शुक्रवार, २८ मे, २०२१

आसारामच्या वाटेवर


गेल्या सात वर्षात विशेषत: २0१४ ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बाबा रामदेव यांचे प्रस्थ वाढले. त्यांचा अभ्यास, वत्कृत्व, कर्तृत्व हे कितीही महान असले, तरी दुसरे मूर्ख आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे अ‍ॅलोपॅथीवर टीका करणे हे त्यांचे चुकलेच आहे. त्याचे समर्थन कोणीही करू नये. रामदेव बाबांनी आयुर्वेदातील ज्ञान आणि योग सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवले आणि लाखो लोकांमध्ये योग जागृती करून या माणसाने लोकांना निरोगी आणि सक्षम बनवण्याचे काम केले आहे, पण जेव्हापासून त्यांनी औषध निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे तेव्हापासून त्यांचे तंत्र बिघडल्याचे दिसत आहे. त्यांच्यातला सच्चा राम बाजूला झाला आणि फक्त बाबा राहिला असे वाटू लागले आहे. म्हणजे आपल्याकडे जेवढे बाबा, बापू झाले त्या सगळ्यांनी आयुर्वेदाचा पुरस्कार केला. काही वर्षांपूर्वी आसाराम बापूच्याही अशाच काही वस्तू विकायला यायच्या. कसली तेलं, साबण आणि बरेच आयुर्वेदिक शाम्पू वगैरेचे चांगले मार्केट आसारामने मारले होते. आसाराम आत गेला आणि रामदेवबाबांचे उत्पादन वाढले. त्यामुळे योगाच्या नावावर धंदा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप झाला तर तो चुकीचा नाही.


आपले काम आणि धंदा इतपत ते गुंतून होते तोपर्यंत ठिक होते, पण नुकतेच त्यांनी थेट अ‍ॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीवर आगपाखड करून अशास्त्रीय विधाने केली आहेत. जितकी माणसे आॅक्‍िसजन न मिळाल्याने मेली त्यापेक्षा अधिक माणसे अ‍ॅलोपॅथीची औषधे घेऊन मेली, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने केवळ रामदेव बाबांचा निषेधच केला नाही, तर त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्याची तयारी सुरू केल्यानंतर बाबा सरळ आले आणि त्यांनी खेद व्यक्‍त करीत दिलगिरीही व्यक्‍त केली आहे, पण हा विषय इथंच संपत नाही. गेल्या वर्षी त्यांनी कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला होता. तीन दिवसांत हे औषध घेऊन कोरोना बरा करण्याचा दावा केला होता. या औषधावर कोणी विश्वास ठेवला नाही आणि महाराष्ट्रात तर त्याला परवानगीही दिली नाही. त्यामुळे आसारामच्या वाटेवर जाण्यापासून रामदेवबाबांनी दूर राहिले पाहिजे.

आयुर्वेदात जगातल्या सर्वच आरोग्य समस्यांची व विषाणूजन्य आजारांची उत्तरे असल्याच्या थाटात सध्या हे बाबा बाजारातील प्रचलित औषधांवर तुटून पडले आहेत. रामदेव बाबांच्या थेरपींवर आक्षेप घेणारे आयुर्वेदाच्या म्हणजेच हिंदूंच्याही विरोधात आहेत, असा प्रचार त्यांच्या समर्थकांनी सुरू केला आहे. रामदेव बाबांना विरोध करणारे सेक्‍युलॅरिस्ट आहेत, काँग्रेसी व अल्ट्रा लेफ्ट आहेत, अशीही कोल्हेकुई सुरू करण्यात आली आहे. रामदेवबाबांनीच फक्त हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही. आयुर्वेदाचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडला जाऊ नये. कित्येक मुस्लिम हकीम जडीबुटीची औषधे देत असतात. तो आयुर्वेदच असतो. त्यामुळे आयुर्वेदावर फक्त हिंदुत्वाचा शिक्का मारणे थांबले पाहिजे. ती एक उपचार पद्धती आहे. निसर्गाने दिलेली ती शक्ती आहे.


साधारणपणे रामदेवबाबा अडचणीत आले की धर्मतत्त्वांच्या आड लपत असल्याचे अलीकडे सर्वांच्या लक्षात आले आहे. बाबा कसबी राजकारणीही आहेत. ते एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे समर्थक आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोदींच्या खालोखाल लोकांचा त्यांच्यावर रोष व्यक्‍त होत असतो. बाबांनी कोरोनावर कोरोनील नावाचे औषध बाजारात आणले. त्याच्या उद्‌घाटनाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन उपस्थित होते, पण याच बाबांच्या कंपनीत काम करणारे एक वरिष्ठ अधिकारी सुनील बन्सल यांचाच कोरोनाने मृत्यू झाला. मग कुठे गेली बाबांची उपचार पद्धती? खरं तर रामदेव बाबांचे कोरोनाच्या संबंधातील दावेही असेच अशास्त्रीय पद्धतीवर आधारित आहेत. त्यामुळे बाबा सध्या गोत्यात आले आहेत. ते आयुर्वेदातील ज्ञानाचे नवनवे दाखले पुढे करीत आहेत. वास्तविक त्यांनी अन्य कोणत्याही विज्ञानाधारित उपचार पद्धतींना विरोध करण्याचे काम करण्याच्या भानगडीत न पडणेच चांगले. रामदेवबाबांनी जेवढी प्रतिष्ठा सात वर्षांपूर्वी मिळवली होती तितकीच आता घसरणीला लागलेली आहे. त्यांच्यात आता राम शिल्लक राहिलेला नाही, तर फक्त बाबा राहिला आहे असे वाटू लागले आहे. त्यांनी आपल्यातील राम जपला पाहिजे, खरेपणा जपला पाहिजे आणि राजकारणात लक्ष न घालता योगाकडे लक्ष दिले तर बरे होईल.

बाबा रामदेव यांच्या आग्रहाखातर पंतप्रधान मोदींनी २0१५ पासून जगभरात योगा दिन सुरू झाला. दरवर्षी २१ जूनला जगभरात योगा केला जातो. संपूर्ण जगाला आपल्यामागे धावायला लावायची ताकद रामदेवबाबांमध्ये असताना त्यांनी वायफळ बोलून, नको त्यावर टीका करून स्वत:चे अवमूल्यन का करून घेतले हे न कळणारे आहे? बाबा रामदेव हे थोडे आधुनिक होताना दिसत होते. एकेक उत्पादने बाजारात आणण्याच्या मागे लागत होते. पतंजलीने अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांना दणका दिला होता. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांपुढे आव्हान उभे केले होते. बिस्किटे, नूडल्स आणि विविध साबण, सोप, क्रीम, सौंदर्यप्रसाधने, काढे यांतून त्यांचे चांगले चालले होते. अगदी जीन्सच्या निर्मितीपर्यंत तयारी केली होती, पण हे सगळं चाललं असताना दुसºयावर, अ‍ॅलोपॅथीवर टीका करण्याची त्यांना झालेली दुर्बुद्धी ही त्यांच्यातला राम निघून गेल्याची साक्ष म्हणावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: