उषा नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गुणी अभिनेत्री. १९७० च्या दशकातील उत्तरार्धात तिचा उदय झाला आणि सलग पंधरा वर्ष तिने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, मात्र १९९० च्या दशकानंतर ती ग्रामीण लो बजेट चित्रपटात अडकली, मिळेल ती भूमिका करत राहिली, पण प्रचंड ताकदीची असलेली गुणी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पहावे लागेल. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भूमिका करण्याची ताकद असलेली ही अभिनेत्री गुरफटली मात्र ग्रामीण चित्रपटातच. याचे कारण चांगली नृत्यांगना असल्यामुळे आणि तमाशाप्रधान चित्रपटाची गरज यांमुळे तिच्यावर तो छाप पडला, पण जबरदस्त ताकद असलेली आणि अभिनयासाठी काहीही करणारी अशी ती अभिनेत्री आहे.
१९७० च्या दशकात व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ चित्रपट आला होता. या चित्रपटात संध्याच्या बरोबरीने नाचणाºया ज्या सहनर्तिका होत्या त्यात उषा नाईक आपल्याला दिसते, पण त्यानंतर हाच चेहरा मराठी चित्रपटसृष्टीचा एक मोठा भाग बनून जाते. तिच्यासाठी आणि तत्कालीन ताकदीच्या अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून तिचे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट येतात आणि ती एक यशस्वी अभिनेत्री बनते. अशोक सराफ, रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, किशोर जाधव, अविनाश खर्शिकर यांच्यापासून ते अगदी दादा कोंडके यांच्या चित्रपटापर्यंत तिचा असलेला प्रवास हा अत्यंत मोलाचा आहे, पण तिने दिलेले काही चित्रपट हे जबरदस्त असे चित्रपट आहेत.
१९७० च्या दशकात जयश्री गडकर यांनी तमाशाप्रधान चित्रपट करणे थांबवले, उषा चव्हाण दादा कोंडकेंच्या चित्रपटात अडकून पडली. रंजना आणि आशा काळे या काही फडावर नाचणाºया अभिनेत्री नव्हत्या. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील फड गाजवला तो या काळात उषा नाईक हिनेच. त्यामुळेच ‘सुंदरा सातारकर’ हा निव्वळ तमाशाप्रधान चित्रपट केवळ उषा नाईकला समोर ठेवून बनवण्यात आला होता. तरीही बिगर तमाशाप्रधान अशा तिच्या काही भूमिका या अत्यंत गाजलेल्या अशा आहेत.
‘हळदीकुंक’, ‘राखणदार’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘सुशिला’, ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘चांदणे शिंपित जा’ हे तिचे चित्रपट वेगळ्या भूमिकांचे आहेत, तर दादा कोंडकेंबरोबरचा ‘येऊ का घरात’ हा चित्रपट आपण उषा चव्हाणला योग्य पर्याय आहोत हे तिने दाखवून देणारा ठरला होता.
‘राखणदार’ चित्रपटात तर तिची भूमिका फार आव्हानान्मक अशी होती. ही भूमिका करण्याचे धाडस त्या काळात कोणीच करणे शक्य नव्हते, पण भूमिकेची गरज म्हणून तिने केलेले शरीरप्रदर्शन कधीही गैर वाटले नाही. चित्रपटाला ए सर्टिफिकेट होते, पण त्यात कोणतीही अश्लिलता नव्हती की बीभत्सता नव्हती. रवींद्र महाजनी हा या चित्रपटाचा नायक असतो. लहानपणी बहिणीबरोबर खेळत असताना काही गुंड त्याच्या बहिणीवर बलात्कार करतात. हे लहान वयात पाहिल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. लग्नानंतर पत्नी उषा नाईकसमोर आल्यावर तिचे रूप बघितल्यावर त्याला ते आठवते आणि त्याच्या मानसिकतेत बदल होतो. हा अत्यंत नाजूक सीन देताना उषा नाईक आणि रवींद्र महाजनी यांनी जीव ओतला होता. स्त्रीदेहाचे दर्शन दिसल्यावर त्याला तो बलात्कार आठवून अटॅक येत असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री तिचे एकेक कपडे उतरवत त्याला तो अटॅक येतो हा सीन अत्यंत अवघड होता. तो करण्याचे आव्हान उषा नाईकने पेलले होते, पण यात कुठेही अश्लिलता नव्हती हे दिग्दर्शक आणि समर्थ अभिनयाचे दर्शन होते. बिगर तमाशाप्रधान अशी एक चांगली भूमिका तिच्या वाट्याला आलेली होती. तिने ती चोख केली होती. या मानसिक रोगातून बरे करण्यासाठी ती आणि निळू फुले एक फार मोठी जबाबदारी घेतात आणि कोण कुणाचा राखणदार असतो हे या चित्रपटाचे रहस्यमय कथानक होते. ते उषा नाईकने पेलले होते.
अशोक सराफबरोबर ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ हा एक चांगला गाजलेला चित्रपट उषा नाईकने केलेला होता. उषा नाईक ही अशोक सराफची पहिली बायको असते. कामिनी भाटिया तमासगीर असते. तिच्या नादाला अशोक सराफ लागतो आणि लग्न करून तिला घरी घेऊन येतो. मग एका नवºयावरून दोघींची भांडणे, नवºयाची वाटणी कशी करायची यावरून होणारी जुगलबंदी म्हणजे विनोदाची पेरणी होती. यात उषा नाईकने चांगले काम केले होते आणि आपले अभिनय सामर्थ्य दाखवून दिले होते.
‘सुशिला’ चित्रपटात अविनाश मसुरेकरच्या घरंदाज बायकोची भूमिका उषा नाईकने केलेली होती. अर्थात यातील ग्रामीण संवाद हे कोल्हापुरी ढंगाचे असल्याने ग्रामीण चित्रपटातील नायिका हाच तिच्यावर ठपका होता, पण तो पुसून टाकायची तिला संधी मिळाली ती ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटातून. पुण्यात आणीबाणीच्या काळात घडलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यावर आधारित हा चित्रपट होता. यात नाना पाटेकर, किशोर जाधव, बिपिन वर्टी, अविनाश खर्शिकर, मोहन गोखले हे दिग्गज कलाकार होते. यात मोहन गोखलेच्या प्रेयसीची भूमिका तिने केलेली होती. अस्सल पुणेरी मुलगी साकारून तिने आपल्या स्वच्छ भाषेतील संवादाचे दर्शन या चित्रपटातून दिले होते. आपण एक हरहुन्नरी आणि कोणत्याच पठडीत अडकलेली अभिनेत्री नाही हे तिने इथे दाखवून दिले होते.
‘भुजंग’ चित्रपटात रंजनाच्या मुलीची भूमिका तिने केली होती. चित्रपट रंजना आणि निळू फुले यांनी खाऊन टाकला असला, तरी यात प्रेमात फसलेल्या मुलीची उषा नाईकने लक्षवेधी भूमिका केलेली होती.
‘आई’ हा तमाशाप्रधान चित्रपट खास उषा नाईकसाठी बनवला होता. कॉलेजला जाणारी पण नाइलाजाने तमाशाच्या फडावर जावे लागलेल्या एका आईची मध्यवर्ती भूमिका तिने साकारली होती. आपण तमासगिरीण राहून आपल्या मुलावर सावलीही न पडू देता त्याला शिकून मोठी करणारी आई आणि त्याच्या भवितव्यासाठी अखंड तमाशाचा फड चालवणारी तमासगिरीण अत्यंत समर्थपणे उषा नाईकने साकारली होती. कुलदीप पवार, निळू फुले हे दिग्गज कलाकार यात होते, पण चित्रपटावर वर्चस्व होते ते उषा नाईक या समर्थ अभिनेत्रीचे.
पण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे युग सुरू झाले आणि ग्रामीण, तमाशाप्रधान चित्रपटात गुरफटलेल्या उषा नाईकला त्यात कुठे स्थान नव्हते. कुठे तमाशा असलाच, तर ती जागा प्रिया बेर्डे वगैरे अभिनेत्री मारून न्यायच्या. त्यामुळे सातारा, अहमदनगर, कोल्हापुरात अन्य निर्माते, पितांबर काळेंसारखे निर्माते-दिग्दर्शन काही चित्रपट सातत्याने बनवत असत. त्या लो बजेट चित्रपटात कामे करण्याशिवाय उषा नाईकसमोर पर्याय नव्हता. अशा चित्रपटातून छोट्या-मोठ्या भूमिका करत उषा नाईकने आपले नाव गाजवले, पण ती ग्रामीण चित्रपटात गुरफटत गेली, पण ती एक ताकदीची अभिनेत्री आहे यात शंकाच नाही. आजही अधूनमधून एखाद्या मालिकेतून छोट्या-मोठ्या भूमिकेतून तिचे दर्शन होते, पण मराठी चित्रपटसृष्टीत आपला एक ठसा उमटवलेली ती अभिनेत्री आहे.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055
28 may