गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

विकायला शिका


महाराष्ट्राकडे किंवा कोकणाकडे इतर प्रांतियांची किंवा भांडवलदारांची पाहण्याची दृष्टी ही एक ग्राहक अशी आहे. आपण कायम खरेदीदार, सेवक, श्रमिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यामुळे इथल्या विकासाला योग्य दिशा मिळत नाही. परकीय कंपन्या, अमराठी कंपन्यांनी मराठी भाषा पर्याय का दिला नाही, म्हणून खळ्ळ खट्याक करून हा प्रश्न सुटणार नाही. मराठी पर्याय दिला, तरी आपण ग्राहक असणार आहोत. आपल्या खिशातला पैसा त्यांच्या तिजोरीत टाकणार आहोत. म्हणून मराठी माणसांनी ग्राहकाबरोबरच विक्रेता, उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्या मराठी प्रेमाला अर्थ असेल.


विकासाच्या कल्पना या नवे उद्योग, प्रकल्प याच्याशी निगडीत झाले आहेत. कोकणात मुंबईत अन्य महाराष्ट्रात अनेक प्रकल्प सुरू आहेत. बाहेरचे लोक येऊन हजारो कोटींची गुतवणूक करत आहेत. सरकार करार करत आहे, पण असे उद्योग इथे उभारले जातील आणि तिथे इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल एवढीच अपेक्षा केली जाते, पण या मिळणाºया नोक‍ºया कोणत्या वर्गातील आहेत, याचा विचार केला पाहिजे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोक‍ºया आम्ही करतो. वरीष्ठ पातळीवरच्या, कुशल आणि तांत्रिक कर्मचाºयांमध्ये इथल्या तरुणांना किती संधी मिळते, याचे गणित समोर येत नाही. व्यवस्थापकीय पातळीवर बाहेरची माणसे आणली जातात, कारण महाराष्ट्रीयन माणसांना ती कामे जमत नाहीत, असा शेरा मारला जातो.

आम्ही वस्तू उत्पादित करू शकतो, पण त्या विकू शकत नाही. ही आमची मानसिकता बाकीच्यांनी ओळखली आहे, त्यामुळेच आमचे खच्चीकरण झालेले दिसून येते. आम्ही शेतीचे उत्पादन करू शकतो, पण शेतमालाची विक्री करण्यासाठी आम्हाला परस्वाधीन रहावे लागते. जगात अशी कोणतीही वस्तू नाही की, ज्याच्या विक्रीचा दर ग्राहक ठरवतो. फक्त भारतातील शेती माल धान्य याचा भाव उत्पादकाव्यतिरिक्त अन्य लोक ठरवतात. शेतक‍ºयांचे इथेच खरे शोषण होताना दिसते आहे. आम्हाला आमच्या वस्तूचे दर ठरवता येत नाहीत. ती वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला आणि त्यासाठी सोसाव्या लागणा‍ºया कळा आम्हाला नको आहेत. हे चित्र बदलले पाहिजे.


मराठी माणसाने काहीतरी विकायला शिकले पाहिजे. एखादी वस्तू दुसºयाला विकताना त्याच्या खिशातील पैसा काढून घेण्याची कला आत्मसात करण्याची गरज मराठी माणसाला साध्य झाली पाहिजे. आज संपूर्ण जगात जाहिरात, विक्री व्यवस्थापन यावर प्रत्येक क्षेत्राचे अस्तित्व अवलंबून आहे. तेच कसब मराठी माणसाकडे तुलनेने खूपच कमी असल्यामुळे बाहेरचे उद्योग इथे आले की, त्यांचे उच्च पदस्थ येतात. आम्ही फक्त कामगार, कर्मचारी, मजूर म्हणूनच राहतो. आम्ही काय विकू शकतो? आम्ही फक्त आमच्या जमिनी विकतो. त्या जमिनीचे सौदेही आम्ही नीट करू शकत नाही. आमच्या जमिनीची किंमत आम्हाला कळत नाही. बाहेरून येणा‍ºयाने एकरी अमुक इतके लाख, तमुक इतके हजार सांगितल्यावर दिसणारी मोठी रक्कम आम्हाला मोहात पाडते. जमिनीत शेतीचे उत्पादन न घेता त्या कारखानदारांना, सेझला, प्रकल्पांना देताना त्याचा तह हयात मोबदला मिळवण्याचे कसबही आम्हाला साधलेले नाही. म्हणून आधी आपल्याला काहीतरी योग्य भावात विकायची सवय लावून घेतली पाहिजे.

कोणत्याही कंपनीच्या जाहिरातीत जर सेल्स आॅफिसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह अशा जागांसाठी भरती असेल, तर त्या जागांसाठी अर्ज करणाºयांमध्ये मराठी माणसांची संख्या फार कमी असते. त्याठिकाणी पंजाबी, मध्य प्रदेश, दिल्ली किंवा दाक्षिणात्य लोकांची गर्दी होते. याउलट पर्चेस आॅफिसरची व्हेकन्सी असली की, तिथे सर्वाधिक मराठी माणसे अर्ज करताना दिसतात. चांगला पगार हा सेल्स एक्झिक्यूटिव्ह मिळवू शकतो, पण त्यासाठी टार्गेट ओरिएंटेड, अशी प्रतिमा तयार करण्याची आमची तयारी नसते. यासाठी मराठी माणसांनी, कोकणातील माणसांनी काहीतरी विकायला शिकले पाहिजे. विकण्याची कला आत्मसात केली म्हणजे तुम्हाला कोणी सहज खरेदी करू शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आज कोणीही येतो आणि कोकणात प्रकल्प उभे करा म्हणतो, पण त्या प्रकल्पात प्रत्येक डिपार्टमेंटला आमचीच माणसे असतील, अशी आपण अट घालू शकत नाही. कारण त्या त्या डिपार्टमेंटचे कौशल्य आम्हाला साध्य झालेले नाही. यासाठी आवश्यक ते शिक्षण घेतले पाहिजे, कौशल्य प्राप्त केले पाहिजे. हे आम्हाला समजलेच पाहिजे. एखादी वस्तू विकून पहा. रस्त्यावर उतरा, मार्केटमध्ये उभे रहा म्हणजे आपोआप हे कसब प्राप्त होईल. आज ही गोष्ट मराठी माणसात नसल्यामुळे आपण मागे पडतो आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. एक काळ असा होता की, स्वातंत्र्यानंतर सिंध प्रांतातील माणूस विस्थापित झाला. सर्वस्व लुटले गेले त्याचे. ठिकठिकाणी छावण्या उभारून भारतात सिंधी कॅम्प तयार केले गेले. फिनिक्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसते, तर सिंधी माणसाची जिद्द म्हणजेच फिनिक्स पक्षाची भरारी आहे. उत्तम विक्रय कला आत्मसात करून जास्तीत जास्त उद्योजक आज सिंधी लोक आहेत. आम्ही वेगवेगळ्या प्रकल्पात विस्थापित झाल्यानंतर काय केले हा आपल्याला विचार करावा लागेल. आता मराठी माणसाने, विस्थापित होणार नाही, असा निर्धार केला पाहिजे. आपणच आपले प्रकल्प उभारून इथला विकास करू ही जिद्द ठेवली, तर कोणी आपल्याला खरेदी करायला येणार नाही. मराठी माणूस हा सहज विकला जाणारा नाही हे जगाला पटवून दिले पाहिजे. यासाठी काहीतरी विकायला शिकले पाहिजे. खारघर, बेलापूर, कामोठे अशा नवी मुंबईतील महत्त्वाच्या भागात, जास्त लोकसंख्या असलेल्या भागात मराठी वर्तमानपत्रे विकणारी मुलेसुद्धा दाक्षिणात्य आहेत. पहाटे उठून लवकर वेळेत पेपर वाचकांसाठी पोहोचवावा यासाठी निरनिराळे पाचशे ते सातशे अंक विकणारी दाक्षिणात्य मुले दरमहा आठ ते नऊ हजार कमाई करतात, पण मराठी तरुणांना पेपर विकायची लाज वाटते. दूध घालायला येणारे भय्ये आहेत. मराठी माणूस फा-फार तर घरात म्हशी पाळेल आणि त्यांचे दूध डेअरीला घालेल. नंतर दूधाला चांगला भाव मिळत नाही, म्हणून ओरड करेल. दुकानात गेलो तरी वेगवेगळी दुकाने वेगवेगळ्या प्रांतातील लोकांनी थाटलेली दिसतात. म्हणजे आम्ही कायम खरेदीदारच व्हायचे. प्रत्येक जण आपल्याला खरेदी करतो आहे. आपण परस्वाधीन झालो आहे. हे चित्र बदलले पाहिजे. काही तरी विकायला शिकले पाहिजे. आजकाल लोकं स्वप्नसुद्धा विकतात. अ‍ॅम्वेसारख्या कंपन्यांचे एजंट स्वप्न विकतात. आम्ही वस्तूही विकू शकत नाही. वस्तू विकण्याचे कौशल्य आत्मसात केले म्हणजे कोणी आमचा दुरूपयोग करून घेणार नाही. विकण्यासाठी ज्या कल्पकतेची, धीर धरण्याच्या स्वभावाची, सकारात्मक दृष्टीची गरज आमच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी लागणारी सहनशीलता आम्हाला प्राप्त करता आली पाहिजे. नकार सहन करण्याची तयारी असली पाहिजे. ग्राहक कसाही वागला, तरी न चिडता त्याचे समाधान करून त्याच्या खिशातील पैसा काढण्याची सवय आम्हाला लागेल तेव्हाच आम्ही स्वत:चा व महाराष्ट्राचा विकास करू शकू. ही कला आम्हाला आत्मसात होत नाही तोपर्यंत आम्ही विस्थापित होत राहणार, प्रकल्पग्रस्त होणार. आता आपण नोकर म्हणून काम करायचे नाही. गुलाम म्हणून काम करायचे नाही, तर अत्यंत व्यावसायिकपणे आपले श्रम विकायला शिकले पाहिजे. हे श्रम विकताना त्या श्रमाची ताकद आणि दर्जा आपण उत्तम ठेवला पाहिजे. दर्जेदार वस्तूला जसा चांगला भाव येतो, तसाच आपल्या श्रमाला चांगला भाव मिळवण्याची वृत्ती आपण निर्माण केली पाहिजे. हा कोकणातील हापूस आंबा आहे, पण रायवळ आंबा विकल्याच्या वृत्तीने तो विकला, तर स्वस्तात विकला जाणार आहे. त्यासाठी त्या कोकणच्या राजाची लज्जत आणि शान कशी वेगळी आहे हे सांगायला आपणच पुढे आले पाहिजे. यासाठी आता काहीतरी विकायला शिकले पाहिजे. खरा अनुभव विकण्याने येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: