एखादी व्यक्ती जेव्हा खूप मोठी होते, त्यावेळी ती संपूर्ण जगाचे आकर्षण असते. त्या व्यक्तीच्या जीवनातील घटना, संघर्ष वाचणे, पाहणे आणि समजून घेणे हे प्रत्येकाला आवडत असते. त्यामुळेच आपल्याकडे छत्रपती शिवरायांवर असंख्य चित्रपट निर्माण केले गेले. रामायणावर आधारित असे असंख्य चित्रपट, मालिका तयार केल्या गेल्या. त्याच पंगतीत आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यावे लागते. कारण त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांनी दिलेला लढा, त्यांनी मांडलेला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक आणि चित्रपट हे एक चांगले माध्यम आहे. टीव्ही मालिका हे चांगले माध्यम आहे. सहाजिकच या संघर्षमय जीवनाचे कथानक मांडताना अनेकजण पुढे येताना दिसतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक चित्रपट तयार झाले, नाटकातूनही ते आले, पण सर्वात जास्त गाजला तो डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट. सर्वाधिक बारकावे आणि अभ्यास करून लोकांना आवडेल आणि सहज समजेल अशा प्रकारे केलेली ती उत्कृष्ट निर्मिती आहे. विशेष म्हणजे दिग्गज कलाकार आणि त्यांची मांदिआळी यात दिसून येते.
या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका केली आहे ती सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता मामुटी याने. दक्षिणेत रजनीकांतच्या बरोबरीने मामुटीचे नाव मोठे आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट पाहिल्यावरच त्या चित्रपटाची भव्यता कळते. मामुटीबरोबरच या चित्रपटात रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी केलेली आहे. अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अप्सरावाली नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच या चित्रपटात सविता आंबेडकर या भूमिकेत मृणाल कुलकर्णी यांनी आपले दर्शन दिले आहे. अनेक दिग्गज कलाकारांमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा ज्यांच्याशी सातत्याने वैचारिक संघर्ष होता ते म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींची भूमिका या चित्रपटात मोहन गोखले यांनी केलेली होती. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची भूमिका अंजन श्रीवास्तव या कलाकाराने केलेली होती. हे सगळे कलाकार त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते, पण आंबेडकरांवरील चित्रपटात काम करण्यासाठी ते एकत्र आले होते. विशेष म्हणजे याच वर्षी १४ जूनला ज्याने आत्महत्या केली आहे, तो सुशांत सिंहही या चित्रपटात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनच्या वास्तव्यात भेटलेला एक मित्र की ज्याचे नाव असनोडकर आहे ती भूमिका सुशांत सिंहने केली होती. विशेष म्हणजे आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ख्याती असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी यानेही या चित्रपटात भूमिका केली होती. महाडच्या आंदोलनातील नेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांच्या पुढे येतो. यातून काम केलेले सगळे अभिनेते हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत आणि होते. म्हणजे अगदी दादासाहेब फाळकेंच्या जीवनावरील चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी ज्याने गाजवली तो नंदू माधवही या चित्रपटात सहस्त्रबुद्धे नावाची भूमिका साकारतो. हे सगळे मोठे कलाकार आहेत. त्या प्रत्येकाने विविध चरित्रपटातून मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
सोनाली कुलकर्णी यांनी नाना पाटेकर यांच्यासमवेत प्रकाश आमटेंच्या जीवनावरील चित्रपटात प्रकाश आमटेंच्या पत्नीची भूमिका केली होती. मृणाल कुलकर्णी यांनी रमाबार्इंची चरित्र भूमिका लोकप्रिय केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीने ठाकरे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केली होती. नंदू माधवने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारली होती. सुशांत सिंहने धोनीची भूमिका साकारली होती. अंजन श्रीवास्तव हा वागळे की दुनियातून सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर होता. असे सगळे दिग्गज या चित्रपटात एकत्र आले होते, कारण हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन येणार होता.
विशेष म्हणजे हे सगळे घडवून आणले होते ते अत्यंत अभ्यासपूर्वक असे डॉ. जब्बार पटेल यांनी. त्रिलोक मलिक हे या चित्रपटाचे निर्माते होते. त्यांनी स्वत: या चित्रपटात लाला लजपतराय यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी लेखन करण्याची जबाबदारी दया पवार, अरुण साधू आणि सुनी तारापोरवाला यांनी घेतली होती. उत्कृष्ट पटकथा बांधून हा चित्रपट तयार झाला होता.
या चित्रपटाने १९९९ ला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. या चित्रपटातील अभिनयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणाºया मामुटीला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय नितीन चंद्रकांत देसाई या तरुणाला उत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. १९९९ मध्ये सुमारे ९ कोटी रुपये इतका प्रचंड खर्च करून या चित्रपटाची भव्य निर्मिती केली गेली होती. या चित्रपटाचे स्वागतही प्रेक्षकांनी चांगल्या प्रकारे केले होते.
याशिवाय त्यापूर्वी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा चित्रपट आला होता. याचे दिग्दर्शन आणि संवाद, पटकथा शशिकांत नलवडे यांची होती. अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पीकर, जगन्नाथ कांदळगांवकर, दशरथ पाटोळे, दाजी भाटवडेकर, दिव्यकांत मस्तकार, देवेन पराडकर, धनसिंग यादव, नारायण दुलाके, प्रकाश घांग्रेकर, प्रेमलता मस्कर, यशवंत सात्विक, रत्नाकर जांबुर्गेकर, वसंत इंगळे, विलास भणगे, श्याम पोंक्षे, सदाशिव चव्हाण, सीमा पोंक्षे, सुनीता कबरे, सुरेश भिवंडकर यांनी यात भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट १९९३ ला प्रदर्शित झाला होता. त्याला दत्ता डावजेकर यांचे संगीत होते.
तसेच सुबोध नागदेव यांनी २0१६ ला बोले इंडिया जय भीम हा एक चित्रपट बाबासाहेबांच्या जीवनावर काढला होता. त्याची पटकथा, दिग्दर्शन सुबोध नागदेव यांचेच होते. यात बाबासाहेबांचे अनुयायी असलेल्या एल. एन. हरदास यांची कथा होती.
२0११ ला साईनाथ चित्रचा प्रकाश जाधव दिग्दर्शित एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचे नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते. या चित्रपटात अनिल सुतार, अनुया बाम, अमेय पोतदार, आर. जी. पवार, कोमल आपके, खुशी रावराणे, गजानन रानडे, गणेश जेठे, जयंत यादव, दत्ता बोरकर, दत्ता रेडकर, दशरथ रागणकर, दशरथ हृतिसकर, दिपज्योती, नंदकुमार नेवालकर, निमेश चौधरी, निशा परूळेकर, नेत्रा पराडकर, परांजपे, पूजा जोशी, प्रथमेश प्रदीप, प्रदीप भरणकर, प्रभाकर मोरे, फडके गुरुजी, बालकलाकार : क्रिती शेरेगार, मनाली चक्रदेव, मनोज टाकणे, महेश चव्हाण, महेश ठाकूर, मिलिंद चक्रदेव, राधेया पंडित, रोहित रोडे, विक्रांत उकार्डे, विमल घाटकर, विलास जाधव, शंकर मळेकर, शरयू, शैलेंद्र चव्हाण, संकेत पवार, सतीश मुळे, सदाशिव चव्हाण, संदेश उतेकर, सायली विलनकर, साहिल कांबळे, सोनाली मुळे, स्नेहल विलनकर हे कलाकार होते.
अशा असंख्य कलाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर पुन्हा पुन्हा होत राहतील, कारण त्यांनी दिलेला विचार हा फार महत्त्वाचा आहे. तो सतत लोकांवर बिंबवावा लागणार आहे. स्टार प्रवाहवर असलेली त्यांची मालिकाही तितकीच आवडीने लोक पहात आहेत. हा त्यांच्या विचारांचा गौरवच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा