शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

डिसलेंचे टॅलेंट दिसले


ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाºया रणजितसिंह डिसले यांना यंदाचा ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची अशी आहे. युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टिचर पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात त्या शिक्षकाने मिळवला ही अतिशय आनंदाची बाब आहे. खाजगी आणि भांडवलदारांच्या शाळेतील इंग्रजी माध्यमाच्या शाळांची प्रौढी सांगणाºया लोकांना हा पुरस्कार अंजन घालणारा आहे. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकही किती दर्जेदार आहेत हे दाखवून देणारा आहे. त्यामुळे सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांचा या पुरस्काराने गौरवच केलेला आहे, असे म्हणावे लागेल.


डिसले हे अत्यंत सभ्य, विचारवंत आणि काळाच्या पुढचे पाहणारे असेच आहेत. त्यांनी व्यक्त केलेली मते फार बोलकी आणि देशाला दिशा देणारी आहेत, पण त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने एक खºया अर्थाने ग्रामीण भागातील गुणवत्ता जगाच्या समोर आलेली आहे, म्हणून त्यांचे विशेष अभिनंदन करावे लागेल. शहरातच टॅलेंट आहे असे नाही, तर ते ग्रामीण भागातही आहे. फक्त ते दिसले पाहिजे हे डिसले यांनी दाखवून दिले. सध्या आपण खूप कठीण काळातून जात आहोत. या काळात चांगलं शिक्षण मिळणं हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं डिसले सांगतात. हा फार मोठा विचार आहे. तो विचारच आपल्याला तारून नेईल. आज सगळीकडे पोटार्थी किंवा कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून डीएड बीएड करून शिक्षक होणारे लोक असताना रक्तात शिक्षक असलेले डिसले हे खरे शिक्षक आहेत. मागासवर्गातल्या मुलींच्या शिक्षणासाठी डिसले यांनी विशेष प्रयत्न केलेत. त्यामुळे या मुलींची शाळेतून गळती थांबली. तसंच बालविवाहालाही आळा बसला, असं वार्की फाऊंडेशननं पुरस्कार देताना म्हटलं आहे. हा देशाचा गौरव आहे.

डिसले हे अत्यंत अत्याधुनिक आणि तयार असलेले शिक्षक आहेत. डिसले यांनी शिक्षणामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून मुलांना सोप्या भाषेत कसं शिकता येईल यावर अधिक भर ते देतात. त्यासोबत तब्बल ८३ देशांतल्या मुलांसाठी ते विज्ञानाचे आॅनलाइन क्लासेस घेत आहेत. अशांत देशातील मुलांसाठी क्रॉस द बॉर्डर नावाचा कार्यक्रमही ते राबवत आहेत. हे फार मोठे कार्य आहे. फक्त हा पुरस्कार मिळेपर्यंत त्यांचे कार्य देशात कुठेच कोणाला कसे दिसले नाही, हा प्रश्न पडतो.


शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांची तुलना करायची झाली तर ग्रामीण भागातील पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी अधिक काळजी करायला पाहिजे. शिक्षणातली गुंतवणूक ही केवळ मुलांचं भविष्य उजळवत नाही, तर त्यामुळे घराची आर्थिक परिस्थितीही उंचावते, असा विचारच डिसले यांनी मांडला आहे. शासकीय यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाºया बिगर सरकारी संस्थांमध्ये समन्वय वाढला, तर सरकारी शाळा अधिक सुधारतीलही, असं त्यांना वाटतं. ते त्यांनी करून दाखवले आहे. सध्या प्रत्येक जण अलिप्तपणे काम करताना दिसत आहे. मोठा बदल घडवण्यासाठी टीम वर्क गरजेचं आहे. शिक्षकांना पुरेसा आदर मिळायला पाहिजे हा त्यांचा विचार आहे. त्या विचारानेच त्यांनी काम केलेले दिसते.

खरं तर हा पुरस्कार त्यांना त्यांच्या एका कामासाठी मिळालेला नाहीये. यात अनेक वर्षांची मेहनत आहे. ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण, अशांत देशातल्या मुलांसाठीचं काम, तसंच मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी केलेले प्रयत्न यात सामील आहेत. याआधीपण डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाऊंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. क्यूआर कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता. सरकारी शाळा अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था यांच्यात समन्वय पाहिजे असं त्यांना वाटतं. तसं झालं तर सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणखी वाढेल. सरकारने शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे, असंही ते आवर्जून सांगत होते. आता सरकारने त्यांची विशेष दखल घेतली पाहिजे. शिक्षणाची गरज एका वेगळ्या उंचीवर नेऊन जगापर्यंत पोहचवणारे डिसले हे जगाला त्यांच्या टॅलेंटने दिसले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: