रविवार, २३ मे, २०२१

रोगांची मालिका


दीड वर्षापूर्वी कोरोना जेव्हा आला तेव्हा तो चीनमधून आला आणि वटवाघळामुळे निर्माण झाला अशी चर्चा होती, पण त्याअगोदर म्हणजे तीन वर्षांपूर्वी वटवाघळांवर अशीच संक्रांत आली होती किंवा वटवाघळामुळे संक्रांत आली होती. ती म्हणजे निपाह या विषाणूची चर्चा होती. ती चर्चा थोडे दिवस चालली आणि बंद झाली. मग हा निपाह आणि कोरोनाचा काही संबंध आहे का, याचा मात्र तपास केला गेला नाही. तीन वर्षांपूर्वी काही काळ निपाह या विषाणूची दहशत आरोग्य क्षेत्रात पसरली होती. त्यामुळे एकूणच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण ते वातावरण जास्त पसरण्यापूर्वीच कोरोनाने तोंड वर काढले, पण त्या दोन्हीचे मूळ कुठेतरी वटवाघळाशी जोडले गेले होते याकडे कोणी लक्ष आता देत नाही. नवीन विषय मिळाला की, पहिला विषय सोडून द्यायचा.


तसे दर चारदोन वर्षांनी आपल्याकडे नवनवे रोग येत असतात आणि त्याची भीती, काळजी यांमध्ये अनेक दिवस निघून जातात. त्या रोगावर मात करण्याची चर्चा होते. त्याची लस, औषधे काय असणार याबाबत जनजागृतीचा ऊत येतो, पण त्या रोगावर मात काही होत नसते. हे आपल्या देशात आता नित्याचेच झालेले आहे. त्यामुळे घरात बसून राहणे हा काही आता पर्याय नाही. रोगाचा किंवा साथीचा बागुलबुवा किती करायचा याचेही काही प्रमाण आहे. आपल्याकडे पोलिओ निर्मूलनाची मोहीम १९९५ पासून हातात घेतली. त्याला आता २५ वर्षं झाली. तरीही अजून पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. हे लसीकरण सुरू करण्यापूर्वी जवळपास ३ दशके या रोगाशी माणसं लढतच होती. त्यावर चित्रपटही आले होते. १९७0 च्या दशकातील कुवारा बाप या चित्रपटात त्यावर प्रकाश टाकला होता, पण लसीकरण त्यानंतर वीस वर्षांनी सुरू झाले, पण म्हणून कोणी घरात कोंडून घेतले नाही. आपण फक्त स्वातंत्र्यानंतर देवी या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो आहोत. परंतु टीबी किंवा क्षयरोगासारखे रोग आपल्याकडे फोफावतानाच दिसतात. त्यावर नियंत्रण आणायचे तर नवीन कोणता तरी रोग धुमाकूळ घालतो.

वीस वर्षांपूर्वी असाच आपल्याकडे डेंग्यू हा जीवघेणा रोग आला. त्याची दहशत पसरली. ताप आला की मनात भीतीचे थैमान घालायचे. घरात शिरलेला डास दिसला की, तो डेंग्यूचा तर नसेल अशा भीतीने काहूर माजायचे. या डेंग्यूची भीती थोडीफार कमी झाली. तो बरा होऊ शकतो असे वाटल्यावर जरा कुठे सुटकेचा नि:श्वास टाकतो तो पक् पक् पकाक करत बर्ड फ्लू नावाचा रोग आला होता. हा रोग म्हणे कोंबड्यांमुळे होतो अशी दहशत साधारण पंधरा वर्षांपूर्वी पसरली. झाले ज्याने-त्याने आपल्या कोंबड्या मारून टाकल्या. हॉटेलमधूनही चिकन, अंडी मागवणे बंद झाले. कित्येकांनी आपल्या पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या पटापट मारून टाकल्या. का, तर या कोंबड्यांमुळे हा बर्ड फ्लू पसरू शकतो याची भीती मनात होती. या बर्ड फ्लूचे बस्तान बसल्यावर आणि त्याची भीती नाहीशी झाल्यावर एकाएकी स्वाइन फ्लू नावाच्या रोगाची दहशत निर्माण झाली. हा रोग म्हणे डुकरांमुळे होतो. त्यामुळे प्रत्येकजण तोंडाला मास्क लावून बाहेर पडू लागला. मास्कचा जन्म या स्वाइन फ्लू रोगामुळे झाला. त्यामुळे मास्क विक्रीचा धंदा चांगला तेजीत आला होता. याचे बस्तान बसले, पण नंतर मास्क घालणे सोडून दिले. त्यानंतर आता तीन वर्षांपूर्वी निपाह नावाचा नवा संसर्गजन्य रोग माणसांच्या राशीला आला होता. हा रोग म्हणे वटवाघळांमुळे होतो. केरळ राज्यातील कोझिकोडे जिल्ह्यात काही भागांमध्ये झालेल्या निपाह विषाणूंच्या संसर्गामुळे मृत्यूने थैमान घातले होते, मात्र त्यावर या विषाणूच्या संसर्गाने महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाऊ नये. हजारो वटवाघळांपैकी मोजक्याच वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळला आहे, अशी माहितीही प्रसिद्ध झालेली होती. विषाणूच्या संपर्कात मानव आल्यास त्याच्यामार्फत दुसºया व्यक्तीला संसर्ग होण्याची भीती असून, त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केले होते. आता वटवाघूळ हा प्राणी काही कोणी आवडीने बघेल, त्याला पाळेल किंवा सहज दिसेल असे नाही. तेव्हा त्याच्यामुळे संसर्ग होण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही, पण केरळमध्येच हा रोग का पसरला होता हे समजत नाही. आपल्याकडे कोरोनाची सुरुवातही केरळमधूनच झालेली आहे. देशात पहिला कोरोनाचा रुग्ण केरळमध्येच आढळला होता. त्यावर संशोधन तज्ज्ञांनी करावे हवे तर, पण केरळमध्ये अनेक मसाज पार्लर, आयुर्वेदिक ट्रिटमेंट देणाºया संस्था आहेत. तिथे वटवाघळाचे तेल काढून त्याने मालिश केले जाते. त्यामुळे यातून हा काही रोग निर्माण झाला आहे का, याचा तपास केला पाहिजे. निपाह विषाणूच्या संसर्गाबाबत गैरसमजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण एकदा संशय आणि भीतीचे भूत मानगुटावर बसले, तर ते उतरणे अवघड असते. केरळमध्ये वटवाघळांना संसर्ग झालेल्या निपाह या विषाणूमुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. हा विषाणू प्रामुख्याने फळांच्या झाडावर असलेल्या हजारो वटवाघळांपैकी मोजक्याच काही वटवाघळांमध्ये दिसून येतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याबाबत गैरसमजदेखील असायला नकोत, असा सल्ला डॉ. मौर्या यांनी दिला. झाडावर लटकणाºया वटवाघळांच्या मूत्रांद्वारे या विषाणूचा प्रसार होऊन संसर्ग होतो असे सांगण्यात आले होते. गावांपासून ते शहरात सर्वत्र वटवाघळे असतात. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते. झाडावर लटकणाºया सर्वच वटवाघळांपासून विषाणूंचा संसर्ग होत नाही. निपाह विषाणूचा स्वाइन फ्लूसारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही, मात्र स्वाइन फ्लूच्या तुलनेत निपाह विषाणूच्या संसर्गामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.


निपाहची भीती फार काळ टिकली नाही. त्याची लाट तयार होण्यापूर्वीच विरली, पण वटवाघळाचा संबंध जोडून जो कोरोनाचा प्रसार झाला त्याने जगाला हादरवले. म्हणजे डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू या लिटमस टेस्ट असाव्यात कदाचित. त्यात माणसांना गुंतवून ठेवत चीनने कोरोनाचे अस्त्र उगारले आणि संपूर्ण जगाला फटका बसला हे लक्षात घ्यावे लागेल. २00१ च्या दरम्यान चीनने सार्सचाही प्रयोग केला होता. कसलीशी पावडर पोस्टाने किंवा पुडीतून येत असे आणि त्यातून सार्स होत होता. त्यामुळे पोस्टमनलाही घरात घेताना अनेक जण घाबरत होते. हा रोग प्लेगसारखा असल्याचे बोलले गेले होते, पण चीनने कोरोनाचे अस्त्र एकाएकी सोडलेले नव्हते तर त्याचे बरेच दिवस प्रयत्न होत होते हे सार्ससारख्या साथीवरून लक्षात येते. त्यामुळे रोगाचा निर्माता कोण आहे त्याच्यावर इलाज करेपर्यंत या रोगापासून मुक्तता मिळणे कठीणच.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: