सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

चिंतेचे ढग


संपूर्ण २०२० हे वर्ष कोरोनाने बरबाद केले. अनेक संसार धुळीला मिळाले. अनेक आयुष्य उध्वस्त झाली. लाखो लोकांच्या नोकºया गेल्या, तर लाखो लोक कमी पगारात काम करत आहेत. देशाच्या अर्थव्यस्थेला फार मोठी खिळ बसली. महसूलाची, उत्पन्नाची साधने बंद झाली. अशा वातावरणात गेल्या महिनाभरापासून कोरानावर लस आली आहे, अशी बातमी आली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. पण त्यावरूनही नंतर अनेक चर्चा झाल्या आणि त्याबाबत साशंकता व्यक्त केली गेली. त्यामुळे संपूर्ण जगावरील चिंतेचे ढग कायम आहेत. नव्या वर्षात पदार्पण करताना तरी हे ढग हे मळभ दूर होणार का? अशी चिंता आता निर्माण झालेली आहे.


अनेक चिंतानी आपल्याला आता नव्या वर्षात पदार्पण करावे लागणार आहे. म्हणजे लस येणार म्हटल्यावर त्यावर इतक्या अफवा किंवा टीका सुरू झाल्या की, त्यामुळे लसीबाबत एक प्रकारची भीतीच निर्माण केली गेली आहे. ही लस घेतल्यावर बायकांना दाढी मिशा येतील आणि पुरुषांचे चेहरे मगरीसारखे होतील, असे वक्तव्य एका युरोपियन नेत्याने केले आणि लसीबाबत घाबरवून सोडले.

कोणीतरी म्हटले की, ही लस घेतल्यावर पुरुषांना षंढत्व येण्याची शक्यता आहे. कोणी यामुळे आणखी काय होईल, अशा शंका व्यक्त केल्या. त्यात अनेक कंपन्यांना या लसीची टेस्ट घेण्यासाठी स्वयंसेवक मिळेनासे झाले आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस येईल असे छातीठोकपणे सांगितले जात असताना, भारतातील तीन ठिकाणांना खुद्द पंतप्रधानांनी भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिले असताना, आता हे भीतीचे वातावरण का निर्माण केले जात आहे? गावागावातील सरकारी यंत्रणा या लसींसाठी यंत्रणा बनवत असताना त्याचा होणारा अपप्रचार ही फार मोठी चिंता आहे. म्हणजे लस चांगली असेलही पण त्याबाबत भीती निर्माण केल्यानंतर ती घेण्यासाठी कुणी पुढेच येत नसेल, तर काय होईल? बहुतेक आजार हे मानसिक असतात. त्यामुळे एखाद्याच्या मनात भीती असेल आणि त्याने लस घेतली, तर त्याला त्याचा अपायही होईल. यासाठीच हे सगळे गैरसमज दूर करण्याची यंत्रणा अगोदर उभी केली पाहिजे. कंपन्या कंपन्यांमधील स्पर्धा, आमच्या देशात सर्वात अगोदर लस बनली हे सांगण्यासाठी होत असलेले आंतरराष्ट्रीय प्रयत्न आणि त्यांच्यातील स्पर्धा यातून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर प्रथम इलाज केला पाहिजे. हा अफवा पसरवणारा रोग त्या कोरोनापेक्षा जास्त भयंकर आहे.


सर्वात प्रथम आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक, लष्कर, पोलीस यांना लस देण्याचे नियोजन आहे. आणि खरोखरच त्या लसी वाईट असतील, तर आमची आरोग्य यंत्रणा, संरक्षण यंत्रणा धोक्यात येईल अशी भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे हे चिंतेचे ढग फार वाईट आहेत. ते अगोदर दूर करावे लागतील.

दुसरी आणखी एक चिंता म्हणजे नव्या वर्षात लस आल्यानंतर करोनाची संपुष्टात येण्याची आशा असतानाच करोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला असून, त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सतर्क झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी सोमवारी एक तातडीची बैठक बोलावली होती. त्यामुळे २०२१ मध्येही पुन्हा तेच संकट कायम आहे का? त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन केले जाईल का, पुन्हा कोणाचा रोजगार जाईल का, याची भीती वाटून अनेक जण आज तणावात जगत आहेत. हा तणाव दूर करण्याची गरज आहे.


खरं तर आता देशात करोनाचा प्रसार कमी होत आहे, म्हणजे एकूण करोना बाधितांचा देशातील आकडा हा १ कोटीच्या पुढे गेला असला, तरी प्रत्यक्षात जेमतेम ३ लाखांच्या घरातच लोक उपचार घेणारे आहेत. बरे होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे, तर दुसरीकडे लवकरच लसही येणार आहे. तीन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. असं असतानाच करोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. वेगानं पसरत असलेल्या या करोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे. त्याची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह नेदरलँड, डेन्मार्क आणि आॅस्ट्रेलियातही कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सतर्क झाला आहे.


या बातमी नंतर सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवड्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती आणखी आठवड्याभरासाठी वाढवली जाऊ शकते. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भारतात इंग्लंडमधून येणारी विमानसेवाही बंद करावी लागणार आहे. ती लवकरात लवकर केली पाहिजे. म्हणजे हे चित्र पुन्हा गेल्या वर्षीसारखेच होताना दिसत आहे. त्यामुळे भीतीचे चिंतेचे ढग अजूनही आपल्या डोक्यावर आहेत. आज जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत आहेत. ब्रिटनहून येणाºया प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन वेगाने फैलवणारा असून, नियंत्रणाबाहेर असल्याचं यूकेमधल्या तज्ज्ञांचं मत आहे. काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवड्याभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे.

थोडक्यात काय तर लस येणार, नवीन वर्ष चांगले आरोग्य संपन्न असेल, असे ‘अच्छे दिन आनेवाले हैं’चे चित्र दाखवले जात असतानाच पुन्हा चिंतेचे ढग कायमच आहेत, असे दिसते. पण आता जर हे संकट पुन्हा आले, पुन्हा लॉकडाऊन झाला, बेरोजगारी वाढली आणि जग, हा देश ठप्प झाला, तर माणसांना टाचा घासून मरण्यापलीकडे पर्याय नसेल. अनेक जण या अपयशातून नैराश्यातून आत्महत्या करू शकतात. त्यामुळे हा रोग केवळ हृदयावर, फुप्फुसावरच हल्ला करत नाहीये, तर मनावरही त्याचा परिणाम होत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: