माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. म्हणूनच एकाकीपण त्याला खायला उठतं. अंतर राखून किंवा चारहात लांब राहणे हे म्हणीपुरते ठिक असलं तर आपल्या जवळचं, जीवाभावाचं कोणीतरी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आनंदानं खांद्यावर हात टाकता येईल असा मित्र असावा, दु:खात अश्रूंना वाट करून देईल असा कोणाचा तरी खांदा असावा, अशा प्रत्येक खांद्याची आपल्याला कायम गरज असते. हा खांदा मेल्यानंतरही मिळायला लागतो. कारण माणूस हा समाजप्रिय आहे. आज सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर राखायला सांगितल्यामुळेच माणूस सैरभैर झालेला आहे. वयाच्या अटीमुळे साठ वर्षांपुढचे लोक ना सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ शकत ना कोणाकडे दुर्घटना घडली म्हणून समाचारालाही जाऊ शकत. जवळचे नातेवाईक गेले, पण आपण त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाऊ शकत नाही, अशी खंत बाळगणारे लोक आज अनेक आहेत. कारण या सोशल डिस्टन्सिंग आणि साथीच्या भीतीने आम्हाला कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे.
हा कोंडमाराच फुटण्याची आज गरज आहे. घरात कोंडलेली सोशल डिस्टन्सिंगमुळे बाहेर पडू न शकणारी माणसं म्हणजे प्राणिसंग्रहालयातील पिंजºयात ठेवलेल्या वाघ, सिंहासारखी आहेत. पायाला नखं आहेत पण त्या नखांनी शिकार करायची नाही. प्राणिसंग्रहालयाचे मालक-चालक जे काही खायला आणून देतील ते खायचे. ज्यांचा धर्म-कर्म शिकार करून आपल्या शौर्याने आणि क्रौर्याने अन्न मिळवण्याचा आहे त्यांना मारून आणलेले मांस गोड लागत असेल का? त्या प्राण्यांच्या नखात आणि दातात जोर असेल का? जंगलातले प्राणी आणि पिंजºयातले प्राणी यात फरक दिसतोच. पिंजºयातील प्राण्यांचे डोळे हे किव करणारे असतात, आम्ही पकडलो गेलो आहोत याचे शल्य त्यांच्या मनात असते, पण मोकळे फिरणारे प्राणी टपोºया डोळ्यांनी बघत असतात. आज घरात कोंडमारा होणारे लोक असेच निश्चल, निस्तेज पडलेले दिसत आहेत.
आज पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे अशा शहरांसह अन्य शहरांमधून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ज्येष्ठ नागरिकांची जोडपी अशा कोंडमाºयाचे जीवन जगत आहेत. हे काही कोरोनाने केलेले नाही, पण म्हातारा-म्हातारी घरात आहेत. जुनं मोठं घर आहे, फ्लॅट आहे किंवा वडिलोपार्जित १०० वर्षांपासून असलेला बंगला आहे, पण आत राहात आहेत दोघंच. मुलगा, सुना, नातवंडं शिकायला, नोकरीला परदेशात स्थायिक झालेले आहेत. कधी तरी चारदोन वर्षांनी भारतात येतात किंवा येतही नाहीत. जग काय आज इंटरनेटमधून जवळ झालं आहे. व्हिडीओ कॉल करून म्हातारा-म्हातारीला पाहता येते, पण ते आभासी जग आहे. नुसतं पाहणं आणि प्रेमानं गालावरून हात फिरवणं यात फरक आहे. या प्रेमाच्या स्पर्शाची ज्या वयात गरज असते त्या वयात हे इंटरनेट आणि सोशल डिस्टन्सिंग नशिबी आले आहे. काय करायचे आहे त्या पैशाला आणि कमावण्याला? पण शेकडो, हजारो ज्येष्ठ नागरिकांची, म्हातारा-म्हातारीची हीच शोकांतिका आहे.
कोणीतरी त्यांना सोबती हवा आहे. कोणीतरी विश्वासाचे प्रेमाने जपणारे हवे आहे. औषधाच्या गोळ्या घेऊ न जगतो आहे, पण औषधे संपली तर ती आणायला कोणीतरी जवळचे पाहिजे. बाहेरून टिफीन मागवून खातो आहे, पण कधीतरी गरम करून देणारे कोणीतरी हवे आहे. मनात एकप्रकारची भीती आहे. आपण दोघंच म्हातारा-म्हातारी. कुणी चोरबिर शिरला घरात तर तो आपला मुडदाच पाडून जाईल. आपण त्याला प्रतिकारही करू शकणार नाही. घरात दोघंच राहतात, म्हातारा-म्हातारीच राहतात, कोणी नसतं हे किती वेळ लपवून ठेवणार आहे? चोर, दरोडेखोर टपलेले असतातच. हा बंगला, हा फ्लॅट रिन्युएशनच्या नावाखाली कोणा बिल्डरने घेतला तर आपली अवस्था काय असेल? अशाही अनेक समस्या त्यांच्या मनात ग्रासत असतात. पण या मदतीला, किमान दोन गोष्टी बोलायला त्यांना कुणीतरी हवे असते. दोघांचंच आयुष्य या घरात औदासिन्य निर्माण करत असते. सतत मनात शंका. दोघातले कोण आधी जाणार आणि कोण मागे राहणार? मागे राहणारा तर किती एकाकी पडेल? हे एकाकीपण, हे सोशल डिस्टन्सिंग आपल्याला झेपेल का? त्यावेळी तरी अमेरिकेतून, यूकेतून किंवा जिथं असतील तिथून मुलं येतील का? लावारीस प्रेतासारखा कोणीतरी आपल्याला अग्नी देणार नाही ना, अशी भीतीही अनेकांना जाळत असते. हे एकाकीपण, पोरकेपण, ही असुरक्षितता आज असंख्य लोकांच्या वाट्याला आलेली आहे, त्यातून त्यांची सुटका कशी करता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.
आपल्याकडे अनेक चांगल्या संस्था आहेत, संघटना आहेत, पक्ष आहेत. त्यांनी आपल्यातल्या मोठ्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांची नोंद ठेवली पाहिजे. त्यांच्या घर, बंगला, फ्लॅटचा आकार पाहता त्यांच्या घरात एखादा पाहुणा राहण्याची सोय करता येईल का, हे या संस्थांनी बघितले पाहिजे. म्हणजे बाहेरगावाहून एखादी मुलगी किंवा मुलगा नवीन शहरात आल्यावर अशा संस्थांकडे त्यांनी नोंद केली, तर या लोकांना कुठे पेइंग गेस्ट म्हणून ठेवता येईल आणि दोघांची सोयही होईल हे पाहिले पाहिजे. म्हातारा-म्हातारीला बोलण्यासाठी कोणीतरी भेटेल, त्यांच्या हाकेला येईल असे कोणीतरी असेल. थोडे अर्थार्जनही होईल आणि बाहेरून आलेल्यांची सोयही होईल. हा पेइंग गेस्ट कोण असावा आणि कुठे असावा हे त्या संस्था, पक्ष, संघटना ठरवत असल्यामुळे सुरक्षित असा पाहुणा त्यांना मिळेल आणि त्यांचे एकाकीपणही दूर होईल. यासाठी आता विविध संघटनांनी पुढे आले पाहिजे.
कोरोनामुळे निर्माण झालेले सोशल डिस्टन्सिंग समजले आहे, पण हे सोशल डिस्टन्सिंग आणि आलेले एकटेपण कोणाला दिसत नाही. जयवंत दळवींनी ४० वर्षांपूर्वी 'संध्या छाया'सारखे नाटक लिहून त्यावर प्रकाश टाकला आहे, पण त्यावर सोल्यूशन असे काहीच निघालेले नाही. आज समाजात, छोट्या-मोठ्या शहरात असलेल्या एकाकी एकटे राहणाºया ज्येष्ठ नागरिकांसाठी समाजसेवी संस्थांनी पुढे येऊ न त्यांची नोंद ठेवली पाहिजे. त्यांना नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने येणाºया लोकांसोबत जोडून देण्याचे दुवा म्हणून काम करणारे कोणतरी पुढे आले पाहिजे. असेही असलेले हे सोशल डिस्टन्सिंग कमी करण्यासाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तीनंतर राहिलेले दिवस त्यांना आनंदात जगता यावेत यासाठी कोणीतरी चांगला सोबती निवडून देणारी यंत्रणा, संस्था अधिकृतपणे निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे त्याचे उरलेले जीवन ते आनंदात जगू शकतील.