मुक्काम पोस्ट मान्याच्या वाडीतील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ४ जूनला पत्र येऊन पडलं. राज्य सरकारच्या आदेशानुसार आलेलं पत्र. सरपंच, ग्रामसेवक, पंचायतीचे सदस्य जमले आणि पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. ग्रामसेवकाने पत्र वाचन सुरू केले, ज्याअर्थी ५ जून हा दरवर्षी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो त्याअर्थी तो आपल्या देशात, आपल्या राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गट आणि गणावर आणि ग्रामपंचायतीच्या विभागात साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्याबाबत पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार,
ज्या अर्थी हा दिवस पर्यावरण दिवस आहे, त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात वक्षारोपण करण्यात यावे.
सगळे जण इथे जरा चाचपडले. शासकीय भाषा तशी समजण्यास अवघडच असते. सदर, इसम, ज्या अर्थी, त्याअर्थी, शासन, प्रशासन, या अर्थहीन शब्दांमधून हा नवा शब्द कुठला आला? वक्षारोपण करायचे म्हणजे नक्की काय? म्हणजे आजकाल हृदयरोपण, फुफुसरोपण, मुत्रपिंडाचे रोपण केलेल्या शस्त्रक्रिया ऐकल्या होत्या; पण हे वक्षारोपण कसे करायचे? कोणी करायचे हा सगळाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. ग्रामसेवक त्या वक्षारोपणापाशीच चाचपडला तसे सगळेच हसू लागले. सरपंच म्हणाले, ‘आवं गरामसेवक, ते वक्षारोपण न्हाई...वृक्षारोपण असल... नीट वाचा...’
ग्रामसेवक नरमाईनं म्हणाला, ‘पण सरपंचसाहेब या पत्रात स्पष्ट आदेश आहेत ते ५ जून रोजी सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या भागात वक्षारोपण करावे असंच म्हनलं हाय...’
सरपंच मिश्किलपणे म्हणाले, ‘आवं ती प्रिंटींग मिश्टिक असू शकेल... ते व ला खाली उकार द्यायचा राहिला असेल.’
‘उकार नाही... रूकार... कृकार... उकार दिला तर वुक्ष होईल... वृक्ष साठी व ला कृ जोडावा लागतो.’ सेवानिवृत्त मास्तरांनी स्वीकृत कोट्यातून सदस्यपद मिळाल्यावर आपले ज्ञान पाजळले.
सरपंच म्हणाले, ‘ते काय बी असूदे... आमी आडाणी मानसं. रू लावा नाहीतर कृ लावा...कायबी लावा पण सरकारनं वृक्षारोपणाचे आदेश काडले हायत... आपल्याला तो कार्यक्रम करावा लागंल.’
तसा विरोधीपक्षनेता जित्या माने उठला आणि म्हणाला, ‘आपल्या ग्रामपंचायतीनं सम्मानननीय राज्य सरकारचे आदेश पाळून जे काम करायला सांगितलं आहे तेच करावं, असं आमचं म्हणणं हाय. शासकीय पत्रात कुठंबी वृक्षारोपण असं म्हटलेलं नाही. सरकारने वक्षारोपण असं म्हटलं आहे. जोपर्यंत शासनाकडून ही चूक आहे, वक्ष नाही तर वृक्ष आहे असा जाहीर खुलासा होत नाही तोपतुर हा कार्यक्रम करता येणार न्हाई. आमी याला विरोध करू.’
जित्यापाटील आपल्या दोन सदस्यांच्या गटाबरोबर उठला आणि घोषणा देतच पंचायतीसमोरच्या पारावर जाऊन भाषन कराय लागला. ‘मान्याच्या वाडीतील समस्त ग्रामस्थांनो.... हे सरकार सर्वसामान्य जनतेची सातत्याने भूल करत आहे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे, परंतु यानिमित्ताने पर्यावरणाचे कार्यक्रम घेणे अपेक्षित असते. पण या सरकारला त्याची काही पडलेली नाही. सरकारनं ५पाच जूनच्या कार्यक्रमाचे आदेश ४ जूनच्या संध्याकाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पाठवले आहेत. इतक्या कमी कालावधीत कार्यक्रमाची तयारी कशी केली जाणार आहे? वक्षारोपण करावं, असे आदेश राज्य सरकारने दिलेले असताना ते नेमके कसे करावे, कुणी करावे, कुठे करावे याबाबत कसल्याही मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने दिलेल्या नाहीत. सगळ्या पातळीवर अस्पष्ट भूमिका घेणाºया या निष्क्रिय सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत. माझी तमाम ग्रामस्थांना विनंती आहे की, राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसारच हा कार्यक्रम होईल आणि त्याला सोडून दुसरा कोणताही कार्यक्रम ग्रामपंचायतीने केला, तर तो आदेशाचा भंग केल्याचा प्रकार होईल. सबब कोणीही सरकारच्या आदेशाविरोधात जाण्याचे काम करू नये, येवढीच माझी माझ्या ग्रामस्थ बंधूभगीनींना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मान्याची वाडी.’
झालं. गावात कुजबूज सुरू करायला नवीन विषय मिळाला. चावडी, पार, यादवाचं सलून, नदीवरचा घाट, पानाची टपरी अशा ठिकठिकाणी चर्चा चर्चा अन चर्चा. ती पण फकस्त वक्षारोपणाची.
यादवाचा अंता आपल्या सलूनमध्ये एका गिºहाईकाच्या तोंडाला फेस आनून मागच्या मानसाला इचारू लागला, ‘पण म्या काय म्हंतो बंडोपंत, हे वक्ष म्हंजी काय हो? ’
‘आरं वक्ष म्हंजी छाती... छातीला इंग्लिशमध्ये वक्ष म्हणतात...’ बंडोबानं अक्कल पाजळली.
तसा तोंडाला फेस असलेल्या त्या गिºहाईकानं तोंड उघडलं अन् म्हणाला, ‘आवं इंग्रजी नाय वो संस्क्रीतमधी असल.’
‘काय बी असंन का... इंग्रजी अन संस्क्रीत या दोनच भाषा आपल्याला समजत न्हाईत ना...’
‘अस्सं हाय व्हय? लई भारी बरका सरकार... वक्षारोपण केलं पायजे म्हंजी सरकारला म्हणायचं हाय गावातली सगळी तरुन मंडळी आक्षी बॉडीबिल्डर झाली पायजे. ही येकेकाची भरदार छाती असली पायजे...’ अंता यादवानं अक्कल पाजळलीच. तसं ते गिºहाईक पुन्हा बोललं, ‘परत्येकाचं ते सिक्स पॅग झालंच पायजे.’
‘बराबर हाय... सिक्स पॅग हानायचं म्हंजे रोज दोन दोन कॉर्टर हानायलाच पायजेल... शिक्शटी शिक्शटीचे तीन पॅग येका कॉटरमध्ये हुत्यात मग सिक्स पॅगसाठी दोन दोन कॉर्टर हानाव्या लागतील.’
नदीवर कापडं धुता धुता बाया फिदीफिदी हासत हुत्या. पारूबाई म्हणाली, ‘या बया... काय म्हणावं आता या सरकारला? पुरुषांची छाती वाडवन्यासाठी सरकार प्रयत्न करतंय? ते टीवीवर दाकिवत्यात ना? चला... हवा यीउद्या.. त्यात त्यो भाऊ कदम, त्यो कुशल बद्रिके लुगडं नेसून येतात तशे गावातले समदे पुरुष छाती वाडवून काय लुगडी नेसनार काय?’ समद्या बाया फिदीफिदी हसायला लागल्या अन् गावात निसती वक्षारोपणावर चर्चा चालू होती.
आसं म्हणतात पर्यावरण सुंदर आसल, तर माणसं हासत खेळत असतात. सरकारचा हा आदेश आल्यापासून मान्याच्या वाडीत जो तो नुसता हासत होता. कुनी सिस्क पेग मारायला मिळणार म्हणून खूश होता. कुनी दारूबंदी उठवण्यासाठी हा सिक्स पॅगच जुमला या सरकारनं केला म्हणत होता; पण सरकारी आदेशातील एका उकाराच्या चुकीमुळे मान्याच्या वाडीत वृक्षारोपण झाले नाही अन् वक्षारोपणाचे स्वप्न रंजन करत कुणी सिक्स पेग मारत होते, तर कुणी आणकी काय करत होते.
प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा