गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी पाऊसही झाला. खरं तर हा थंडीचा हंगाम. हिवाळा ऋतू आणि मार्गशीर्ष महिन्यातील डिसेंबरातील थंड हवा ही सुखद अशी असते, पण अगदी रोगट हवा पडली आहे. त्यामुळे पुन्हा काही नवा रोग नव्या वर्षात येतो आहे का, अशी भीती उगाचच सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे. हे असे का होते आहे?
खरं तर भारतात हवामान बदल झालेला आहे. तीनही ऋतू आणि त्याचमुळे बहुविध पीक शेती हे भारताचे वैशिष्ट्यपूर्ण बलस्थान आहे. त्यावरच आपली अर्थव्यवस्था आहे. असे असताना आता ऋतूंचे वेळापत्रकच बदलले आहे. गेली तीन दशके मान्सून वेळेवर दाखल झालेला नाही. जूनच्या अखेरीस पावसाळा सुरू होतो आणि ऐन आषाढातच तो दडी मारतो. अल-निनो, ला-निनो परिणामांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कोसळत नाही. पावसाळा या ऋतूऐवजी अवकाळी पाऊस हेच प्रकार वाढत चालले आहेत. यावर्षी तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने दिवाळीच्या आधीपासूनच थैमान घातले आहे. खरिपाची पिके ऐन हातात आली असताना पावसाने नुकसान केले. आता रब्बीच्या हंगामावर त्याचा परिणाम होतो आहे. हे ऋतुचक्र कसे काय बदलले आहे?
याचे एकच उत्तर असते की, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला... या कमी दाबामुळे चक्रीवादळे निर्माण होतात. जगभर अशा चक्रीवादळांनी पर्यावरणीय अस्वस्थता निर्माण केली आहे. समुद्रांवर चक्रीवादळे, भयचकित व्हावे इतके लांबवर वणवे पेटणे, हिमकवच कमी होणे... असे दुष्परिणाम होत आहेत. अवकाळी हवामान आणि वादळे यांमुळे जीवित आणि अर्थहानी होते आहे. या नैसर्गिक संकटांशी सामना करण्यासाठी आमच्याकडे आता कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. त्याबाबत सरकारने हालचाली केल्या पाहिजेत.
आज आपण प्रकल्पांच्या नावावर पर्यावरण आणि निसर्गावर आक्रमण करत आहोत त्याचेच हे परिणाम आहेत का, याचा अभ्यास केला पाहिजे. धरणे बांधणे, मोठे प्रकल्प सुरू करणे, हे सारेच पर्यावरण बदलाचेच परिणाम असावेत, असे दिसते. ही अफाट लोकसंख्या पोसण्यासाठी निसर्गाचे दोहन करणे आवश्यकच होऊन बसते. मुंबईची क्षमता किती याचा विचार न करता तिथे माणसे येतात, बांधकामे करतात, त्यासाठी खाड्या, समुद्र हटवतात. एका नदीवर आक्रमण केल्यामुळे मुंबई २00५ ला पाण्याखाली गेली होती. त्या समुद्र आणि खाड्यांवर आक्रमण केल्यावर काय होईल? आज पनवेलजवळ विमानतळाच्या नावाखाली खाडी बुजवण्याचा प्रकार झाला आहे. पुनर्वसनासाठी पुष्पक नगरसारखे अनेक वसाहतींचे प्रकल्प खाडीतच उभे केले आहेत. या खाडीतील पाण्याला कसे थोपवता येईल? त्याचा उद्रेक होणारच ना?
अगदी काही दिवसांपूर्वी पुण्यात एक गवा मारला गेला. शहरात घुसला म्हणून त्याला मारले गेले. तो ज्या चांदणी चौकातून आला त्या परिसरात जंगल होते. सिंहगड रोड, पौड या भागातून असलेल्या जंगलात, मुळशीच्या खोºयात हे वन्यप्राणी राहात होते, पण तिथे लवासासारखे प्रकल्प झाले, गिरीवनसारखे प्रकल्प झाले. हॉटेल्स, इंटरनॅशनल शाळा, मेगा हायवे हे सगळं त्या जंगलातून गेल्यावर त्या प्राण्यांनी जायचे कुठे? हे एक साधे उदाहरण होते. तसेच निसर्गातील प्रत्येक घटकाचे आहे. तो गवा जीवाच्या आकांताने शहरात घुसला. तिथले भेसूर, भयानक वातावरण पाहून तो बिथरला आणि गाडीला धडक दे, सोसायटीत घुस, असे प्रकार केले. वादळ किंवा पाऊस वेगळे काय असते. हा गवा वादळासारखा आला आणि प्राण सोडून शांत झाला. तसेच पर्यावरणावर झालेल्या आक्रमणामुळे हे ऋतुचक्र बदलत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आज धोक्याच्या घंटा जगाच्या दाराशी वाजवून निसर्ग थकला आहे. त्याचे खूप दूरगामी आणि सखोल असे परिणाम आताच दिसू लागले आहेत. जगाच्या भूगोलावर त्याचा परिणाम होतो आहे. समाजकारण, राजकारण या पलीकडे जाऊन आता यावर पर्याय शोधावा लागेल. या बदलत्या ऋतुचक्रामुळे होणाºया दुष्परिणांवर त्यावर तातडीने उपाय केले जायला हवेत. जगात आताच्या विकासाच्या संकल्पना या जड-भौतिकवादी आहेत. त्यामुळे राक्षसी धरणे, मोठ्या सिमेंटच्या जंगलांची निर्मिती करणाºया मानवी वसाहती, अवाढव्य इमारती, वाढत्या लोकसंख्येसाठी रासायनिक शेती, बिजांवर केले जाणारे प्रयोग, यांमुळे मानवी जीवन नि:सत्त्व होते आहे. त्याचबरोबर वन्यपशूही नष्ट होत आहेत. ही वनसंपदा, निसर्गसंपदा जपण्याचे आव्हान आपल्याला स्वीकारायचे आहे. त्यासाठी मानवीच नव्हे, तर सर्वच सजीवांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी पावले टाकणे गरजेचे आहे.
हे ऋतुचक्र आपोआप बदललेले नाही. निसर्ग चुकत नाही. निसर्ग वेळेतच आपली कामे करत असतो, पण आपण ते बदलत आहोत. नशीब इतकेच की, आपण ही आक्रमणे फक्त जमीन आणि पाण्यापर्यंत मर्यादित ठेवली आहेत. जर समजा आम्हाला उजेड हवा म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त आपल्या हातात घेतलेला नाही. म्हणून ते वेळेवर होत आहेत. रोज दिवस-रात्र वेळेवर होत आहे, पण जर आपण वेळीच निसर्गाच्या संगोपनाचा विचार केला नाही, तर तसा प्रलयही होण्यास वेळ लागणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा