शुक्रवार, १८ जून, २०२१

फक्त गुंता वाढत गेला


गेल्या वर्षात देशात राजकारणात खळबळ माजवणाº­या ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे एक पर्व होते. सिनेसृष्टी आणि राजकारण यांच्यातील लागेबांधे आणि संबंध यातून पुढे आले. काल एक वर्ष पूर्ण झाले या प्रकरणाला; पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरितच आहे. सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? या वर्षपुर्तीनिमित्ताने अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी ठामपणे ही आत्महत्या नव्हती हे टीव्हीवर येऊन सांगितले. त्या देवमाणूस मालिकेत सरूआजी ज्या काँफिडन्सने हा कम्पाऊंडरच आहे, असे सांगत असते तोच आत्मविश्वास उषा नाडकर्णींमध्ये दिसत होता.


मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो आणि अंमलबजावणी संचलनालय या पाच यंत्रणांनी सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी केली; पण तपासात हाती काय लागलं? तर उत्तर एकच अजून तपास चालू आहे.

खरं तर मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं, तर सीबीआय तपासाबाबत अजूनही मौन बाळगून आहे. एनआयएचा तपास, बॉलीवूडमधील ड्रग्ज सिंडिकेटच्या दिशेने सुरू आहे. अंमलबजावणी संचलनालयाला आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या इच्छेने तपास करतो आहे. राजकारणाची पुंगी सगळ्या पक्षांची वाजवून झाल्याने आता त्यात कोणालाच रस वाटेनासा झालेला आहे, कारण त्या दरम्यान बिहारच्या निवडणुका होत्या. बिहार का छोरा म्हणून बिहारी नेत्यांनी त्याला खतपाणी घालून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत तपास करायला सुरुवात केली; पण अजून हाती काय लागले आहे? काहीही नाही. या दरम्यान काही सेलिब्रेटींनी, पत्रकारांनी मिरवून घेतले. कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांनी आपल्या मनातील किंवा कोणा राजकीय पक्षाने पुरवलेल्या मलिद्याचा मोबदला म्हणून गरळ ओकली; पण हाती काय आले आहे? एक वर्षानंतरही अजून तपास सुरू आहे.


एकेकाळी एका शोसाठी २५० रुपये घेणारा सुशांतसिंह हा खरोखरच ग्रेट अ­ॅक्टर होता का? असे काय त्याच्याकडे होते, तेव्हा त्याची कोणी हत्या करू शकतो? दुय्यम भूमिका करणाराच तो सुमार कलाकार होता. आमिर खानच्या पीकेमध्ये जरा लक्षवेधी असे पाकिस्तानी तरुणाची त्याची जेमतेम १० मिनिटांची भूमिका होती. धोनीवर काढलेल्या चित्रपटात धोनीचेच फाईल शॉट लावलेले होते. याशिवाय त्याचे असे कुठे लक्षात राहणारे खास चित्रपट होते? पवित्र रिश्तासारख्या मालिकेतून महिलावर्गासमोर छोट्या पडद्यावरून आलेला नट हीच त्याची खरी ओळख. त्याची भीती वाटेल, स्पर्धा वाटेल त्यामुळे त्याचे कोणी खच्चीकरण करेल, असे बिल्कुल वाटत नाही; पण यानिमित्ताने बॉलीवूडमधले राजकारण आणि राजकारणातील बॉलीवूड हे दोन्ही समोर आले खरे.

सुप्रीम कोर्टाने सुशांत मृत्यू प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सुपूर्द करून १० महिने पूर्ण होतील; पण चौकशीत काय निष्पन्न झालं? सुशांतची हत्या झाली का त्याने आत्महत्या केली? याबाबत सीबीआयने माहिती दिलेली नाही.


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार सीबीआयने चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली होती; पण सीबीआयचा अहवाल बाहेर येत नाही.

सीबीआयने रिया चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ, आचारी नीरज आणि दिपेश सावंत यांचे जबाब नोंदवले. सुशांतची हत्या झाली होती का? हे शोधण्यासाठी आॅल इंडिया इंन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली.


सुशांतच्या घरी १३ आणि १४ जूनच्या दिवसाचं नाट्य रूपांतर करण्यात आलं. डॉ. गुप्ता यांनी सप्टेंबर २०२० मध्ये रिपोर्ट सीबीआयला सोपवला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. गुप्ता यांनी, हे आत्महत्येचं प्रकरण आहे, त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, अशी माहिती दिली होती. या तपास प्रकरणाचा फायदा घेत झी मराठीनं काय घडलं त्या रात्री ही मालिकाही सुरू केली; पण त्या मालिकेला टीआरपी मिळत नसल्याने ती मध्येच बंद करावी लागली. त्यामुळे सुमार विषयाचे महत्त्व किती वाढवायचे याचे उत्तर प्रेक्षकांनी म्हणजेच सामान्य माणसांनी दिले, याची जाण आता राजकारणी आणि बॉलीवूड अभिनेत्यांनी घेतली पाहिजे.

सीबीआयने तपास कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचला याबाबत भाष्य केलेलं नाही. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आता सीबीआयचे संचालक आहेत. त्यामुळे सुशांत मृत्यूप्रकरणी पुढचा निर्णय त्यांच्या हातात आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने प्रिव्हेंशन आॅफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत सुशांतच्या पैशांचा अपहार झाला का? याची चौकशी सुरू केली. ७ आॅगस्ट २०२० ला रियाची चौकशी करण्यात आली. रियाची मॅनेजर, सुशांतचा माजी हाऊस मॅनेजर यांचीदेखील चौकशी झाली. महिनाभराच्या तपासानंतर रियाविरोधात मनी लाँडरिंगचा पुरावा मिळाला नाही. रिया ही सुशांतच्या पैशांची हेराफेरी करत असल्याचा पुरावा नसल्याची माहिती, ईडीच्या सूत्रांनी दिली होती.


सुशांतच्या अकाऊंटमधून रिया किंवा तिच्या कुटुंबीयांच्या अकाऊंटमध्ये पैशांचा व्यवहार झाला नसल्याचं ईडीच्या अधिकाº­यांचं म्हणणं होतं.

रियाच्या मोबाईलचा तपास करत असताना ईडीला तिच्या फोनमध्ये ड्रग्जबाबत चॅट असल्याची माहिती मिळाली. यानंतर सुशांत मृत्यूप्रकरणाची चौकशीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एंट्री झाली. ८ सप्टेंबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीला ड्रग्जप्रकरणी अटक केली. रिया ड्रग्ज विकत घेत होती. सुशांतच्या ड्रग्ज सेवनाची सवय तिने लपवली. व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून ती ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित होती, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रतिज्ञापत्रात कोर्टाला सांगितलं होतं. आॅक्टोबरमध्ये हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर रिया जामिनावर बाहेर आली आहे. सुशांत मृत्यूनंतर ड्रग्जप्रकरणी तपास करणाº­या एनआयएने आतापर्यंत ३०पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. ज्यात रियाचा भाऊ शौविकही सहभागी आहे. अलीकडेच २६ मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली. सुशांत मृत्यूनंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अर्जुन रामपाल यांची चौकशी केली, तर कॉमेडीकिंग म्हणून ओळखली जाणारी भारती सिंहला ड्रग्जसेवनप्रकरणी अटक करण्यात आली होती; पण एकूणच तपासापेक्षा या घटनेचा गुंता वाढवण्याचा प्रकार होत आहे. एखाद्या टीव्ही मालिकेत जसे असंबंध कथानक घुसडवले जाते आणि मूळ विषय बाजूला पडतो, तशी मालिका यातून सुरू झाल्याचे चित्र आहे, बाकी काहीही यातून निष्पन्न झालेले नाही.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: