आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे
चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले.
मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास
दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस
आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा
झाला असल्याची माहिती आहे. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली. पण या
प्रकरणातून गेल्यावर्षी हैदराबादमध्ये झालेल्या एन्कौंटर प्रकरणाची आठवण
झाली. न्याय करण्याची ही नवी सिंघम पद्धत आता आखरी अदालत ठरू पाहते आहे.
एका परिने ते बरे आहे तर एका परीने ते धोकादायकही आहे.
गाडीला अपघात
झाल्याचे निमित्त साधून पोलीसांना चकमा देत पळून जाण्याच्या प्रयत्नात
असलेला दुबे पोलिसांच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाला होता. माहितीनुसार
विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. एक पोलिस देखील जखमी झाला होता.
दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी
दुबेला मृत घोषित केले. खरं तर गुरूवारीच त्याने आत्मसमर्पण केले होते. असे
असताना त्याला पळून जाण्याची दुर्बुद्धी का सुचावी? पण जित्याची खोड
मेल्याशिवाय जात नाही तसेच झाले. त्याला नेत असलेल्या गाडीला अपघात
झाल्यावर बाकीचे पोलीस जखमी झाले असताना पोलीसांना मदत करण्याचे काम त्याने
केले असते तर त्याला सहानुभूती मिळाली असती. एखाद्या हिंदी सिनेमातील तो
नायक ठरला असता. पण तसे काही घडले नाही आणि त्याला पोलीसांवर हल्ला
करण्याची इच्छा झाली त्यामुळे पोलीसांनी त्याचा निकाल लावला. खरे तर अशा
घटनांनी सामान्य माणसांना खूप आनंद होतो. कारण असे गुन्हेगार तुरुंगात
ठेवून वर्षानुवर्षे त्यांना लाडात पोसायचे म्हणजे देशावर ओझेच असते.
त्यांचा असाच खात्मा व्हायला पाहिजे. त्यामुळेच गेल्यावर्षी बलात्कार करून
जाळून मारलेल्या आरोपींचे हैद्राबाद पोलीसांनी एन्कौंटर केले तेंव्हा
देशभरात आनंद व्यक्त केला गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल घडली असे
म्हणावे लागेल.
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला
गुरूवारीच अटक करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील
उज्जैनमधून अटक केली होती. उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार
असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात
बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही
फुटेजदेखील समोर आले होते.
गँगस्टर विकास दुबे फरार झाल्यानंतर त्याच्या
साथीदारांची धरपकड केली गेली. त्याचवेळी त्याचा ’डावा हात’ समजला जाणारा
अमर दुबे याला एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं. हमीरपूर येथे चकमकीदरम्यान
पोलिसांच्या हातून अमर मारला गेला. तर फरीदाबाद येथून विकासच्या आणखी एका
साथीदाराला पकडण्यात आले आहे.
पण पोलीसांची खोडी काढल्यावर पोलीस गप्प
बसत नाहीत. परदु:खशितलम अशी पोलीसांची प्रवृत्ती असते. सामान्य माणसांच्या
बाबतीत असे काही घडले तर तितकी लवकर कारवाई होत नाही. पण विकास दुबेने
नुकतेच आठ पोलीसांनाच मारले होते. त्यामुळे पोलीस त्याचा काटा काढणार हे
निश्चितच होते. पोलीसांचे कौतुक करावे लागेलच पण असाच न्याय त्यांनी
सामान्यांना त्रास देणारांबाबतही केला तर पोलीस खरेच हिरो ठरतील. दबंग,
सिंघममधील नायक त्यांना काल्पनिक वाटणार नाहीत. पण झाले हे योग्य झाले.
वर्षानुवर्षे
न्यायालयात केस चालायची आणि अनेक वर्षांनी त्यांना थोडीफार शिक्षा
व्हायची. वीस वीस वर्ष तुरुंगात अनेक खतरनाक अतिरेकी, गुंड, गुन्हेगार
शिक्षेच्या प्रतिक्षेत आहेत पण त्यांना शिक्षा नाही की त्याची अंमलबजावणी
होताना दिसत नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडताना
दिसतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. याबाबत अनेक चित्रपटातून प्रहार सतत होत
असतो. अंधा कानून ते आखरी अदालत असे अनेक चित्रपट येउन गेले. जे गुन्हेगार
पुराव्याअभावी सुटतात किंवा राजकीय वरदहस्ताने खुले आम जगतात त्यांचा निकाल
कसा लावयचा यासाठी कार्यरत असणारी एक टीम तयार केली जाते अशा कथानकावर
काही वर्षांपूर्वी आखरी अदालत हा चित्रपट गाजला होता. अशा गुंडांना परस्पर
खतम करून टाकायचा विचार त्यात सुचवला होता. सिंघम किंवा सिंघम रिटर्न मध्ये
असेच काही प्रकार दाखवले आहेत. त्या घटना जेंव्हा प्रत्यक्षात घडतात
तेंव्हा सामान्य माणूस खूष होउन जातो.
विकास दुबेचा विचार करायचा
झाला तर तो अत्यंत खतरनाक असाच होता. त्यामुळे त्याला अशाप्रकारे संपवला
तर कोणाला दु:ख होण्याचे कारण नाही. आता सरकार विरोधकांना त्यामुळे राजकारण
करायला, सरकारच्या कार्यपद्धतीवर दोष ठेवायला संधी मिळेल हा भाग वेगळा.
एखादा निरपराधही अशा प्रकारे मारला जाईल अशी शंका निर्माण करायला हे कारण
पुरेसे असते. पण विकास दुबेने 30 वर्ष निर्माण केलेली दहशत विसरली जाते
याचे वाईट वाटते. कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40
जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून
दिसलं असतं. विचारवंतांच्या दृष्टीने उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे
धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलीस पोहोचल्याचा पत्ता लागल्यावर विकास
दुबे याच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला.
त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या
विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना
वीरमरण आले. विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी होता. दुबेच्या विरोधात
50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खून, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत.
विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री
शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा
इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती. त्यामुळे अशा खतरनाक
गुन्हेगाराला मारल्याचे फार दु:ख बाळगायचे कारण नाही. कारण विकास दुबे
मूळचा कानपूरजवळच्या बिकरु गावचा आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे
किमान 60 हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत. 2001 मध्ये तर पोलीस
स्टेशनमध्ये घुसून त्यानं भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्लांची हत्या केली
होती.
त्या प्रकरणात एकाही पोलिसाची विकास दुबेविरोधात कोर्टात साक्ष
देण्याची हिंमत झाली नाही. बसपाच्या काळात विकास दुबेचा दबदबा वाढला.
कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली. याच काळात सरकारी कंत्राटापासून ते
शाळा-कॉलेज उभी करुन त्यानं करोडोची संपत्ती उभी केली. बिकरुसह आजूबाजूच्या
गावांमध्ये विकास दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभं राहू
शकत नाही. गेल्या 15 वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नाही, शिवाय
झेडपीतही दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो. आताही विकास दुबेची पत्नी
ऋचा दुबे झेडपी सदस्य आहे. दुबेला दोन मुलं आहेत, त्यातला एक इंग्लंडमध्ये
एमबीबीएसचं शिक्षण घेतोय, तर दुसरा कानपूरमध्येच शिकतोय. हा त्याचा इतिहास
आहे. त्यामुळे राजकारण, लोकशाही आणि सामान्य माणसांचे स्वातंत्र्य हिरावून
घेणे आणि दहशत निर्माण करण्यात त्याने आपली कारकीर्द घडवली. साहजीकच
परिस्थितीचा फायदा घेउन त्याने जर पोलीसांवर हल्ला करण्याचा शुक्रवारी
फायदा घेतला असेल तर त्याचा एन्कौटर होणे स्वाभाविक आहे. आता तरी
त्याच्यावरून होणारे राजकारण थांबवले पाहिजे कारण हा सिंघमस्टाईलने झालेला
न्याय आखरी अदालतीचा आहे. त्यापासून गुन्हेगारी जगताने बोध घेतला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा