‘आलेकालेकालेका..... काय रं ही बातमी?’ चावडीवर बसलेल्या गणपानं तोंडात बोटंच घालत बातमीची वाच्यता केली तंवा समदी मान्याची वाडी कान टवकारून बसली. ‘म्हणं लस घेतल्यानंतर अंगाला चिकटली भांडी? नाशिकमधल्या व्यक्तीचा दावा?’
मान्याच्या वाडीत निसती कुजबूज सुरू झाली. ‘च्यामायला... या लशी घीऊनशान माणसाचं चुंबक हुतंय की काय?’ बायका नवºयांना दरडावू लागल्या, ‘उगा कायबायी बोलून चिकटायचं कारान शोदू नका हं...’ तर नवरेमंडळी उत्तर देत होते, ‘अगं पण म्या चिकटायला आलो न्हाई पण तुज्यातच चुंबक असलं, तर तूच मला खेचून घिशील त्याचं काय?’ ‘जावां तकडं... वाईच सोशल डिस्टन्स ठिवाच.. आवं या करोनामुळे अशी चिकटा चिकटी हुती म्हणून तर ते सोशल डिस्टन्स ठिवाय सांगितलंय न्हवं?’
पण दिवसभर त्या भांडी चिकटण्याच्या बातमीमुळे मान्याच्या वाडीत अनेकांनी भीती घेतली होती. कुणी येऊन चिकटलं, तर आणि कोणी चिकटायचं निमित्त काढलं तर? आज भांडी चिकटली, उद्या आणखी काय चिकटलं तर काय करा? च्यामायला हा कोरोनाचा रोग हाय का चिकट्या रोग हाय? लस घेतली, तर भांडी चिकटतात म्हंजी चमत्कारच म्हणायला हवा. पर आपल्या गावात असलं काय बी घडता कामा नये. आपण नेमीच येक नंबरवर असतो. आपण आजच उपाययोजना करून मान्याची वाडी चिकटमुक्त करायची. कोरोनापाठोपाठ जर हा चिकट्या रोग मान्याच्या वाडीवर पडला, तर लई घोटाळा हुईल. तवा सबसे तेज मान्याच्या वाडीत आता कायतरी उपाय केलाच पायजे.
समदे गावकरी सरपंचाकडं गेले, अन् कायतरी उपाय अदुगरच केला, तर बरं हुईल. आपल्या गरामपंचायतीत असलं काई हुया नकं म्हणून आळीपाळीनं परत्येकानं सरपंचाचं टकुर कुरतडलंच. आखीर सरपंचानं मिटींगची नोटीश काडली अन् समदं ग्रामपंचायत सदस्य मिटींगला जमले.
या मिटींगला विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त हेमा (हेडमास्तर) चालू हेमा यांना उच्चशिक्षित म्हणून बोलावलं होतं. ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी सगळं मिटींगला हजर होते. सरपंचांनी प्रस्तावना केली. ‘माज्या समद्या सहकारी बंधू आणि भगिनींनो. आपला देश येका फार मोट्या संकटातून जात आहे. असं म्हणत्यात की संकटं येका पाटोपाट येतात. तसं त्या संकटावर मात कराया जातुय तर नवीनच कायतरी उपटतय.... आपल्या राज्यातील नाशिकमदे घडलेली घटना लई ताजी हाय. काय तर म्हणे, लसीचे दोन डोस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याचा प्रकार उघड झाला आहे. आपल्या राज्यातील महान टीवीचॅनेलनी दिवसभर या बातमीचा धुमाकूळ घालून जनतेला हादरा दिला. लसीचे दोन डोस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याचा प्रकार उघड झाला आहे. तसा प्रकार आपल्या मान्याच्या वाडीत घडला आहे का बगाय हवं. तसं काई असल, तर त्यापासून काही धोका हाय का हे बगाय हवं. यासाठी आज ही तातडीची मिटींग बोलावली आहे.’
सरपंचानं दमात प्रस्तावना केली अन् म्हणाले, यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आपण चर्चेतून, लोकशाही मार्गाने यावर मार्ग काडायचा आहे. त्यासाटी गावातील तज्ज्ञ सेवानिवृत्त हेडमास्तर आणि चालू हेडमास्तर यांना मार्गदर्शनासाठी मुद्दाम बोलावलं आहे. आपला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारानं चाललेला हा माराष्ट्र आहे. म्हणून आपल्या गावात काई वंगाळ हुता कामा नये, यासाटी सनदशीर मार्गानं हा रोग मान्याच्या वाडीत येण्यापूर्वीच रोखला पायजे.’
‘पर या मोहिमेला नाव काय द्याचं?’ उपसरपंचांनी विचारताच सेवानिवृत्त हेमा म्हणाले, ‘चुंबक चिकित्सा’. याला चुंबक चिकित्सा असे आपण नाव देऊ. सर्वांना हा शब्द आवडला आणि चुंबक चिकित्सा मोहिम कशाप्रकारे चालवायची याबाबत खलबतं सुरू झाली.’
विरोधीपक्ष नेता जित्याभाऊ उभा राहिला अन् म्हणाला, ‘गावातली ही चुंबक चिकीत्सा पुर्ण हुईपातुर सन्माननीय सरपंचांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांप्रमाणे अधून-मधून शक्य झालं, तर रोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधावा.’
‘आॅबजेक्शन मीलॉर्ड...’ सदस्य दत्ताभाऊ माने म्हणाले, तसे सगळे हासायला लागले. सरपंच खिल्ली उडवत म्हणाले, ‘आपण पंचायतीच्या मिटींगला आहोत, कोर्टात न्हाई... आॅबजेक्शन कसलं घिताय? बिनधास्त काय हाय ते मनात बोलून टाका.’
‘म्हंजी मला असं म्हणायचंय की, गावातली किती माणसं फेसबुकवर असत्यात? प्रत्येकाकडं त्याची सुविधा आहे का?’
फेसबुक लाईव्ह केल्यावर आपल्याला कोण बगनार नाही, याचं लईच दु:ख सरपंचाला झालं. त्यानं तातडीनं फर्मान सोडलं, ‘आजच्या आज मान्याच्या वाडीतील परत्येकाचं फेसबुक अकौंट ओपन करावे. त्यासाटी ग्रामपंचायतीच्या निधीची तरतूद करावी.’ सगळ्यांनी माना डोलावल्या. आता या निधीच्या माध्यमातून सरपंच एखादा घोटाळा करील अन् त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणता येईल, याचे स्वप्न जित्या पाहू लागला. आपल्या जाळ्यात सरपंच अडकल्याने खूश झाला. तिवड्यात महिला सदस्य पारूबाई लाजत म्हणाल्या, ‘पर ते तुमी चुंबन चिकित्सा कशी करणार ते सांगा ना अदुगर..’ अन् अशी काही पारूबाई लाजली की, सगळ्यांच्या नजरा घायाळ झाल्या. तसे हेमा म्हणाले, आपण गावात कुनाचंही चुंबन घेणार नसून, चुंबक चिकित्सा करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी दोन दोन डोसे खाल्ले आहेत, म्हंजे दोन दोन लसी टोचून घेतले आहेत, त्यांच्या अंगाला काय-काय चिकटते याची तपासणी करायची.’
पर नेमकं करायचं तरी काय? बंडुतात्यांनी विचारलं. तसे हेमा म्हणाले, त्याचे एक मॉडेल तयार केले आहे. यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या जागेत एक मांडव घालायचा. ज्यांनी लसी घेतल्या आहेत त्यांना तिथे बोलवायचे आणि चमचे, उलथनी, नाणी, अशी चिकटवून पहायची.’
जित्याभाऊ म्हणाला, ‘माझी एक उपसूचना आहे यासाठी. मांडवाचा खर्च करण्यापेक्षा ग्रामपंचायतीच्या टीमनं घरोघर जाऊन चिकटवायचा प्रयत्न करावा.’
आवं दुसºयाच्या घरात जाऊन अशी चिकटाचिकटी करायची म्हंजी नितीमत्तेला सोडून हुईल. दत्ताभाऊ म्हणाले तसा उसळत जित्या म्हणाला, ‘मंग उगड्यावर चिकटाचिकटी करायची हे नितीमत्तेला धरून असंल का?’
सरपंच म्हणाले, ‘यावर सनदशिर मार्गाने आमी तोडगा काडलाय. ग्रामपंचायतीच्या खर्चानं ताटं, वाट्या, भांडी, चंमचे, उलथनी आणायची आणि बायकांनी बायकांना आणि पुरुषांनी पुरुषांना चिकटवायची. म्हंजी काय घुटाळा हुणार नाय. ज्या कोणा लस लाभार्थीला भांडी चिकटतील त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करून सगळ्या चॅनेलवर त्याचे दर्शन घडवले जाईल. त्याच्या उपचारांचा खर्च ग्रामपंचायत करील. ही चुंबक चिकित्सा मोहिम यशस्वी करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली हाय... तवा आजच सगळ्यांनी निर्धार करा माझी चुंबक चिकित्सा, माझी जबाबदारी.’
ही माहिती गावात जाताच परत्येक घरातली बाई नवºयाला दरडावत हुती, ‘मला तुमाला टिवीवर पायचं हाय... तवा कायबी करून भांडी चिकटली पायजेत. तोवर माज्या अंगाला हात बी लावून द्यायची नाय.... उद्यापासून साबनाऐवजी डिंक, फेविकॉल कायबी लावून आंगोळ करा पण भांडी चिकटली पायजेत.’
- प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा