काबुलीवाला म्हणजे चणे-फुटाणे, खाऊ-खेळणी आणि लहान मुलांना आनंद घेऊन येणारा असा एक विक्रेता. त्याची वाट पाहणारे बालपण काबुलीवाला काबुलीवाला करत सरून जाते आणि मोठेपण आले, तरी तो काबुलीवाला स्मरणातून कधीच जात नाही. असाच एक काबुलीवाला आपल्या फिल्म इंडस्ट्रीत किंवा बॉलिवूडमध्ये येऊन गेला, तो म्हणजे अभिनेता, लेखक, पटकथा, संवादकार आणि दिग्दर्शक, निर्माताही. तो म्हणजे कादर खान.
कादर खानने चित्रपटाची निर्मितीही केली होती हे फार थोड्यांच्या स्मरणात असेल; पण शमासारखा वेगळा विषय घेऊन एका फ्लॉप चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती; पण कादर खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गेल्या पंचेचाळीस वर्षांत गाजलेले नाव. जी भूमिका वाट्याला येईल ती अत्यंत चोख बजावणारा कलाकार. ही भूमिका लेखक, पटकथा, संवाद याची असो वा प्रत्यक्ष एखादे पात्र रंगवणे असो, ते चोखपणे करून प्रेक्षकांना आनंद देण्याचा मनापासून त्यांनी प्रयत्न केला. खलनायक म्हणून जेव्हा तो क्रूर दिसायचा तेवढाच विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांना खळखळून हसवायचा. चरित्र अभिनेता म्हणून त्याची कामगिरी मोलाची होती; पण येईल ती भूमिका सक्षमपणे साकारणे हे चोख करणारा अभ्यासू कलाकार म्हणजे कादर खान.
अफगाणिस्तानातील काबूलमध्ये जन्म झालेल्या या काबुलीवाल्याला खºया अर्थाने ओळख दिली ती भारतीय चित्रपटसृष्टीने. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना घडवण्यात आणि त्यांच्याबरोबर भट्टी जमवण्यात कादर खान यांचे योगदान फार मोठे होते. समोर कोण कलाकार आहे, त्याला काय शोभेल आणि कशा प्रकारे त्या शब्दांना न्याय मिळेल याप्रमाणे संवाद लिहिणारा एक जबरदस्त सिद्धहस्त लेखक म्हणून कादर खान हे फार मोठे होते. त्यामुळेच सुपरस्टारपदावर असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन या इमेजला छेद देण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या संवादांची निर्मिती करण्यात आणि अमिताभ बच्चन यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील सर्व पैलू बाहेर काढणारे संवाद लिहिण्याचे काम कादर खान यांनी केले. यामध्ये मनमोहन देसार्इंचे जे मल्टिस्टार कास्ट चित्रपट होते त्यामध्ये अमर अकबर अँथनी, परवरीश असे चित्रपट असोत अथवा लावारीस, मुकद्दर का सिकंदर, शराबी या प्रकाश मेहरांच्या चित्रपटातील अँग्री यंग मॅन, प्रेमाचा त्रिकोण अथवा विनोदी ढंगाने जाणारा शराबी यातील संवादांमधील विविधता ही कादर खानच्या लेखनातील कमाल दाखवणारी आहे. अमिताभ बच्चन यांचा विजय दीनानाथ चौहान जेवढा कादर खाननी रंजक लिहिला होता, तेवढाच इन्कलाबमधील इन्स्पेक्टर आणि नंतर राजकारणात आलेला नेताही अफलातून उभा केला होता. त्याच्यासमोर कादर खानची प्रतिमा एका गुरूची असते, त्याचे खरे स्वरूप जेव्हा अमिताभला समजते तेव्हा अभिमन्यू चक्रव्ह्यूह में फस गया हैं तू या गाण्याच्या अगोदर कादर खानला तो म्हणतो की, मैने तुम्हे भगवान समझा था, लेकीन तू तो सैतानसे भी जादा हैवान निकला. असे सहज आणि लक्षात राहतील, असे संवाद लिहिण्याचे कसब कादर खान यांच्यात होते.
शराबीच्या वेळी, तर कादर खान एवढे बिझी होते की, त्याचे संवाद टेप करून कॅसेटने कुरिअरनी त्यांनी पाठवले होते. एकीकडे पद्मालया किंवा तत्सम दाक्षिणात्य हिंदी चित्रपटांमधून जितेंद्र, जयाप्रदा, शक्ती कपूर, श्रीदेवी, अमजद खान, बप्पी लाहिरी या टोळीला घेऊन येणारे चित्रपटातून विनोदी ढंगाचा खलनायक असेल किंवा विनोदी ढंगाने रंगवलेला खलनायकाचा सेवक, तर दुसरीकडे अमिताभ बच्चनसाठी जबरदस्त संवाद लिहिण्याचे कसब कादर खान यांनी दाखवून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले होते.
तोहफामधील शक्ती कपूरचा ललित्ता आहू हा संवाद कादर खाननी खास शक्ती कपूरसाठी हुडकला होता. आपल्या कॉलेज जीवनातील टवाळखोरीचा यात त्यांना उपयोग झाला होता. वयातील अंतर विसरून कादर खान यांची अनेक कलाकारांबरोबर भट्टी जमली होती. त्यात अलीकडच्या काळात गोविंदा आणि कादर खान यांची जोडी अशीच चांगली गाजली होती. गोविंदा, शक्ती कपूर, असरानी आणि अरुणा इराणी यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगली जमलीच होती; पण १९९०च्या दशकातील जुदाई चित्रपटातील परेश रावल यांच्याबरोबरची कादर खानची जोडी धमाल गाजली होती. यातील त्यांचे संवाद, अभिनय हे अतिशय सुंदर होते. विनोदाच्या टायमिंगबरोबरच कादर खाननी जे जे खलनायक रंगवले तेही अत्यंत खतरनाक रंगवले होते. यातील अमिताभ बच्चन यांचा पुनर्जन्म म्हटला जातो तो मनमोहन देसाई यांचा चित्रपट कुली. या कुलीतील कादर खानचा खलनायक अत्यंत जबरदस्त असा आहे. मुस्लीम वातावरणातील उर्दू अरबी शब्दांचा अचूक वापर करणारे संवाद आणि याबरोबर समोर सुपरस्टार असलेल्या अमिताभ बच्चनचे आव्हान पेलत खलनायक उभा करणे अशी चौफेर कामगिरी कादर खानने केलेली आहे.
चित्रपट कथा, संवाद लेखनाबरोबरच १९८१ पासून कादर खान यांनी सातत्याने २०१६ पर्यंत जवळपास ३०० चित्रपटांतून काम केले; पण त्यांचा मूळचा आत्मा हा लेखनाचा होता. मुंबईतील महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या या काबुलीवाल्याने शिक्षण पूर्ण केले ते अभियांत्रिकी शाखेचे. अभियांत्रिकी शाखेचा आणि चित्रपटाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही; पण ते हाडाचे कलाकार होते आणि हाडाचे लेखक होते. जबरदस्त निरीक्षणशक्ती होती, त्यामुळेच त्यांच्यात एकप्रकारचे लहान मूल डोकावल्यासारखे वाटायचे, म्हणून त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावरही आपली लेखन आणि अभिनयाची हौस पूर्ण केली. ती केवळ पूर्ण केली नाही, तर त्यामध्ये ते यशस्वीही झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय म्हणजे विद्वानांचे माहेरघर. या माहेरघरात उर्दू अध्ययनाचे आणि भाषा प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. हे केवळ साहित्य प्रेमापोटीच शक्य झाले.
त्यामुळेच खलनायकी भूमिकेतून जेवढे ते नालायक वाटायचे त्यापेक्षा ते खूप मोठे होते. आपल्या भूमिकेतील विनोदाने जेवढे गमतीशीर वाटायचे त्यापेक्षा ते खूप गंभीर आणि अभ्यासू होते. आपल्या चरित्र अभिनयातून ते जेवढे अगतिक वाटायचे त्यापेक्षा ते जास्त जबाबदार व्यक्तिमत्त्व होते. निर्माता, दिग्दर्शकांचा विश्वास संपादन करणारा लेखक, अभिनेता म्हणून त्यांची ख्याती होती. कोणतेही काम वेळेत पूर्ण करून देण्याची त्यांची खासियत होती, म्हणूनच फार कमी काळात ते अतिशय व्यस्त लेखक आणि अभिनेते झाले होते. ही त्यांच्याकडची सगळी शिदोरी या काबुलीवाल्याने आपल्याला दिली. बॉलीवूडच्या इतिहासात या काबुलीवाल्यासाठी एक मानाचे सोनेरी पान तयार झाले.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा