दिल्लीत सध्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी शरद पवार सक्रिय झालेले आहेत. भाजप आणि काँग्रेसला लांब ठेवून तिसरी आघाडी काढण्याचे हे प्रयत्न आहेत. अर्थात हे प्रयत्न आज नाही तर गेल्या पंचवीस वर्षांत अनेकवेळा झालेले आहेत, पण तिसरी आघाडी कधी निर्माण झाली नाही आणि यशस्वीही झालेली नाही. राज्यातही अशा प्रकारचा प्रयोग झाला होता. तोही फसलेला होता. त्यामुळे शरद पवार जरी यासाठी जोरदार बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरले असले, तरी अशी कोणतीही आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता कमीच आहे.
राज्यात किंबहुना मुंबईत सरकार पाच वर्षे टिकण्याच्या, कोसळण्याच्या चर्चेला उधाण आले आहे, तर दुसरीकडे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दहा दिवसांत दुसºयांदा भेट झाली. त्यामुळे तीन वर्षांनंतरच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसºया आघाडीच्या चर्चेला आताच सुरुवात झाली. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या फेरजुळणीच्या शक्यतेने जोर धरला. आठ महिन्यांतच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. पंधरा किंवा अधिक पक्षांच्या आघाडी सरकारचा अनुभव चांगला नाही. पाच वर्षांत दोन पंतप्रधानांचा अनुभव देशाने घेतला आहे. त्यामुळे तिसरी आघाडी कोणी फारशी मनावर घेत नाही. किंबहुना अशा तिसºया आघाडीची शक्यता निवडणुकीनंतर निर्माण होते. जेव्हा त्रिशंकु कौल मिळतो. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नाही, मुख्य पक्ष सत्तेपासून दूर जातात तेव्हा अशा शक्यतांना, प्रयत्नांना जोर धरतो. १९९६ ला अटलबिहारी वाजपेयींचे सरकार १३ दिवसांत कोसळले आणि पुन्हा निवडणुका घेण्याची नामुष्की नको म्हणून एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेसाठी तिसरी आघाडी आली होती, पण तिसरी आघाडी हा कधीच पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात, पण या वस्तू अल्पजीवीच असतात. कुठे भुश्यापासून, तुकड्यांपासून काही वस्तू तयार केल्यावर त्या काही काळ प्रदर्शनात ठेवण्यापुरत्या किंवा यूज अँड थ्रो अशा असतात तसाच प्रकार या आघाडीचा असतो. सगळीकडून नाकारलेले, टाकलेले, अत्यंत कमकुवत असे तुकडे तुकडे पक्ष एकत्र येऊन किती टाके घालून केलेली ही गोधडी असते. गोधडीत जुनाट कपडे घातलेले असतात. त्यामुळे ती केव्हा कुठून फाटेल हे सांगता येत नाही. तसाच प्रकार अशा आघाडीचा असतो. म्हणूनच आज कितीही हे उड्या मारत असले, तरी अशी आघाडी अस्तित्वात येणे अशक्य आहे. काँग्रेस किंवा भाजपला सोडून सरकार बनवणे आज तरी कोणालाही शक्य होणार नाही. अगदी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे संख्याबळ जास्त असले तरी जोपर्यंत काँग्रेसला सोबत घेतले नाही तोपर्यंत महाविकास आघाडी अस्तित्वात आली नाही. त्यामुळे या दोन पक्षांना कितीही नाकारायचे म्हटले तरी त्यांच्याशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही. त्यामुळे अशी आघाडी हे दिवास्वप्नच राहील असेच चित्र आहे.
खरं तर अनेक पक्षांचे सरकार अनेक तडजोडी करून वाजपेयींना चालवता आले, पण आता तेवढ्या ताकदीचा नेता तिसºया आघाडीला मिळणार का? पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेसला नाही, पण भाजपविरोधात निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा पर्याय काँग्रेससहित कोणत्याही पक्षासमोर नाही. त्यामुळेच तिसºया आघाडीची फेरजुळणी करण्याची चर्चा होत राहणार. निवडणूक जवळ येत जाईल, तशी ती वाढणार, पण तिसरी आघाडी अस्तित्वात येईल की नाही? हे आज खात्रीने सांगणे कठीण आहे. त्यातून या आघाडीचे नेतृत्व शरद पवारांकडे राहील की नाही याचीच शक्यता आहे. शरद पवार कितीही मोठे, जाणकार, अनुभवी नेते असले, तरी त्यांच्याकडे त्यांच्या इतिहासात असलेले संख्याबळ पाहता, त्यांना राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आलेले अपयश पाहता संपूर्ण आघाडीचे नेते म्हणून त्यांना कोणी मान्यता देईल हेच अशक्य आहे. त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण होणे म्हणजे आत्याबाईला मिशा आल्याची वाट पाहण्यासारखे आहे.
मोदी-ठाकरे, पवार-फडणवीस यांच्या भेटी, सरनाईकांचे पत्र यांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या टिकण्याविषयी जोरात चर्चा होते आहे. सरनाईकांच्या पत्रानंतर भाजपच्या नेत्यांचे ठाकरेंनी भाजपकडे वळण्याचे सल्ले वाढले. सरकार टिकण्याविषयी संशयाचा धूर दिसला तरी ना हे सरकार आत्ता कोसळणार आहे, ना तिसरी आघाडी येण्याची शक्यता आहे. तिसरी आघाडी आणताना तुमच्याकडे कार्यक्रम काय असणार आहे? केवळ काँग्रेस नको, भाजप नको म्हणून ही आघाडी यावर कोणी विश्वास ठेवत नाही. १९९६ ला तिसरी आघाडी आली तेव्हा हिंदुत्ववादी भाजपला सत्तेपासून लांब ठेवणे या एका इराद्याने सगळे एकत्र आलेले होते. तुमचा हेतू शुद्ध असला तर अशी कोणतीही आघाडी तयार होते, टिकते, पण हा नको, तो नको म्हणून आम्ही असले समीकरण कधी जुळत नसते. आज ज्यांना या आघाडीच्या चर्चेसाठी बोलावले आहे त्यामध्ये प्रत्येकाकडे कुठली ना कुठली सत्ता आहे. त्यांच्या त्यांच्या राज्यात स्वबळावर सत्ता आहे, पण तिसºया आघाडीचे प्रवर्तक असलेल्या शरद पवारांकडे कधीच स्वबळावर सत्ता नव्हती. त्यांना हे नेतृत्व कोण करून देईल. जो नेतृत्व करेल तो पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार आहे. मग ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये सलग तिसºयांना निवडून आल्या आहेत. मोठ्या संख्याबळाने आलेल्या आहेत. त्या का पवारांचे नेतृत्व मान्य करतील? अशीच सर्वच राजकीय पक्षांची अवस्था असल्याने तिसरी आघाडी हे फक्त स्वप्नरंजन आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली तसलाच प्रकार आहे हा. राज्यात यापूर्वी रिडालोसचा प्रयत्न झाला होता, पण त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. मतदार अशांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण होण्याबाबत साशंकताच आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा