कोरोनामुळे यावर्षी शिक्षणाची अवस्था ही टी-२० क्रिकेटप्रमाणे अनिश्चित झालेली आहे. हे एक वर्ष या शिकणाºया नव्या पिढीच्या आयुष्यात स्कीप केलेले वर्ष झालेले आहे, कारण गोळा बेरीज केली तर लक्षात येईल की, आॅनलाइन मिटिंग, लेक्चर या नावाखाली टाइमपास झालेला आहे, शिक्षकांनी शिकवत आहोत हे दाखवून एक कॉलम पूर्ण केला आहे, पण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात काहीही भर पडल्याचे दिसत नाही. रात्र संपली पण उजाडलं कुठे, अशी अवस्था आज शिक्षणाबाबत झालेली आहे. एकूणच हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांच्या पदरात नैराश्य टाकणारे असेच आहे. शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अंतिम परीक्षांचा विचार नाही. दिवस पुढे ढकलले जात आहेत. एक वर्ष वाया जात आहे. त्यामुळे २०२० हे शैक्षणिक वर्ष नापासांचे वर्ष आहे. कमी षटकात सामना खेळवला जातो आणि निर्णायक केला जातो तसे धडे वगळून, दिवस कमी करून, कमी मार्कांची परीक्षा घेऊन ज्ञानात काय भर पडणार आहे? हे नापासांचे वर्ष असणार आहे, असेच वाटते.
खरं तर आपल्याकडे शिक्षणाचे नेमके धोरण काय आहे, नियम काय आहे हे कोणाला माहितीच नसते. संपूर्ण वर्षात पुस्तक वाचलेच जात नाही. पुस्तकाची प्रस्तावना, त्याची भूमिका हे पालक शिक्षक-विद्यार्थी सर्वांनी वाचण्याची आवश्यकता आहे, पण आपण अनुक्रमणिकेपासून पुस्तक सुरू करतो. किती पाठ वगळले आणि किती पाठांचा अभ्यास करायचा आहे हे ठरवतो. या पोपटपंचीला काही अर्थ नसतो.
खरं तर काय हवे असते सामान्य माणसाला? अतिशय माफक अपेक्षा असतात या माणसाच्या. फार काही नको असते. चांगले शिक्षण, नंतर रोजगाराची संधी आणि मग आपले कुटुंब बरे आणि आपण बरे. पण यातील चांगले शिक्षणच जर बुडवले जात असेल, तर काय करायचे सामान्य माणसाने? शासन बदलले पण प्रशासन बदलले नाही. शिक्षणाचा बट्ट्याबोळ आहे तसाच. आज त्यात कोरोनाचे निमित्त आहे, पण कोरोना आला नसता तर आम्ही चांगले शिक्षण दिले असते. हे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे शाळेत जावून मुलांच्या पाठीवरचे वजन करून आले, पण अभ्यासक्रम किती आहे आणि त्यासाठी मिळणारा वेळ हा पुरेसा आहे की नाही, हे काही त्यांनी तपासले नाही. आताही तीच परिस्थिती आहे. अभ्यासासाठी मिळालेला वेळ, शिकवण्यासाठी मिळालेला वेळ आणि एकूण घेतल्या जाणाºया परीक्षा यांचे काय नियोजन असणार आहे? सुट्टीचे कसे नियोजन आहे? त्यात लॉकडाऊन आणि कोरोना काळात सुरू न झालेल्या शाळांमुळे हा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार आहे?
शाळा जेव्हा नियमित असतात, कोरोनासारखी परिस्थिती नसते, तेव्हा तरी एकूण किती दिवस शिक्षणासाठी मिळतात. वर्षात फक्त १७१ दिवस म्हणजे सरासरी दोन्ही टर्ममध्ये ८५ दिवस हातात येतात. शासनाने जो मुलांना अभ्यासक्रम नेमून दिला आहे, त्याचे काही नियम आहेत. आमच्या शिक्षण खात्यालाच ते माहीत आहेत. बाकी कोणालाच ते माहिती नाहीत. एवढ्या कमी दिवसात हा अभ्यासक्रम पुरा करायचा म्हणजे फक्त पाट्या टाकण्याचे काम होणार. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिक्षक या गोष्टीला विरोध करत नाहीत. यामुळे शिक्षकांबद्दलचा आदर कमी होणार आहे. कारण शाळेत पुरा न होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खाजगी क्लासेसला प्रोत्साहन देण्याचे हे धोरण आहे. या १७१ दिवसातीलही कितीतरी दिवस कोरोनामुळे गेलेले आहेत. मग कसे हे शैक्षणिक वर्ष असेल? टी-२० सामन्याप्रमाणेच हे बेभरवशी शैक्षणिक वर्ष आहे.
शिक्षणाच्या धोरणानुसार एकूण दोन सत्र असतात. यातील पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमात पहिल्या सत्रात सगळ्या विषयांची मिळून १६९८ पाने शिकवावी लागतात. तर दुसºया सत्रात १३४८ पाने शिकवावी लागतात. क्रमिक पुस्तके आणि वर्कबुक मिळून हा अभ्यासक्रम असतो. म्हणजे दररोज सरासरी वीस ते पंचवीस पाने अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या असलेल्या वेळेत इतकी पाने शिकवली जावू शकत नाहीत. मग धडे वगळा, पाने कमी करा या धोरणाने मुलांना काय शिक्षण या वर्षात मिळाले याचे संशोधन करावे लागेल. आमची शिकणारी पिढी एक वर्ष नापास झालेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या मेंदूची काही क्षमता असते, हे तरी समजले पाहिजे.
पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात पहिल्या सत्रात एकूण क्रमिक पुस्तकांची २७२६ पाने शिकवली जातात. तर दुसºया सत्रात २६६७ पाने शिकवावी लागतात. म्हणजे सध्याच्या वेळेनुसार दररोज सरासरी ३२ पाने शिकवली जातात. शाळा न भरल्याने यातले काहीच शिकवले गेलेले नाही. २५ टक्के अभ्यासक्रमही शिकवला गेलेला नाही. त्यामुळे हे एक वर्ष संपूर्ण अभ्यासक्रमाच्या दृष्टीने नापास ठरलेले आहे. धडे वगळून उरलेला अभ्यासक्रम घाईघाईने पूर्ण करणे म्हणजे विद्यार्थ्यांना ही व्यवस्था काय यंत्र समजते? मुलांना समजले आहे की नाही, याचा विचार न करता फक्त पाने पुढे सरकवली जातील. मुलांना समजले आहे की नाही याचा विचार न करता शाळा भरवल्या जातील. हे सगळे धोरण खाजगी क्लासेस चालकांचे उखळ पांढरे करण्यासाठी केले जाणार आहे. बीवाजेयू, व्हाईहॅट ज्युनिअर अशा काही खाजगी यंत्रणा सध्या शिक्षणात घुसल्या आहेत. हृतिक रोशनसारखा नट त्याची जाहिरात करतो. अशा संस्थांचे उखळ पांढरे करणारे हे षड्यंत्र नाही ना असा प्रश्न यातून निर्माण होतो. त्यामुळे शाळेत फक्त नावनोंदणी करायची. शिक्षकांनी मुलांना काही शिकवायचे नाही. सहा महिने काम न करता फुकटचा पगार सरकार शिक्षकांना देणार. त्या बदल्यात त्या सरकारच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला, प्रचाराला शिक्षक वेळ देणार. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादण्याचा हा नवा फंडा आहे.
या अनिश्चित शिक्षण पद्धतीवर आणि त्याच्या नियोजनावर विचार होणे आवश्यक आहे. एक वर्ष आमची शाळा आणि शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे, हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा