एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असे म्हणतात. त्यात थोडी सुधारणा करून युद्धात, प्रेमात आणि टीव्हीवरच्या मालिकांत सगळं काही माफ असतं असं म्हणावं लागेल. याचे कारण गेल्या काही दिवसांतील झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील दाखवलेल्या घटना, ओम स्वीटूचे प्रेम प्रकरण, मालविकाची कारस्थाने पाहिल्यावर याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कसलाही विचार करू नका, डोकं, बुद्धी , विचार बाजूला ठेवा आणि आम्ही जे दाखवतो आहे ते मुकाट्याने पाहा असे ही मालिका सांगते.
अंबरनाथ ते मुंबई हे अंतर जेमतेम पाच मिनिटांचे असावे आणि घरातनं परसात जावं त्याप्रमाणं स्विटू घटकेत घरात आणि घटकेत मुंबईत पोहोचत असते. तिला भेटायलाही ओम मिनिटात मुंबईतून अंबरनाथमध्ये पोहोचतो. काळ, वेळ, अंतर या सगळ्याला फाटा देत ही मालिका घुसडत आहे. अक्षरश:. म्हणजे एका भागात ओम लंडनला चाललेला असतो. त्याचे विमान सुटायला काही मिनिटांचाच अवधी आहे. तेवढ्यात स्विटू आणि चिन्या गाडी घेऊन जातात. गाडी बंद पडते, पोलीस अडवतात, यात वेळ जातो, शेवटी काही किलोमीटर अंतर स्वीटू पळत पळत जाते आणि विमानतळावर पोहोचते. या कालावधीत ओम फक्त विमानतळाच्या गेटमधून आत गेलेला असतो. ओमला गेटमधून आत जाण्यास जेवढा कालावधी लागतो तेवढ्या काळात स्वीटू अंबरनाथमधून येते, काही किलोमीटर जोरात पळत येते. किती मस्त ना? डोकं चालवू नका, गतीच्या आणि काळाच्या कसल्याच परिमाणात हे गणित बसणारे नसले तर निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकारांना मान्य म्हटल्यावर मुकाट्यानं पाहायचं. गंमत म्हणून. विमानतळावर आल्यावर स्वीटू केसांची गाठ मारते आणि समोरची काच तोडून आत प्रवेश करते. खरं तर सरळ दारानं आली असती, तरी तिला कोणी अडवलं नसतं; पण अशी काच फोडलेली आम्ही पूर्वी हिंदी चित्रपटात पाहिली आहे. म्हणजे खलनायक नायिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हिरो काच फोडून त्या बंगल्यात प्रवेश करतो. असे प्रकार अनेकांनी केले आहेत. अमिताभ बच्चनने मुकद्दर का सिकंदरमध्ये तोडली आहे, मिथुन, गोविंदा यांनीही अशाप्रकारे काच फोडलेली आहे. जॅकी श्रॉफने आपल्या पहिल्याच हिरो या चित्रपटात तोडली आहे. त्या स्टाईलने विमानतळाच्या प्रवेशद्वाराची काच फोडून स्वीटू जाते. विमानाच्या अनाऊन्समेंटचा ताबा घेते आणि तिथे विमानतळावर आपले प्रेम जगासमोर व्यक्त करते. फक्त आईला सांगायचे धाडस तिच्यात नसते. किती मजेशीर ना हे?
वडिलांचा डबा विसरला म्हणून परसात जावे, त्या थाटात पाच मिनिटात ती अंबरनाथमधून मलबारहिलसारख्या मुंबईतील एरियात पोहोचते आणि डबा देऊन घरी पण येते. भूगोल, नकाशा, अंतर याचे काही प्रमाणच नाही. एअरपोर्टवरून थेट अंबरनाथच्या दिशेने स्वीटू आणि ओम निघतात. मालविका घरातून मोहितला ते अंबरनाथला पोहोचले नाही पाहिजेत, त्यांना अडव सांगते. हा त्यांच्या आधी दोन मिनिटात तिथे पोहोचतो, त्यांची गाडी बिघडवतो. मग स्वीटूचे ते फॅन्सी ड्रेसचे कार्यक्रम ढाब्यावर सुरू होतात. सरदारजीच्या वेशात, दाढी लावून ओमजवळ सरदार म्हणून वावरते. ढाब्यावर काय सरदारजी आपले कपडे उतरवल्याप्रमाणे दाढी उतरवून ठेवतात का?; पण प्रेक्षकांनी विचार करायचा नाही, कारण प्रेमात, युद्धात आणि मालिकेत सगळं माफ असतं.
ओम आणि स्वीटू डेटवर आले आहेत. हॉटेलात पहिल्यांदा मित्र भेटतो, म्हणून ते तिथून निघून येतात. तिथे मोहित पाठलाग करतो आहेच. मोहितला बिल दिले नाही म्हणून वेटर थप्पड मारतो, यात टाईमपास होतो, मग दुसºया ठिकाणी येतात तर कोणीतरी आपल्याला पाहिलं आहे म्हणून दोघं तिथून निघतात, मोहित कुणाचं तरी शूटिंग करतो आहे म्हणून एक मुलगी पाहते आणि त्याला वाजवते, त्याचा मोबाईल काढून घेते. यात इतका वेळ जातो तरी अंबरनाथच्या भिकूच्या वड्याच्या गाडीजवळ मोहित यांच्या अगोदर तिथे पोहोचतो आणि वडापाव खातो. तिथे मालविकाचा फोन येतो म्हणून क्षणात मालविकाच्या समोर हजर राहतो. तोंडाला लागलेला वडापावचं खरकटंही त्याच्या गेलेले नसते हे मालविका त्याला दाखवते. दोन अडीच तासांचं अंतर हा क्षणार्धात कसे काय कापतो? विचार करायचा नाही.
भिकूच्या वडापावच्या स्टॉलवर ओम स्वीटू आहेत समजल्यावर चिन्या रॉकीला सांगतो आणि सगळे जण तिथे जमतात. तिथला भिकूचा वडापाव घेऊन ओम आईला मिनिटात नेऊन देतो. त्यानंतर शकू स्वीटूला व्हिडीओकॉल करते आणि ओमसाठी आपला उपास असल्याचे सांगते. शकूबरोबर स्वीटूही उपवास करते; पण तो चोरून करते. सकाळी उठल्या उठल्या स्वीटूची काकू चहात साखर घातली का बघ पाहण्यासाठी स्वीटूच्या हातावर पाणी टाकते; पण उपवास असल्याचे कारणाने ती ते ओतून देते आणि साखर आहे सांगते. पुढे बुंदी, चिवडा, शेव असे काही खाण्याचे टाळते, वडिलांना आॅफीसला जायला डबा देते. त्यानंतर संध्याकाळी शकू येते. शकू नलूचे भांडण मिटते. मग तोंड गोड करण्यासाठी चहा केला जातो. त्या चहात साखरच विसरलेली असते. तर स्वीटूला काकू विचारते की, तू चव बघितली होती ना? चहाच्या पाण्याची चव पाहिली सकाळी, चहा दिला संध्याकाळी, तोपर्यंत तो शिळाच करून ठेवला होता का? स्वीटूचा उपवास सोडण्यासाठी ओम येतो. भरपूर लख्ख लायटींग करतो. स्वीटूच्या घरात घडते. पत्र्याचे चाळीचे बैठे घर आहे त्यांचे, त्यात टेरेस कुठून आला? इतके लायटींग कुठून आले? पण.... शू... कुठं बोलायचं नाही, कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड टीव्ही सिरीअल.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा