गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

सोनेरी दिवस पुढे आहेत


२०२० ची सुरुवात झाली आणि प्रत्येक जण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होता. नवीन वर्ष सुखाचे जावो वगैरे वगैरे, पण तेव्हा कोणाला माहिती होते की वर्ष अनेकांना उद्ध्वस्त करणारे आहे? अनेकांना कोरोनानामक संकटात ढकलणारे आहे, अनेकांचा जीव घेणारे असेल असे कोणाला वाटलेही नव्हते, पण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला कोरोनाचा रुग्ण केरळमध्ये आणि नंतर मुंबईत आला आणि संपूर्ण देशात हाहाकार माजला. अर्थात तरीही भारतात हा रोग नियंत्रणातच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सरते वर्ष सुरू झाले तेव्हा असे काही या ३६५ दिवसांच्या पोटात असेल, असे वाटण्याचे काहीच कारण नव्हते. अगदी सहज असल्यागत आपण सा‍ºयांनीच एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कोरोनाच्या महामारीतून आपण सहीसलामत बाहेर निघतो आहोत, त्यासाठी या शुभेच्छाच कदाचित महत्त्वाच्या असतील असा आशावाद बाळगायला काहीच हरकत नाही. याचा अर्थ एकमेकांविषयी कायमच अनौपचारिक भावाने शुभेच्छा ठेवल्या तर हे जग किती सुंदर होईल. म्हणजे १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात १ कोटी लोकांना या रोगाची बाधा झाली आणि सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडले, पण हे नियमित आजार आणि मृत्यूचे प्रमाण असते त्याच्या मानाने खूप कमी आहे आणि सध्या तर बाधित रुग्णांची संख्या जेमतेम २ लाख ८० हजारांच्या आसपास आहे. याचा अर्थ आपण पूर्णपणे यावर नियंत्रण मिळवत आहोत. तसेच लवकरच लसीकरण सुरू होत असल्याने आता या रोगाची चिंता या वर्षात करायची नाही हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात प्रत्येकाने आपल्या मनाला समजवायचे आहे की 'झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा', असा संदेश देण्याची ही वेळ आहे.

२०२० मध्ये जे गमावलं आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यावर्षी साधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यानंतर या वर्षाचा नकाशाच बदलला. काळ थांबला. ख‍ºया अर्थाने थांबला यासाठी की व्यवहार थांबले. याआधीही असे साथरोग, महामा‍ºया आल्याच नाहीत असे नाही, मात्र त्यावेळी जागतिकीकरणाचा वेग, प्रसार इतका तीव्र नव्हता. त्यामुळे भारतात प्लेग पोहोचायला वेळ लागला. मलेरिया, टायफॉईड, अगदी एड्सदेखील भयावह वाटले; पण रुळले, माणसाळले असेच म्हणावे लागेल. हे रोग पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत, मात्र त्यांची भीती संपली आहे. त्यांच्यासोबत जगायला माणूस शिकला आहे. तसेच कोरोनाचेही होणार आहे. आता कुणी सहजच सांगतं, गेल्या आठवडाभर पडून होतो घरातच. मलेरिया झाला होता... तसलेच आता कोरोनाच्या बाबत काही वर्षांनी होईल. त्यामुळे चिंता करायची गरज नाही, नव्या वर्षात जाताना नव्या उमेदीने प्रवेश करायचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे इतकेच. त्यासाठी सर्वांना एकमेकांना शुभेच्छा देऊ न धीर द्यायचा आहे.


माणूस भूतकाळातील आपले वैभव कुरवाळत बसतो आणि भविष्याकडे नैराश्याने पाहतो असे कधी कधी होते. पूर्वी किती छान होते, आता तसे राहिले नाही अशी चिंता करत तो बसतो, पण लक्षात घेतले पाहिजे की पूर्वीचे दिवस चांगले असतीलही, पण त्याहीपेक्षा चांगले दिवस भविष्यात येतील असा विश्वास ठेवला पाहिजे. गोल्डन डेज आर अहेड म्हणजे सोनेरी दिवस येणारे असतील असा विचार केला, तर आत्मविश्वासाने आपण पुन्हा उभारी घेऊ . नवीन २०२१ हे वर्ष फिनिक्स भरारी घेणारे वर्ष आहे या विश्वासाने त्यात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने शुभेच्छा देणे गरजेचे आहे.

कोरोनाला जागतिक अर्थकारणाचे आणि राजकारणाचे संदर्भ आहेत. त्याचा प्रसार जागतिकीकरणाच्या वेगाने झालेला आहे. येत्या काळात विषाणूयुद्धच केले जाईल, हे बोलले जात होते. कोरोना, या चीनने त्याच प्रकारात सुरू केलेला जगाचा छळ आहे, असे थेट म्हणता येईल असे पुरावे नाहीत, पण आगामी काळात असे हल्ले वारंवार होत राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला या नव्या युद्धप्रकारात जगण्याची जीवनशैली तयार करता आली पाहिजे. त्याच जीवनशैलीचा भाग म्हणजे जास्तीत जास्त अंग झाकून घेणे, मास्क लावणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे वगैरे वगैरे. कोरोनाने जगाला बघता बघता वेठीस धरले, कारण जग जवळ आलेले आहे. जागतिकीकरणाच्या व्यवहारांनी एकमेकांवर सारेच देश अवलंबून राहू लागले आहेत. अशा परिस्थितीत जगाला लांब करण्याचे काम कोरोनाने केले. अर्थव्यवस्थेवर फार मोठा हल्ला झाला. लोक देशोधडीला लागले, पण हे दिवस जाणार आहेत. रात्रीनंतर उजेड असतो हा विचार करून आपण 'उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' म्हणत प्रकाशाच्या दिशेने जायचे आहे हे लक्षात घेतले तर आगामी सोनेरी दिवस आपल्या हातात असतील. त्यामुळे आता चिंता न करता आपल्याला नवीन वर्षात प्रवेश करायचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. चिंता आणि चिता यात काही फरक नसतो. चिता मृत माणसाला जाळते, तर चिंता जिवंत माणसाला जाळते. म्हणूनच या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी पुढे जायचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: