राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असा एक विचार आहे आणि तो स्पष्टपणे आणि मोकळेपणाने धाडसाने मांडणारे पत्रकार म्हणून मा. गो. वैद्य यांचे महत्त्व फार मोठे आहे. त्यांच्या निधनाने संघ परिवारातील पहिला प्रवक्ता हरपला आहे. संघाची, संघविचारांची भूमिका ठामपणे मांडण्याचे धाडस त्यांच्यात होते. त्यामुळे संघाच्या कार्यालयात त्यांची जागा कायम रिक्तच राहील असे वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून म्हणजे १९२५पासून झालेल्या सर्व सरसंघचालकांना पाहण्याचे, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मा. गो. वैद्य यांना लाभली होती. त्यामुळे मा. गो. वैद्य हे खºया अर्थानं संघाचाच चालता बोलता इतिहास होते. म्हणूनच आतापावेतोच्या सर्व सरसंघचालकांचे विश्वासू सहकारी हे बिरुद अभिमानाने मिरविणाºया मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला.
संघाचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या तरुण भारतचे संस्थापक संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांचे उत्तराधिकारी म्हणून मा. गो. वैद्य यांनी सांभाळलेली धुरा फार महत्त्वाची आहे. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब देवरस यांनी बाबूराव यांना तरुण भारतात यायला सांगितले आणि ते तरुण भारतचे झाले. एक नवा चेहरा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे संघाची भूमिका, विचार वाचकांमध्ये रुजवण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केला आणि तो रुजवला. त्या काळात एकूण तीन तरुण भारत आपल्याकडे होते. एक पुण्यातून प्रसिद्ध होणारा, दुसरा बेळगांव तरुण भारत आणि तिसरा नागपूरचा. तीनही तरुण भारतची विचारसरणी वेगळी होती. बेळगांव तरुण भारत हा महाराष्ट्र एकीकरण, सीमावाद या विषयाला वाहिलेला होता. पुण्यातला तरुण भारत हा थोडा समाजवादी आणि डाव्या विचारांचा होता. त्यामुळेच डावा विचार जसा संपुष्टात आला, तसा तो १९८०च्या दशकाच्या अखेरीस संपुष्टात आला. पण नागपूरचा तरुण भारत हा मात्र संघ विचार पसरवणारा होता. त्यात मा. गो. वैद्य यांचे कार्य मोठे होते. संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते भाष्यकार म्हणून ओळखले गेले. आपल्या परखड भाष्य करण्यावरून ते अनेकवेळा चर्चेत राहिले होते.
आणीबाणीच्या काळातही त्यांची लेखणी थांबली नव्हती. त्या काळात त्यांनी लिहिलेला चांगले राज्य व चांगल्यांचे राज्य हा लेख खूप गाजला होता. या लेखामुळे त्यांना तत्कालीन मिसाखाली अटकही करण्यात आली होती. आणीबाणी संपल्यावर पुलोद शासन काळात ते राज्यपालांचे नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेचे आमदार झाले. आमदार म्हणूनही त्यांनी तो कालखंड गाजवला होता. राजकीय नाही, तर वैचारिक आघाडीवर. निवृत्तीनंतर ते बराच मोठा काळ संघ कार्यालयात मुक्कामाला गेले होते. रा. स्व. संघाचे ते अ. भा. बौद्धिक प्रमुख होते. नंतर संघाचे पहिले प्रवक्ते झाले. या सगळ्या काळात खूप सखोल प्रवास ते करीत होते. विशेष म्हणजे ते संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतून अतिशय नेमकेपणाने भाषणे करीत. या चार भाषांवर त्यांच चांगले प्रभुत्व होते. कोणत्याही कार्यक्रमात आपल्याला किती वेळ भाषणासाठी दिलेला आहे हे विचारून घेत आणि तेवढाच वेळ बोलायचे, म्हणजे आजकालचे वक्ते मी आपला फार वेळ घेणार नाही, असे म्हणून रटाळ भाषण करतात, जाता जाता एवढंच सांगतो की, असे म्हणून पुन्हा पंधरा मिनिटे किटकीट करतात, असले बेशिस्त भाषण त्यांनी कधी केले नाही. अतिशय शिस्तबद्ध भाषण करणारे आणि जेवढा वेळ मिळाला आहे, तेवढ्यात नेमका विषय मांडणारे, असे ते परखड वक्ते होते. आज अशा वक्त्याला महाराष्ट्र मुकला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थिंक टँक म्हणतात त्या थिंक टँकचे आधारस्तंभ हे मा. गो. वैद्य होते. रा. स्व. संघात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्यकाळात ते आले, त्यानंतर गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जूभय्या, के. सी. सुदर्शन आणि आता मोहन भागवत या सगळ्यांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क होता. बाळासाहेब देवरस यांची काही भाषणे तर मा. गो. वैद्य यांनीच लिहिली होती. त्यामुळे संघाची त्यांच्या जाण्याने हानी झालेली आहे.
विशेष म्हणजे आणीबाणीच्या काळानंतर आलेल्या जनता पक्षावर तत्कालीन काँग्रेस हा जनता पक्ष म्हणजे, जनसंघ, जनसंघ म्हणजे संघ अशी टीका करत असत. या टिकेमुळेच जनता पक्षातील समाजवादी आणि संघ परिवारातून आलेल्या लोकांमध्ये दरी निर्माण झालेली होती, पण त्यावेळी संघाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, हे रुजवण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला होता. संघाला जवळचा पक्ष वाटतो, हिंदुत्ववादी वाटतो म्हणून संघाचा पाठिंबा जनसंघाला किंवा भारतीय जनता पक्षाला आहे, हे बिंबवण्याचे कामही त्यांनी केले होते. हिंदुत्वाच्या विचारापासून हा पक्ष दूर राहिला, तर त्याला लांब करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यातून अनेकवेळा त्यांनी भाजप आणि त्यांच्या सरकारवर टीका करण्याचे धाडस दाखवले होते. त्यांच्यामुळेच संघ हा उघडपणे राजकारणाचे समर्थन करू लागला. आधीचे सरसंघचालक कधी संघ ही राजकीय संघटना आहे हे उघडपणे मान्य करत नव्हते. पण सरसंघचालकपद मोहन भागवत यांच्याकडे आल्यानंतर ते उघडपणे बोलण्यास सुरुवात झाली आणि त्यात मा. गो. वैद्य यांचे योगदान मोठे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा