मंगळवार, २८ जुलै, २०२०

भिक नको पण कुत्रं आवर


 आज कोरोना या रोगाची अवस्था अती झालं अन हसू आलं अशी झालेली आहे. म्हणजे रोगापेक्षा इलाजच भारी अशी अवस्था झालेली आहे. पण त्यासाठी जे उपाय योजले गेले आहेत ते इतके भयानक आहेत की बोलायची सोय नाही. त्याहीपेक्षा या रोगाच्या उपचारासाठी लागलेली महागडी औषधे आणि ठिकाणे पाहता हे बिल आम्हा सामान्य माणसांना परवडणारेच नाही. त्यामुळे भिक नके पण कुत्रं आवर याप्रमाणे कोरोना परवडला पण उपचार आवर म्हणायची वेळ अनेकांवर आलेली आहे.    कोरोनाच्या साथीनंतर मागच्या आठवड्यात देशात आणि राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आजवरचे सर्व रेकॉर्ड या आकडेवारीने मोडीत निघाले आहेत. गेल्या चार पाच दिवसात आता सरासरी रोज 50 हजार रूग्णांची नोंद होत आहे. म्हणजे दहा वर्षांपूर्वी जशी आधारकार्ड काढायला सुरूवात झाली आणि हळूहळू देशातील प्रत्येकाला आधारकार्ड काढावे लागले. दररोज इतकी आधारकार्ड नोंदवली असा आकडा येत होता तसा आता दररोज इतके रूग्णांची नोद झाली असे म्हणत हा रोग प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी होणारच आहे असेच वातावरण तयार केले गेले आहे.एकुण रूग्णांचा आकडा 15 लाखांच्या दिशेने जात असल्याचे बोलले जाते आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून धडकी भरवणारा आलेख समोर आला आहे. फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगाला वेठीस धरले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नावाखाली राजकारणालाही वेठीस धरले आहे. म्हणजे श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणातले कोणतेही सण साजरे केले जात नाहीत. गणेशोत्सव साजरा केला जाणार नसल्याचे  अगोदरच जाहीर केले गेले आहे. पण बकरी ईद मात्र साजरी केली जाणार आहे. त्यावर कसलीही बंदी नाही. म्हणजे गणेशोत्सव हा सृजनशिलतेचा निर्मितीचा उत्सव. कला गुणांना प्रोत्साहन देणारा उत्सव. तो साजरा करायचा नाही. पण निष्पाप प्राण्यांची हत्या करण्याचा बकरी ईद मात्र साजरा करायचा. म्हणजे आत्ता शाकाहाराचे दिवस असताना मुद्दाम मांसाहाराचा प्रसार करण्याचे राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गणेशोत्सव थोडक्यात साजरा करा, पाच व्यक्तींपेक्षा जास्त नको असे आवाहन करत आहेत. त्यासाठी शासकीय नियमावली जाहीर करत आहेत. पण त्याचवेळी त्यांच्याच सरकारमधले सहयोगी पक्ष असलेल्या नबाब मलिकांची वक्तव्ये बकरी ईद साजरी केली पाहिजे, कुर्बानी दिली पाहिजे म्हणून ज्याप्रकारे येत आहेत त्यावरून राजकारणी किती या परिस्थितीचा गैरफायदा उठवत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.    पण खरं तर यंदा बकरी ईद साजरी करायची गरजच नाही. कोरोनाच्या नावाखाली माणसांनाचा बळीचे बकरे बनवले जात आहे. डॉक्टर आणि हॉस्पिटल्स रूग्णांना कापत आहेत. त्यामुळे बकरी ईद हाच सण सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जोरात साजरा होत आहे. औषधांनी, त्याच्या बिलांनी माणसं इतकी घाईला येत आहेत की बिल नको, त्यापेक्षा पेशंट मेलेला परवडला.  भिक नको पण कुत्रं आवर असच म्हणायची पुन्हा पुन्हा वेळ येत आहे.    म्हणजे आधी लॉकडाउनमुळे माणसं घरात बसली. आता लॉकडाउनच्या काळात कामधंदा, नोकरी गेल्याने घरात बसण्याची पाळी आली. या काळात घरात कोणाला लागण झाली म्हणून बसली. त्यामुळे काल मंगळागौरीला एका बाईने मस्तपैकी उखाणाही तसाच घेतला.“हंड्यावर हंडा, हंड्यावर हंडात्यावर ठेवली परात.....कोरोनाच्या नावाखाली  देशातलेसगळै पुरूष बसले घरात....“    महिलांना आपली सुखदु:खं भावना प्रकट करायला आपल्या या लोकसंस्कृतीतील उखाणे, भोंडलागीते, मंगळागौरींचे खेळ हे साधन असायचे. त्यातून हास्यरसासह चुकीच्या गोष्टींविरोधात, शोषणाविरोधात फटकारे मारले जात असत.  नणदा भावजयांची भांडणे, सासु सुनेचे वाद, नवरा बायकोची भांडणे या सगळ्याचा यातून उहापोह होत असे. पण  या कोरोनामुळे सगळ्या सृजनशिलतेचा बळी दिला आहे. कारण कोरोना नावाची बकरी ईद साजरी होत आहे. म्हणजे फक्त लुटालुटीचे आणि शोषणाचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे आलेली बिले कशी आणि कोणी भरायची ही चिंता आहे. साहजीकच कोरोनाने जगायचे आणि बिलाचा आकडा पाहून मरायची ही वेळ आज सामान्यांवर आलेली आहेत. त्यामुळे भिक नको पण कुत्रं आवर याप्रमाणे कोरोनाचे मरण परवडले पण बिल आवर म्हणायची वेळ आलेली आहे.कारण कोणाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, की रुग्णाची खरी परीक्षाच सुरू होते. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला कोविड सेंटरमध्ये नेण्यात येते. ही सेंटर्स वरून चांगली वाटतात. परंतु, प्रत्यक्षात अनुभूती वेगळीच येते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मार्गदर्शक तत्वांनुसार काही मुलभूत सुविधा आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण, या ठिकाणी त्याचाच अभाव असतो. रुग्णांकडून वारंवार तक्रारी करण्यात येतात. तरीही अनेकदा प्रशासनाकडून हवी तशी गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे औषधोपचारांचे नावाखाली हे एखादे फार मोटे रॅकेट आहे काय? रूग्णांना लुटायचे आणि स्वत:चे खिसे भरण्याचे कारस्थान आहे काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. आहे ना हे आंतरराष्ट्रीय संकट? मग फुकट उपचार करा. पैसे कसले घेतात. आज लोक कोरोनापेक्षा त्याच्या औषधोपचाराच्या खर्चाला घाबरत आहेत. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते म्हणत आहेत, कोरोना आम्ही तुला घाबरत नाही. कारण डॉक्टरांनी आपला बळीचा बकरा बनवला आणि ईद साजरी करायची ठरवले तर करणार काय? भिक नको पण कुत्रं आवर म्हणायची वेळ आहे. उपचार नको पण बिल आवर आता म्हणायचीच वेळ येणार ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: