रविवार, २६ जुलै, २०२०

मंदीर अब बनायेंगे

  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर दौर्‍यावर असताना केलेले वक्तव्य अत्यंत मार्मिक आहे. म्हणजे रविवारीच सरकारने अयोध्येतील प्रस्तावित राममंदीराच्या पायाभरणीचा मूहूर्त जाहीर केला. ऑगस्ट महिन्यात 3 किंवा पाच तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. त्यावर मत व्यक्त करताना पवार म्हणाले की राममंदीर उभारून जर कोरोना जात असेल तर चांगले आहे. अर्थात हा टोला फक्त भाजपला नव्हता. तो शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांनाही होता. कारण राममंदीराचा मुद्दा शिवसेनेने मागच्या निवडणुकीत प्रतिष्ठेचा केला होता. पहले मंदीर, फीर सरकार अशी घोषणा दिली होती. रामाच्या कृपेने नाही पण पवारांच्या कृपेने ते मुख्यमंत्री बनले. पण पवारांनी मात्र आता रामाला नको मला स्मरा, तुमचे सरकार टिकवणे माझ्या हातात आहे असा संदेश त्यांच्यापर्यंत सोलापूरातून पोहोचवला आहे.
  म्हणजे एकीकडे कोरोना साथीच्या थैमानाने संकटामागून संकटे आणि त्याच्या मालिकाच सुरू असताना रविवारीच गुड न्यूज आली. ती म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीची. एकूणच संकट सरणार यांची ही चुणूक म्हणावी लागेल. तथापि, संकट संपलेले नाही याचे भानही ठेवावे लागेल. रोज येणारे कोरोनाचे आकडे थरकाप उडवत आहेत. भारतात समूह संसर्गाला सुरूवात झाल्याचे आणि रोज देशात े 35 हजार जणांना लागण होत आहे, याची माहिती येत आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतात समूह संसर्ग सुरू झाला असे म्हटले आहे. समूह संसर्ग म्हणजे प्रवास केलेला नाही, रूग्णाच्या सहवासात नाही आणि बाधा झाली. बाधा कशी झाली ते कळत नाही. त्यामुळे राममंदीराचे पायाभरणीचे भूमीपूजन आता होणार असेल तर नक्कीच देशातील कोरोनाचे संकटावर आपण मात करतो आहोत याचे हे संकेत मानावेत का? का आम्ही सगळे रामाच्या हातात सोपवत आहोत? आमचा कारभार रामभरोसे तर होणार नाही ना?
अर्थात कोरोनाबाबती जनसामान्य पुरेसे गंभीर दिसत नाहीत. पुन्हा एकदा लॉकडाउन केेलेला असला तरी आमची नित्यकर्म आम्ही थांबवली नाहीत. कोरोनाचे महासंकट घोंघावत असताना अनेकांना गटारी अमावस्या आणि दारू चिकन मटण पावसाळी सहली यात रस आहे. देवांचे सण, गणेशोत्सव आदी साजरे करू नयेत म्हटल्यावर सगळे गप्प बसले, खूष झाले पण गटारी मात्र छानपैकी साजरी केली गेली. टिव्हीवर ज्याप्रकारे दारू आणि मटणाच्या रांगेत माणसं उभी होती ते पाहता गटारी नेहमीप्रमाणेच साजरी झाली म्हणायला हरकत नाही.  गर्दी नको, सोशल डिस्टन्स पाळा, अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर नको, स्वच्छता पाळा, मास्क वापरा असे ओरडून ओरडून सांगितले तरी लोक गावभर हिंडत होते. दारू-मटणाच्या दुकानांसमोर रांगा लावत होते. जागोजागी गर्दी करत होते. त्यामुळे कोरोनाने आमच्या आवडीच्या गोष्टींवर आक्रमण केले नाही. विविध सणांवर केले, गणेशोत्सव मर्यादीत करण्यास लावला, आमची वारी थांबवली पण गटारी मात्र थांबवली नाही. पण येणारा ऑगस्ट महिना आमच्यासाठी महत्वाचा आहे. एकतर कोरोनावरची लस तयार होण्यासाठी सरकारने  15 ऑगस्टचा मुहूर्त काढला आहे. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून त्याची घोषणा करतील कदाचित. तसेच त्यापूर्वी दहा दिवस अगोदर राम मंदीराची पायाभरणी करण्याचा मूहूर्त साधतील असे दिसते. आता  5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन करण्याचे निश्चित करण्यात आले. 161 फूट उंचीचे हे दोन मजली भव्य मंदिर तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण होणार आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा वर्षानुवर्षे जो कार्यक्रम होता, त्यामध्ये 370 कलम रद्द, राम मंदिर, समान नागरी कायदा वगैरे प्रमुख बाबी होत्या. मोदींनी या कार्यक्रमावर भर दिल्याचे दिसते आहे. कोरोना संकटामुळे अवघे विश्व आणि भारतही अडचणीत आहे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे मंदीर तयार होईल अशी आशा आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच भाजपला होणार यात शंकाच नाही. साहजिकच भाजप विरोधक त्यावर टीका करणार यात शंका नाही. सोलापुरातून शरद पवारांनी त्याच चिंतेपोटी वक्तव्य केले असले तर हे वक्तव्य मात्र सेनेलाही टोला देणारे होते हे नक्की.
पण मोदी 2 च्या कालावधीत सव्वा वर्षात त्यांनी अनेक महत्वाचे आणि वादग्रस्त विषय मार्गी लावण्याचा चंग बांधला आहे हे नक्की. 370 कलम, तिहेरी तलाक, राम मंदीर हे मुद्दे विचारात घेउन भाजपच्या कारकीर्दीतील महत्वाच्या नोंदी इतिहासात करण्याचे काम केले जात आहे. अर्थात मोदी सरकारचे एकाचवेळी सगळ्या स्तरावर काम चालू आहे. एकीकडे शेजारी शत्रू आहेत, दुसरीकडे कोरोनाचे संकट आहे, अंतर्गत विरोधक आहेत आणि हे सगळे सांभाळून आता राम मंदीराच्या भूमीपूजनाचे काम ते करत आहेत. हे निश्चितच कौतुकाचे काम आहे. म्हणजे भारताचे शेजारचे शत्रू पाकिस्तान व चीन हे कायम त्रास व कुरबुरी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्यातही मोदींनी बऱयापैकी यश मिळवले आहे.  स्वदेशीचा नारा देत चीनच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अनेक अडचणी व आर्थिक प्रश्न आहेत. पण संकटातही संधी शोधण्याची जिद्द आणि धडपड आहे. अशावेळी राम मंदिराची पायाभरणी आणि रामलल्लाचे भव्य दिव्य मनोहरी देवालय सार्वमताने सगळे वाद संपवून लोकदेणगीतून उभा राहते आहे, ही आनंदाची बाब आहे. या रामाच्या कृपेने शिवसेना नेते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येत पायाभरणीसाठी जातात का? ते पुन्हा मोदींबरोबर येतात का अशा चर्चा या निमित्ताने सुरू होतीलही. वाहिन्यांना असे खमंग विषय लागत असतात. पण यासगळ्यात रामाची कुठेही अवहेलना होणार नाही याची दक्षता घेत मोदी सरकार पावले टाकत आहे. हा आत्मविश्वास कोरोना संपवायला पुरेसा आहे असे वाटते.
    प्रभू राम हा भारतीयांचा आदर्श आहे. प्रभूरामाचे हे मंदिर विश्वभरच्या भारतीयांना आणि अवघ्या मानवजातीला प्रेरणा देईल हे वेगळे सांगायला नको. सुमारे 10 कोटी लोकांच्या देणगीतून हे मंदिर उभारले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाभरणी करणार आहेत. या मंदिराच्या निर्माणामागे अनेक आंदोलने, न्यायालयीन निवाडे असा इतिहास आहे. आणि अलीकडेच झालेली सर्वमताची एकता हा त्यावर कळस आहे. त्यामुळे राम मंदिराचा कळसाचा उंच उंच ध्वज अनेक अर्थानी प्रेरणादायी ठरणार आहे.  कोरोनाच्या काळयाकुट्ट अंधारात प्रकाश देणाऱया दिव्याप्रमाणे ही आनंदाची आणि आशादायक बातमीच म्हणावी लागेल. राम मंदीराच्या भूमीपूजनाचे दिवशी देशातील कोरोना संपुष्टात येत आहे, नियंत्रणात येत आहे, आता अनलॉक होत आहोत, सगळे उद्योग व्यवसाय पूर्वीसारखे सुरू करावेत असे आदेश त्यांनी दिले तर त्या राम मंदीराचा आनंद अधिक उठून दिसेल हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: