काही वर्षांपूर्वी बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते, तेव्हा मोदींनी पवारांचे खूप कौतुक केले होते. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना पवारांकडून अनेकदा सल्ले घ्यायचो, असे मोदी बोलून गेले होते. ते सल्ले नेमके काय होते हेच पवारांचे गणित होते; पण आपण राजकारणात पवारांचे बोट पकडतो हे मोदींनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे होते. पवारांचा प्रतिस्पर्धी भाजप किंवा मोदी कधीच नव्हते. त्यांना काँग्रेसला रोखायचे होते. राहुल गांधींना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू द्यायचे नव्हते. त्यासाठी एकच मार्ग होता की, आपण इतके मोठे व्हायचे की त्यापुढे काँग्रेस छोटी होईल; पण राष्ट्रवादी काँग्रेस इतकी छोटी राहिली की, ती राष्ट्रवादी न राहता महाराष्ट्रवादी कधी झाली हेच समजले नाही. म्हणजेच एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल, तर उपाय एकच असतो, तो म्हणजे समोर दुसरी मोठी रेषा काढणे. आपोआप ती दुसरी रेषा सापेक्षतावादाने छोटी होते. त्याचप्रमाणे मोदींच्या नावाने भाजप वाढत असेल आणि काँग्रेस संपत असेल, तर त्याला प्रोत्साहन देण्याचे काम म्हणजे शरद पवारांनी आखलेली दुसरी रेषा होती.
सगळ्या पक्षांच्या भाजपविरोधातील आघाडीसाठी शरद पवारांचा वेगळाच फॉर्म्युला समोर येताना दिसत आहे. तरीही मोदी आणि शरद पवारांचे राजकारण एकमेकांना मदतीचे होताना दिसते आहे. काँग्रेसला बाजूला सारून नवी आघाडी निर्माण करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याशी केलेली हातमिळवणी आणि सल्लामसलत हे त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे ही काँग्रेसला लागलेली अखेरची घरघर म्हणावी लागेल. २०२४च्या म्हणजे अजून तीन वर्षांनी येणाºया निवडणुकीपर्यंत काँग्रेस सावरली नाही, तर तिचे विसर्जन केले असेच म्हणावे लागेल. त्याचे खांदेकरी पवार आणि मोदी हे दोघे असतील.
शरद पवारांचे गणित आणि नीती कोणाला कधी समजली आहे का? अनेकवेळा यापूर्वी अनेकांनी म्हटले आहे की, शरद पवार यांचे हो हो, म्हणजे नाही नाही आणि नाही नाही म्हणजे हो हो. अगदी नारायण राणे यांनीही दोन दिवसांपूवीं हेच विधान केले होते, परंतु पवारांची ही प्रवृत्ती सगळीकडे लक्षात आल्यावर त्यांनी ना हो, हो ना असा नवा गेम सुरू केला आहे. या गेममध्ये सर्व दगडांवर पाय ठेवून स्वत: सेफ झोनमध्ये राहण्याचा फॉर्म्युला त्यांनी जोपासला आहे. शरद पवार आपल्यापासून भांडून गेले, तरी अखेरच्या टप्प्यात ते आपल्या बाजूने उभे राहतील असा विश्वास गांधी मायलेकरांना आहे. म्हणजे तसा इतिहासच आहे, म्हणजे सोनिया गांधींच्या विदेशीचा मुद्दा करून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली असली, तरी कायम छोट्या भावाची भूमिका निमुटपणे स्वीकारली आहे.
सोनिया गांधींकडे पंतप्रधानपद जाऊ नये, म्हणून बाहेर पडणाºया शरद पवारांनी १९९९च्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, विरोधीपक्ष नेतेपद सोनिया गांधींकडे जात असताना, त्याला मात्र विरोध केला नाही. हे न उलगडणारे कोडेच होते; पण शरद पवारांनी धीर सोडला नव्हता, कारण १९ वर्षांत भाजप जर सत्तेपर्यंत पोहोचतो, तर आपल्यालाही ते अशक्य नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच पक्षाला २२ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत, तिसºया आघाडीचे वेध लागले आहेत. काँग्रेसचे पंख छाटायचे वेध लागलेले आहेत. कुठूनतरी सत्तेत आपण टेकू देत राहिले, म्हणजे त्याचा आधारस्तंभ होता आले पाहिजे. त्या महालापेक्षा आधारस्तंभाचे महत्त्व वाढले पाहिजे हे शरद पवारांनी जाणले.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यावर काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित झाले. सोनिया गांधींकडे सगळे काँगी पंतप्रधान म्हणून पाहू लागले. त्यावेळी शरद पवारांनी नरो वा कुंजरोवा, अशी भूमिका घेतली. भाजपकडून आणि अनेकांकडून सोनिया गांधींना विरोध होत असताना, मौन सर्वार्थ साधते या न्यायाने त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. कारण, या सरकारला आपल्या आठ-नऊ खासदारांचे समर्थन देऊन सरकारमध्ये महत्त्वाचे पद पदरात पाडून घेणे हे त्यांचे तेव्हाचे ध्येय होते. सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा दावा सोडला आणि डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. तिथे दुसºया नाही, तर तिसºया क्रमांकावर शरद पवारांचे नाव मंत्रिमंडळात आले. कारण, प्रणव मुखर्जींसारखे दिग्गज तिथे होतेच; पण या एक दोन मंत्रीपदाचा लाभ उठवत आपण पुढचे ध्येय गाठायचे हे शरद पवारांचे धोरण होते; पण जॉन जानी जनार्दन किंवा अमर अकबर अँथनी असे स्वरूप असलेल्या राष्टÑवादीच्या या त्रिकुटाने ज्याप्रकारे राष्ट्रवादीची निर्मिती केली त्या त्रिकुटाला राष्ट्रवादीचा प्रसार वाढवता आला नाही. तारीक अन्वर यांना राष्ट्रवादी त्यांच्या राज्यात वाढवता आला नाही. पी. ए. संगमा यांनी त्यांच्या राज्यात राष्टÑवादी वाढविली; पण नंतर तेही पावारांपासून दूर गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही महाराष्ट्रवादी अशीच राहिली. त्यामुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाºया शरद पवारांना २००९च्या निवडणुकीचे परिणाम दिसू लागले होते. एकीकडे काँग्रेस तेव्हा पुन्हा बाळसे धरत होती. काँग्रेसमधून महाराष्ट्रातलेच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे माजी मुख्यमंत्रीही केंद्रीय मंत्री बनले होते. काँग्रेस वरचढ होत होती. त्यामुळे आपले गणित बिघडत आहे याची जाणिव त्यांना झाली होती. पक्ष हारत होता, तरी हिंमत न हारता नवी नीती शरद पवारांनी आखण्यास सुरुवात केली. ते म्हणजे २०१४ला काँग्रेसपुढे बाहेरचे आव्हान उभे करायचे आणि त्यांनी मोदींना सल्ले देण्याचे काम केले. आता मोदींचे दुसरे सल्लागार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला येत आहेत, हे साधे गणित असेल का?
२००९ च्या निवडणुकीत महाराष्टÑातील काही उत्साही कार्यकर्ते भारताचे भावी पंतप्रधान असाच शरद पवारांचा उल्लेख करत होते. प्रसारमाध्यमांमधूनही तसे वर्णन येत होते. त्यावेळी भाजप नेतृत्वहीन झालेली होती. अडवाणींचे नेतृत्व सर्वमान्य होत नव्हते, त्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याने काँग्रेसने २००चा टप्पा पार केला होता. या निवडणुकीत राहुल गांधींना एका पत्रकार परिषदेत कोणीतरी प्रश्न विचारला होता की, शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान होतील का? त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिले होते की, त्यांचे जास्त खासदार निवडून आले, तर ते पंतप्रधान होऊ शकतात. आघाडीत ज्यांचे जास्त खासदार त्यांचा पंतप्रधान होईल. हा अपमान शरद पवारांच्या तेव्हा जिव्हारी लागला होता. त्याचवेळी आमचे खासदार तुमच्यापेक्षा जास्त होणार नाहीत; पण तुमचे खासदार आमच्यापेक्षा कमी कसे होतील हे पाहू, या विचाराने पवारांनी काम सुरू केले आणि २०१४ व २०१९ ला काँग्रेसला शक्य तितक्या खाली आणले गेले. आता २०२४ ला राष्ट्रवादीपेक्षा कमी खासदार संपूर्ण देशात कसे असतील याची रणनीती ते आखत आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी २०१९ ला मोदींचा पराभव करून आपण पंतप्रधान होऊ, असे जाहीर केले. त्यावर आघाडीतील कोणी फारसे बोलले नाहीत. फक्त मोदी आणि पवार हे दोघेच बोलले. त्यातून राहुल गांधींची खिल्ली उडवून २००९चा सूड पवारांनी घेतला. पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना फक्त बाजारात तुरी अन्... आधी तूर तर येऊ द्या असे सांगून, दिल्ली खूप दूर असल्याचे सांगितले. म्हणजे राहुल गांधींचे हे स्वप्न पूर्णच होऊ शकणार नाही, असाच होरा पवारांनी मांडला होता. ही पवारांची खेळी होती. आम्ही मोठे नाही झालो तर तुम्हाला लहान तर करू शकतो या भूमिकेने त्यांनी काँग्रेस लहान केली आणि आता ती संपवण्याचा विडा उचलला आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा