शुक्रवार, १८ जून, २०२१

इथून तिथून मिथुन


१९७० च्या दशकातील शेवटचा टप्पा आणि १९८० चं दशक हे खºया अर्थानं कुणी गाजवलं असेल तर मिथुन चक्रवर्तीनं. त्याचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच दिवशी त्याची पोलीस चौकशीही झाली, पण आपला विषय हा इथून तिथून मिथुन आहे. अमिताभ बच्चन सुपरस्टार असताना त्याला चित्रपटासाठी साइन करणे छोट्या निर्मात्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे गरीबांचा अमिताभ असा नावलौकिक मिळवत एकापाठोपाठ हिट चित्रपट देण्याचा धडाका मिथुन चक्रवर्तीने लावला होता. त्या काळात मिथुन हा आमचा आवडता नट होता.


चित्रपटात कराटे हा प्रकार मिथुनने चांगलाच लोकप्रिय केला होता. त्यामुळे त्या काळात ‘एंटर द ड्रॅगन’, ‘शाओलीन टेंपल’, ‘36 चेंबर आॅफ शाओलीन’ असे जे काही चायनीज कराटेपट येत त्याला तरुणांची गर्दी असायची, पण मिथुनने तो प्रेक्षकही आपल्याकडे खेचला होता. त्याची ही कराटेची झलक त्याने सर्वात प्रथम ‘मेरा रक्षक’ या चित्रपटात दाखवली होती. रामेश्वरी या चित्रपटाची नायिका होती, तर मिथुन या चित्रपटात नायक, तर एडका त्यात सहनायक होता. म्हणजे मिथुन हा रामेश्वरीचा रक्षक न राहता तो एडका तिला मदत करायचा, ढुशी देऊन खलनायकांना मारायचा. त्यात एडक्याची डोक्याची झुंज आणि मिथुनचा कराटे प्रेक्षकांनी पहिल्यांदा पाहिला. मग खास मिथुनचा कराटे पाहण्यासाठी ‘सुरक्षा’, ‘वारदात’ असे ‘गनमास्टर जी 9’ हे मिथुनच्या चित्रपटातून दिसायला लागले.

एक अतिशय हाडकुळा, इथून तिथून बरगड्या दिसणारा मिथुन कराटे खेळताना इतके छान हात-पाय हलवायचा की, त्या काळात नुकत्याच दाखल झालेल्या डिस्कोसाठी या स्टेप्स हिट झाल्या. एका कराटेपटूचा डिस्को डान्सर झाला. मग मिथुनच्या कराटेच्या स्टेप्सनंतर डिस्कोमधून प्रेक्षक पाहू लागले.


पण वैशिष्ट्य असे की, एकीकडे अमिताभ बच्चन, जितेंद्र, राजेश खन्ना, ऋषी कपूर हे प्रस्थापित नायक आपले चित्रपट चालवत असताना त्यांच्याशी स्पर्धा करत मिथुनने आपली एक ओळख निर्माण केली. तसे हे सोपे नव्हते, पण कधी कधी या दिग्गज कलाकारांबरोबर सहनायक म्हणून काम करूनही त्याने वाहवा मिळवली. पहिल्या सुपरस्टार राजेश खन्नाला ‘डिस्को डान्सर’मध्ये आपला बाप बनवले, तर दुसºया महानायकाला ‘अग्निपथ’मध्ये दमदार साथ दिली. अमिताभ इतकेच मिथुनच्या या भूमिकेचे कौतुक प्रेक्षकांनी केले होते.

तत्कालीन बहुसंख्य टॉपच्या नायिकांबरोबर मिथुनने चांगले चित्रपट दिले. रती अग्निहोत्रीबरोबर ‘पसंद अपनी अपनी’, ‘शौकीन’ या चित्रपटांत नायक, तर ‘मुझे इन्साफ चाहीये’, ‘जीने की आरजू’मध्ये नकारात्मक भूमिकेत तो लक्षात राहिला. पद्मिनी कोल्हापुरेबरोबर ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘मुद्दत’ हे कौटुंबिक चित्रपट त्याने हिट केले.


रंजिताबरोबर त्याची जोडी गाजलेलीच होती. सुरुवातीचा काळ मिथुन-रंजिता ही जोडीच होती. ऋषी कपूरच्या ‘लैला मजनू’ चित्रपटानंतर लोकांच्या विस्मरणात गेलेल्या रंजिताला मिथुनबरोबर पुन्हा ब्रेक मिळाला होता. ‘तराना’, ‘भयानक’, ‘तरकीब’, ‘घर एक मंदिर’, ‘ख्वाब’, ‘सुन सजना’, ‘वो जो हसिना’ असे अनेक चित्रपट मिथुन-रंजिताचे गाजले.

‘वतन के रखवाले’, ‘जाग उठा इन्सान’, ‘वक्त की आवाज’, ‘गुरू’ अशा दे मार चित्रपटांतून श्रीदेवी मिथुनची नायिका होती.


‘जीवनयुद्ध’, ‘ऐसा प्यार कहा’, ‘प्यार के दो पल’, ‘मुद्दत’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘गंगा जमुना सरस्वती’ यात जयाप्रदा ही त्याची नायिका होती. मीनाक्षी शेषाद्रीबरोबर ‘परिवार’ चित्रपटात, कुत्री, माकडं आणि मीनाक्षी यांच्या परिवारात त्याने धमाल आणली होती.

आपल्या कारकिर्दीत बहुतेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करून आपले अस्तित्व कौटुंबिक, डिटेक्टिव्ह, दे मार, संगीतप्रधान असे सर्व चित्रपट गाजवून मिथुनने एक समृद्ध चित्रपटाचे आयुष्य जगलेले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षीही त्याने राजकारणात सक्रिय असल्याचे दाखवले असले, तरी त्याच्यातील कलाकार वाढत्या वयाबरोबर किती चित्रविचित्र भूमिका करतो हे ‘ओह माय गॉड’सारख्या चित्रपटातून दिसून येते.


१९८६ नंतर गोविंदाची पडद्यावर एण्ट्री झाली आणि मिथुनची मागणी गोविंदाकडे गेली. ‘इल्जाम’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले तेव्हा गोविंदाचा तो पहिला चित्रपट होता, पण तो पोस्टरवर मिथुनप्रमाणे भासेल असा फिकट चेहरा प्रसिद्धीसाठी वापरला होता. प्रेक्षक मिथुनला पहायला गेले आणि गोविंदाला पसंत करून आले, पण तोपर्यंतचा काळ हा मिथुनने गाजवला. गरीबांचा अमिताभ म्हणता म्हणता तो गब्बर झाला आणि अमिताभबरोबर काम करू लागला, पण आपला काळ त्याने गाजवला. मिथुनची फायटिंग प्रेक्षकांना आवडायची. रजनीकांतचे फायटिंगचे स्टाइलिश तरीके येईपर्यंत प्रेक्षकांना मिथुनची फाइटिंग आवडू लागली होती, पण ‘मृगया’ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाल्यानंतर दिग्गजांच्या बाजारात उतरून त्याने इथून तिथून आपल्याला सिद्ध केले हे मात्र नक्की.

अमिताभ बच्चनने आपल्या तिसºया पर्वात ६० नंतरही आजपर्यंत खूप वेगवेगळे चित्रपट दिले, तशाच प्रकारे हा गरीबांचा अमिताभ आज २०२१ मध्येही प्रेक्षकांना साद घालत आहे. आजही त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. यामध्ये विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मिर फाइल्स’, राम गोपाल वर्माचा ‘टे्वल्व ओ क्लॉक अदर का भूत’, तर गेल्याच वर्षी येऊन गेलेला ‘द ताश्कंद फाईल्स’ हे महत्त्वाचे चित्रपट त्याने केले आहेत. आजही तो प्रेक्षकांना तितकाच हवाहवासा वाटतो आहे.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: