदाचा बादशहा असलेल्या राजा गोसावीबरोबर काम करून आपण मातब्बर नायकांबरोबरही किती ठामपणे उभे राहतो हे उषा चव्हाणने दाखवून दिले होते. हा चित्रपटही तुफान गाजला होता. केवळ दादांच्या विनोदी चित्रपटाची नायिका हा शिक्का पुसून टाकत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपण वेगळी प्रतिमा तयार करू शकतो हे तिने दाखवून दिले होते.
दादांचा सलग ९ सुपरहिट चित्रपटांचा विक्रम मोडण्याच्या इराद्याने चित्रपटसृष्टीत आलेल्या सुषमा शिरोमणीनेही आपल्या मोसंबी नारंगी या चित्रपटात उषा चव्हाणला घेतले आणि या प्रमुख भूमिकेत ती चांगलीच चमकली. दादांशिवाय कुठेही गेलो, तरी यशस्वी होऊ शकतो आणि समोर कोण नायक आहे याला महत्त्व नाही हे दाखवत यशाची शिखरे उषा चव्हाण गाठत होती.
उषा चव्हाणचा आणखी एक आॅफबिट म्हणावा लागेल, असा चित्रपट म्हणजे सख्या सजना. या चित्रपटात तिचा नायक होता गणपत पाटील. तमाशात नाच्याची भूमिका करणारा गणपत पाटील हा उषा चव्हाणचा नायक ही कल्पनाच प्रेक्षकांना गमतीशीर वाटली; पण कथानकाची गरज पाहता गणपत पाटलांसाठी हा चित्रपट बनवला होता असे वाटते. पण यातील तिची भूमिका लक्षणीय होती.
१९८०च्या दशकातील बिगरदादा उषा चव्हाणचा आणखी एक गाजलेला चित्रपट म्हणजे कडकलक्ष्मी. यात उषा चव्हाणचा नायक होता यशवंत दत्त. निळू फुले, शरद तळवलकर, जयश्री गडकर अशा सगळ्या जंत्रीत एक खट्याळ गावरान भूमिका घेऊन उषा चव्हाणने टायटल रोल केला होता. हा चित्रपटही तुफान गाजला होता. एकूणच दादा आणि उषा हे समीकरण मोडून काढत दादांशिवायही उषा चव्हाण हे एक नाव आहे हे दाखवण्यात उषा चव्हाण बºयापैकी यशस्वी झाली होती. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे एक महत्त्वाचे सोनेरी पान असणार आहे.
प्रफुल्ल फडके/द स्क्रीन
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा