माझा होशील ना ही अनिकेत साने दिग्दर्शित झी मराठीवरील मालिका सध्या बºयाच गमती जमती करत आहे. खरं तर या मालिकेचा प्रकार फॅमिली-ड्रामा आहे. या मालिकेचे प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत; पण या मालिकेत पुरुषांच्या रुसव्या फुगव्यांचे जास्तच कौतुक केलेले दिसते. २०१३मध्ये पाच सासवांना सामोरी जाणारी होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी आणि माझा होशील ना मधील सई यात काही फरक नाही. दोघींनीही घर सांभाळण्याची भूमिका केली. फक्त तिकडे पाच सासवा होत्या इथे चार सासरे आहेत. हे चार सासरे म्हणजे चड्डी बनीयन गँग असल्याचाच भास होतो. कारण क्वचितच हे सासरे पूर्ण कपड्यात दिसतात; पण या मालिकेच्या शिर्षकाप्रमाणे माझा होशील ना हे नेमके कोण कोणासाठी म्हणत आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही.
या कार्यक्रमात सई एक स्मार्ट मुलगी दयाळू आदित्यच्या प्रेमात पडते. तिचे आदित्यशी लग्न होते; पण लग्नानंतर गोष्टी बदलतात. कारण सईला घरातील सदस्यांशी सामना करावा लागतो. हा सामना मुख्यत: दादा मामाशी आहे. होणार सून मी या घरची मध्ये जसे गोखले कुटुंबाला लग्न न टिकण्याचा शाप आहे, असे भासवले जात होते. प्रत्येकाच्या तोंडून श्री-जान्हवीचे तरी लग्न टिकावे, असे वाटत असते. कारण कुणाचा घटस्फोट तर कुणाचा नवरा सोडून गेलेला, कुणाचा मेलेला तर कुणाचे लग्नच झालेले नाही अशा भागिर्थीबाई गोखल्यांच्या साम्राज्यात नर्मदा, इंद्रायणी, कावेरी, शरयू, सरस्वती या नद्या कधी उथळपणे, तर कधी खोलवर वहात होत्या तशाच प्रकारे माझा होशील नामध्ये चड्डी बनीयन गँगचे चार आखाड सासरे आहेत. त्यात सर्वात धाक दाखवणारा आहे तो दादा मामा. मालिकेचा नायक असलेल्या आदित्य म्हणजे विराजस कुलकर्णीला आई-बापाविना असलेला मुलगा म्हणून या चार मामांनी वाढवला आहे. या चड्डी बनियन गँगमध्ये तो एकमेव समजूतदार आणि पूर्ण कपड्यातला नाजूक बाप्या आणि त्याच्या प्रेमात पडलेली कणखर अशी सई.
गेला आठवडा त्या बंधूमामाच्या म्हणजे सुनील तावडेच्या बायकोला गुलप्रितला घरात ठेवायचे की नाही यावर घालवला आहे. ब्रह्मे कुटुंबातील सर्वात मोठा ब्रह्मे म्हणजे दादा मामा अर्थात विद्याधर जोशी. बाकीचे सगळे बह्मसंबंध आहेत त्यात सुनील तावडे, विनय येडेकर आणि निखिल रत्नपारखी; पण यात दादागिरी चालते ती थोरल्या भावाची. या वातावरणात वाढलेला आदित्य. दादामामाची बायको घरफोडी करणारी आहे म्हणून तीला घरातून बाहेर काढली आहे. त्यामुळे कोणीही लग्न करायचे नाही आणि भावंडात फूट पडू द्यायची नाही, यासाठी चाललेला अट्टाहास हा मानसिक विकृतीचाच प्रकार वाटतो.
ज्योतिष आणि अंधश्रद्धांच्या आहारात गेलेल्या दादा मामाला बंधूमामाने केलेले आणि तब्बल १४ वर्ष लपवून ठेवलेले लग्न मान्य नाही. लग्न झाल्याचे तो १४ वर्ष लपवून ठेवतो आणि त्याच्या पंजाबी बायकोला अचानक घरात घेण्याचे काम सई करते. त्यावरून हा आठवडा काढला. लग्नाचे सर्टिफिकेट आहे; पण दादामामाला ते मान्य नाही. त्यामुळे बंधूमामाशी तो वाद घालतो आहे आणि त्याचे नाते तोडतो आहे. आपली मते अन्य भावांवर लादून बंधूमामा आणि त्याच्या बायकोला वाळीत टाकण्याचा प्रकार तो करतो आहे. यात सगळे भाऊ शिकले सवरलेले आहेत. बंधूमामा तर वकील आहे. त्यामुळे पुरुष असे वागू शकतील का, हा कथेचा भागच न पटणारा आहे. गौतमी देशपांडेने यातील सईची भूमिका चांगली केलेली आहे. दादामामाला ठणकावणारी आणि जाब विचारणारी तीच एकमेव आहे. बाकीचे सगळे शेपूट घालून गप्प बसतात असेच वातावरण दिसते. त्यामुळे मालिकेच्या मूळ शिर्षक माझा होशील ना, हे कोणासाठी आहे हे अनाकलनीय आहे. कारण प्रारंभी सई-आदित्यच्या प्रेमात सुयश पटवर्धनचा अडथळा असल्यामुळे माझा होशील ना असे सईला वाटत असावे; पण आता लग्न होऊन एक वर्ष झालेले आहे.
गुल आणि बंधुमामाचा काडीमोड व्हावा यासाठी दादामामाने केलेला अट्टाहास हा विकृतीच्या टोकाला जातो. दादाच्या प्रेमाखातर बायकोला घटस्फोट देणारा बंधुमामा हे न पटणारे कृत्य कसे काय करू शकतो?; पण या मालिकेची सगळी धडपड ही सर्वांना एकत्रित आणण्यासाठी सई खटाटोप करणार या विषयाशी बांधलेली आहे. सगळ्यांचे मतपरिवर्तन करून कौटुंबिक एकजूट ठेवण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे होणार सूनमधील जान्हवीची आणि सईची भूमिका एकच. फक्त चार सासरे आणि पाच सासवा इतकाच काय तो फरक. यात दीप्ती जोशीने गुलप्रीत कौर या पंजाबी व्यक्तिरेखेत चांगला अभिनय केल्याचे दिसून येते. ती मराठी आहे, असे वाटतच नाही.
लग्न म्हणजे मन जुळणं; पण मन नावाचा अवयव शरीरात नसतो, त्यामुळे आपला त्यावर विश्वासच नाही, असे दादामामा बोलतो. एकत्र राहून संसार करण्याची सवय नाही, प्रेम, लग्न निभावणं सोपं असतं, सगळी लग्न तुटत नाहीत, अशी वाक्य टाकून दादामामाला चिमटे घेण्याचे काम सई चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे चिडलेला दादामामा प्रेम करणं सोपयं; पण संसार करणं सोपं नाही, १४ वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न नाही, असे म्हणून हे लग्न नाकारतो; पण शेवटी सर्वांच्या साक्षीने बंधुमामा डिव्होर्सपेपरवर सही करतो आणि गुलप्रितला पण सही करायला सांगतो. त्यावर या कागदात आमचे लग्न मोडण्याची ताकद नाही; पण भावांपासून तोडायचे नाही म्हणून मी घटस्फोट देते असे सांगून सही करणारी गुलप्रित कुठे पहायला मिळेल का? त्यामुळे पुढचा आठवडा हा गुलप्रितला परत आणण्यात जाईल आणि माझा होशील का हे नक्की कोण कोणाला म्हणाले, असे विचारत बसावे लागेल.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा