आजपर्यंत आपल्याकडे अनेक आंदोलने झाली. काही आंदोलने यशस्वी झाली, तर काही मोडीत निघाली. पण आता जे दिल्लीत शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे, ते अत्यंत नियोजनबद्ध असे आंदोलन आहे. म्हणूनच हे आंदोलन यशस्वी होईल असे वाटते. आंदोलन म्हणजे लढा असतो, त्याचे योग्य नियोजन असायला हवे असते. पंजाब, हरियाणाच्या शेतकºयांनी हे आंदोलन नियोजनातून केलेले स्पष्टपणे दिसून येत आहे.
ज्यावेळी हा कायदा संसदेत मंजूर केला गेला, तेव्हापासूनच हे आंदोलन सुरू आहे. साधारण सप्टेंबरच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हे आंदोलन सुरू आहे. ते सरकत-सरकत दिल्लीत पंधरा दिवसांपूर्वी आले. दिल्लीत आले, तेव्हा त्याचे वादळात रुपांतर झाले आणि आता संपूर्ण देशालाच नाही, तर जगातील अनेक देशांचेही लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. त्यामुळे या आंदोलनाचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. असे नियोजन सर्वच आंदोलनात झाले, तर प्रत्येक लढा हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
आपल्याकडे बहुतेक आंदोलने ही ऐनवेळची असतात, पण निर्णायक आंदोलने फार महत्त्वाची असतात, त्याचे नियोजन चांगले असते. शेतकºयांचा लढा किंवा आंदोलन आपल्या देशात नवे नाही. सत्ताधारी कोणीही असले, तरी आमच्या शेतकºयाला लढा हा द्यावाच लागतो. सत्ताधारी जेव्हा ब्रिटिश होते, तेव्हाही आमच्या शेतकºयांना आंदोलन करावेच लागले होते. दुष्काळ पडलेला असताना शेतकºयांना सरकार मदत करत नव्हते, म्हणून ब्रिटिशांविरोधात उठाव झाले होते. वासुदेव बळवंत फडके यांचा लढा त्यातूनच उभा झाला होता. रायगडात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधात शेतकºयांचा सहा-सात वर्ष संप करणारे नारायण नागो पाटील यांचा लढा हा यशस्वी नियोजन करून केलेला होता.
कोकणातील जमीनदारी म्हणजे खोती पद्धत रद्द करून शासनाला कुळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे आगरी समाजातील नेते नारायण नागो पाटील यांच्या स्मृती भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना लढण्याच्या प्रेरणा देत आहेत. कोणत्याही शेतकरी आंदोलकांनी त्यांच्या लढ्याचे नियोजन समोर ठेवले, तर प्रत्येक आंदोलन यशस्वी होईल. चरी कोपरचा ऐतिहासिक सहा वर्षांचा संप व त्यानंतर शासनाला कायदा करण्यास भाग पाडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाºया कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती. या पिळवणुकीतून शेतकºयांची सुटका करणाºया नारायण नागू पाटील यांचा लढा शेतकºयांच्या हितासाठी होता. जगातील सर्वात मोठा शेतकºयांचा संप या नेत्याने घडवून आणला होता. कोकणामध्ये अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात त्यांनी शेतकºयांना एकत्र केले. २७ सप्टेंबर, १९३३ मध्ये चरी कोपरमध्ये २५ गावांमधील शेतकºयांचा मेळावा आयोजित करण्यात आला. संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, वसई भागातील आगरी, कुणबी, गवळी, कोळी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार या शेतकरी समाजांचा त्यांना पाठिंबा होता.
पूर्वी कोकणातील सर्वच गावांमध्ये खोती-वतनदारी पद्धत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाºया कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती. हे खोत ब्रिटिश सरकारचे नोकर होते. कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे राहिले. या मेळाव्यात याच लढ्यात शेतकºयांना संपावर जाण्याचे आवाहन केले. शेतकºयांना उत्पन्नातील योग्य वाटा मिळत नसल्यामुळे त्यांनी संपावर जावे, असे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्यांचे आयुष्य शेतीवर अवलंबून आहे त्यांनी शेती करणेच बंद केले. खोतांना वाटले किती दिवस आंदोलन सुरू राहील. खायला अन्न मिळेना की, संप मागे घेतला जाईल, परंतु शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. शहरात जावून मिळेल ते काम केले. महिलांनी भांडी-धुण्याचे काम केले. या आंदोलनाची दखल घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चरीला जावून आंदोलकांची भेट घेतली. जुलूम बंद पाडण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले व त्यांनी कुळ कायदा करण्यास शासनास भाग पाडले. अखेर १९३९ मध्ये हा संप मागे घेण्यात आला. चांगल्या नियोजनाने हा संप यशस्वी झाला होता.
आज पंजाब-हरियाणाचा शेतकरी समृद्ध आहे. हा लढा देण्यासाठी त्यांना आता जिंकायचे आहे, म्हणून ते पाहिजे तितका वेळ देण्यास तयार झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आंदोलकांची उपासमार होऊ नये, यासाठी या लोकांनी धान्य, कपडा-लत्ता, स्वयंपाकाचा गॅस, दैनंदिन लागणाºया वस्तू, असे सगळे बरोबर आणले आहे. त्याचप्रमाणे हा लढा सहा महिने चालू राहिला, तरी तितके धान्य बरोबर आणले आहे. त्यामुळे सरकारला झुकवायचाच इरादा या आंदोलनात आहे. त्यासाठी त्यांनी वर्गणी काढून पैसा उभा केला आहेच, पण त्यांना अनेक संस्था, एनआरआयही आर्थिक मदत करत आहेत. कारण आपल्याला जिंकायचे आहे हे एकच ध्येय त्यांच्यापुढे आहे. योग्य नियोजनाने आंदोलने यशस्वी होऊ शकतात. आज जमीन उखडणारे हेच शेतकरी सरकार उखडून टाकण्यास सज्ज झालेले आहेत. तसे त्यांचे नियोजन आहे.
शेतकºयांची अनेक आंदोलने योग्य नियोजनाने यशस्वी झालेली आहेत. १९७०च्या दशकात नवी मुंबई प्रकल्प आला आणि पनवेल, उरणमधील जमिनींचे संपादन होऊ लागले. तेव्हाच्या काँग्रेस सरकारने एकरी खूप कमी भाव दिला होता. त्यावेळी उरणमध्ये जे शेतकरी आंदोलन पेटले त्यात सरकारने गोळीबार केला होता. पाच जण त्यात शहीद झाले, पण शेतकरी आणि शेकाप यांचे दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखालचे हे आंदोलन मागे हटले नाही. जमिनीला योग्य भाव मिळवून, साडेबारा टक्केचा लाभ मिळवून, भूमिपुत्रांना नोकºया देण्याचे मंजूर करूनच हा लढा संपुष्टात आला. त्यामुळे आज दिल्लीत चालू असलेले हे आंदोलनही लवकरच संपेल, पण नुसते संपणार नाही तर शेतकºयांना न्याय देऊन संपेल, असा विश्वास आहे. याचे कारण या आंदोलनाचे नियोजन फार महत्त्वाचे आहे.
रायगडात झालेल्या चरीच्या आंदोलनाने किंवा सिडको विरोधातील उरण पागोटे येथील आंदोलनाने शेतकºयांनी आपल्या भावी पिढीचे आयुष्य सुरक्षित केले होते, तसेच हे पंजाबच्या शेतकºयांचे आंदोलनही त्यांच्या भावी पिढीचे संरक्षण करणारे ठरेल, असे मानायला हरकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा