शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शरद पवार


कोणत्याही भागात कधीही भूकंप झाला की त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे, किती रिश्टर स्केलचा तो भूकंप आहे हे पाहिले जाते. त्याचप्रमाणे कोणताही राजकीय भूकंप असेल तर त्याचा केंद्रबिंदू हमखास शरद पवारच असणार असा कोणी संशय व्यक्त करतो, तर कोणी छातीठोकपणे सांगतो. कोणी आतल्या आवाजात बोलतो, तर कोणी अभिमानाने सांगतो या घडामोडीमागे शरद पवारच आहेत, त्यांचाच हात आहे वगैरे वगैरे. आज हाच भूकंपाचा केंद्रबिंदू असलेले ज्येष्ठ नेते भारतीय राजकारणातील अविभाज्य भाग असलेले शरद पवार आता ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, पण आजही त्यांच्यातील निद्रिस्त ज्वालामुखी सळसळतो आहे. एका मोठ्या भूकंपासाठी हा लाव्हारस बाहेर येऊ पाहतो आहे.


माणसं वयानं नाही तर मनानं म्हातारी होतात. माणसाची कार्यक्षमता ही वयावर नाही, तर मनावर अवलंबून असते हे शरद पवारांकडे पाहून लक्षात येते. घटकेत मुंबई. घटकेत पुणे, बारामती, तर घटकेत दिल्लीत जाऊ न आपल्या भूमिका चोख करण्याचे कसब त्यांच्यात आहेत. ही इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक भूकंप देशाच्या राजकारणात घडवून आणले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अचानक यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड होणार ही बातमी आली. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या पोटात गुडगुडू लागले. ज्या काँग्रेसच्या विदेशी नेतृत्वाला विरोध करत त्यातून बाहेर पडले आणि पाच वर्षांनंतर त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कृषी मंत्री झाले, त्या सोनिया गांधींचे यूपीएचे अध्यक्षपद काढून घेणे हे तितके सोपे नव्हते. यूपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपदाचा उमेदवार. सोनिया गांधींना ते मिळाले नाही, मिळू दिले नाही, पण शरद पवारांना ते सहज मिळणार हे निश्चित. मग शरद पवार जर पंतप्रधानपदाचे उमेदवार, यूपीएचे अध्यक्ष म्हणून पुढे आले तर काँग्रेस संपल्यातच जमा आहे. २०० जागा असल्यामुळे हे पद काँग्रेसकडे गेले होते. हे पद जर शरद पवारांच्या जागा आमच्यापेक्षा जास्ती आल्या तर त्यांनाही मिळेल, असे २००९ च्या निवडणुकीत राहुल गांधी म्हणाले होते. शरद पवारांचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही खासदार नव्हते. अशा परिस्थितीत आपले वाढणार नाहीत ना, मग त्यांचे कमी झाले तरी चालतील. ही रणनीती आखून काँग्रेस आज तीन अंकीवरून दोन अंकी आली. आता शरद पवारांना हा पल्ला गाठणे अवघड नाही. त्यामुळेच काँग्रेसमध्येच भूकंप घडवणारी ही बातमी दोन दिवस चालली. अर्थात पवारांनी त्यात काही तथ्य नसल्याचे बोलून दाखवले, पण राजकीय भाषेत म्हणे असे म्हणतात की, पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हो असतो आणि हो म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ नाही असतो.

काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधींमध्ये सातत्य नाही असे मुलाखतीत उत्तर देऊ न राहुल गांधींची निष्क्रियता पवारांनी अधोरेखित केली होती. आता यूपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेने सौम्य का होईना काँग्रेसला धक्का बसला आहे, पण शरद पवार हे चांगले राजकारणी, मुत्सद्दी, धोरणी असले तरी त्यांचा कामाचा झपाटा प्रचंड आहे. गेल्या वर्षी पक्षाच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्याला त्यांनी विरोध केला होता. याचे कारण राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुष्काळाचे संकट शेतकºयांवर घोंगावत असल्याने वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. मात्र हा वाढदिवस शेतकºयांना समर्पित करून बळीराजाला मदत करायची अशी भूमिका मांडल्यावर त्यांनी होकार दिला. म्हणून ते खºया अर्थाने शेतकºयांचे नेते आहेत. आजही शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नाही, तर त्यावर तोडगा निघण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते दिल्लीत दाखल झाले आहेत. हे शेतकºयांच्या प्रेमापोटी करणाराच खºया अर्थाने शेतकºयांचा नेता असू शकतो. गतवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ८० लाख रुपयांचा निधी बळीराजासाठी कृतज्ञता निधी म्हणून उभा केला गेला. यातील रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांच्या नावे ‘फिक्स डिपॉझिट’ केली जाईल. त्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत, अशी भूमिका यामागे आहे.


१९९९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात स्थित्यंतर घडले. सोनिया गांधींचे नेतृत्व अमान्य करून शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा पवार यांच्या मागे तरुणांची मोठी फळी उभी राहिली होती. त्यात त्यांनी छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आणि प्रोत्साहन दिले होते. आज पवार हे ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयातही त्यांची जिद्द, ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे मन तरुण आहे. म्हणूनच मरगळ आलेली परिस्थिती ते बदलू शकतात. म्हणूनच त्यांच्यातील ज्वालामुखी आता काय भूकंप करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

आज भाजपकडे नेतृत्व आहे, तर काँग्रेस आणि यूपीएकडे सक्षम नेतृत्व नाही म्हणून भाजप सत्तेत आहे, पण शरद पवारांच्या रूपाने जर सक्षम नेतृत्व आहे हे दाखवले गेले, तर ते मोदी, शाह यांच्या भाजपला धक्का देऊ शकतात. आज शेतकºयांची ताकद आपल्या पाठीशी उभी करून ते याचा फायदा उठवू शकतात याची जाणीव भल्याभल्यांना आहे. म्हणूनच तर त्यांना भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. याच शरद पवारांनी १९९८ ला वाजपेयी सरकार १ मताने कोसळवले होते. त्यामुळे कोणताही भूकंप घडवून आणण्याची ताकद फक्त शरद पवारांकडे आहे हे नक्की.


गेल्या वर्षी सरकार स्थापनेचा प्रश्न त्यांनी असाच सोडवला. मतदारांनी कौल युतीला दिला होता. पण ती युती फोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा भूकंप शरद पवारांनी करून दाखवला. राज्यात कोणतेही सरकार स्थापन करायचे असले तरी ते शरद पवारांच्या हातात असते. १९९९ ला सेना, भाजप युती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी परस्पर लढले होते. या तिरंगी लढतीत युतीच्या जागा जास्त होत्या, पण बहुमत नव्हते. पण परस्परविरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि पवारांच्या कृपेने त्यांनी सरकार स्थापन केले. त्यामागे युतीला सत्तेपासून दूर ठेवायचे हा उद्देश होता. या आघाडीने पंधरा वर्षं सत्ता गाजवली. २०१४ ला सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे स्वतंत्र लढले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यावेळी शिवसेना आणि भाजप एक होऊ नयेत म्हणून न मागताच भाजपला पाठिंबा शरद पवारांनी दिला आणि दोघांमधली दरी वाढली. नंतर जरी सेना, भाजप एकत्र आले होते तरी ते फडणवीस सरकार म्हणून होते, सेनेला दुय्यम स्थान होते. ही अपमानाची सल पवारांनी सतत तेवत ठेवली होती. त्याचा वापर २०१९ ला करून घेतला.

२०१९ ला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आणण्याची खेळी त्यांचीच होती. त्यामुळे कोण किती जागा मिळवतो याला महत्त्व नसते. पवार म्हणतील त्याचे सरकार होते. १९७८ पासून राज्यात कोणाचे सरकार असावे हे पवार ठरवत आले आहेत. म्हणूनच त्यांना राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हटले जाते. सर्वात कहर म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या याप्रमाणे भाजप, सेना मेगाभरती करत होते. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आयात करत होते. त्यात राष्ट्रवादीचे सातारा मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून आलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, भाजपत गेले आणि पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत होते. उदयनराजे निवडून येणारच हे सगळे छातीठोकपणे सांगत होते, पण त्यांना पराभूत करून त्यांची जागा दाखवून देणार या इराद्याने शरद पवार मैदानात उतरले. भरपावसात प्रचारसभा घेऊ न मतदारांवर छाप पाडली आणि साताºयात राजकीय भूकंप घडवला. राजे असलात तरी जनता आमच्या पाठिशी आहे हे दाखवून दिले. उदयनराजेंना पराभूत केले. ही ताकद अन्य कोणात नाही. उदयनराजेंच्या विरोधात उभे राहायला कोणी तयार नव्हते, पण शरद पवारांच्या आग्रहाखातर श्रीनिवास पाटील उभे राहिले आणि पुन्हा एकदा खासदार झाले. इथे मिजास राष्ट्रवादीचीच असेल हे दाखवून दिले.


राजकीय भूकंप करणारे असले तरी त्यांचा असा एक विचार आहे. देशभरात आजही लोक म्हणतात की, देशाला दिशा देणारा एक नेता महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे शरद पवार. जेव्हा पक्षाचा पडतीचा काळ होता तेव्हाही हिंमत वाढवण्याचे काम त्यांनी केले. आज देशात पवार हे एकमेव व्यक्ती आहेत जे सर्वांना एका छताखाली आणू शकतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वपक्षीय खासदार, आमदार या सर्वांना एकत्र आणण्याची किमया फक्त त्यांच्यात आहे. म्हणूनच यूपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली तेव्हा काँग्रेसच्या पोटात गोळा उभा राहिला.

शरद पवार हे आपल्या सहकाºयांच्या नेहमीच पाठिशी असतात. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला जर कोणता उत्कृष्ट मुख्यमंत्री लाभला असेल, तर ते म्हणजे शरद पवार. त्यांनी पुलोद सरकारच्या माध्यमातून जो विकास केला तो अल्पकाळात राज्यात झालेला सर्वश्रेष्ठ कारभार होता. सर्वच क्षेत्रात शरद पवार यांनी आपला ठसा उमटवला आहे, पण राजकारणात भूकंप करणारे नेते म्हणून त्यांची ओळख असली, तरी खरे भूकंप त्यांनीच खºया अर्थाने सावरले होते. १९९३ चा लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये संवेदनशील परिस्थिती त्यांनी योग्यरीत्या हाताळली. म्हणूनच तर अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना आपत्ती निवारणासाठी असलेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले होते. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासांत मुंबई पूर्ववत केली. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेले पवार हे सतत चर्चेत राहणारे नेते आहेत. कोणत्याही घटनेवर पवारांचे भाष्य महत्त्वाचे असते. त्यामुळेच आज त्यांच्या नावाची चर्चा यूपीए अध्यक्षपदासाठी सुरू झाल्यावर खळबळ माजली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: