मंगळवार, २८ जुलै, २०२०

एक पोरकट शंका..

   आपण सामान्य असतो. प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आपल्याला असणे शक्यच नसते. ज्ञान ज्यांच्याकडे असते त्यांना तज्ज्ञ म्हणतात, तसे काही आपण नाही. त्यामुळे मनात अनेक बावळट, पोरकट शंका घर करून रहात असतात. त्यापैकीच एक साधी शंका गेल्या काही दिवसांपासून मनात घोळतीय. ती म्हणजे, कोरोनावर जगात कुठेच औषध सापडलेले नाही तर माणसं बरी कशाने होत आहेत?  बरे होणारांचे प्रमाण आपल्या देशात खूपच जास्त आहे. औषध नसताना जर माणसे बरी होत आहेत, तर हे औंडंबर माजवण्याची गरज काय आहे? इतका लॉकडाउन करण्याची आणि देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याची खरंच गरज होती का?तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. जगातील कुठल्याच देशाला आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे. पण या रोगातून मुक्त होणारांची संख्या मात्र वाढत आहे. जे बरे होउन आले त्यांचे स्वागत छान केले जात आहे. डॉक्टरांपासून शेजारी पाजारी त्यांचे ओवाळून स्वागत करत आहेत. काही रूग्ण झिंगाट डान्स साजरा करून आनंद व्यक्त करत आहेत. हे सगळेच अनाकलनीय आहे. म्हणजे माझ्या पोरकट, बावळट मनाला हे काहीच पटेनासे झाले आहे. कारण औषध नसताना इतकी माणसं बरी होत आहेत तर चिंता कसली करायची? का करायची? म्हणजे रविवार सकाळ पर्यंतची फक्त भारताची आकडेवारी पाहिली तर, एकूण नोंदीकृत रूग्णांची संख्या 13 लाख 85 हजार 522 आहे. हा लेख वाचेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत हा आकडा 14 लाख पार करेलही. पण यातील बर्‍या झालेल्या रूग्णांचा आकडाही लक्षणीय आहे. रविवारी सकाळपर्यंत बर्‍या झालेल्या रूग्णांचा आकडा हा 8 लाख 85 हजार 576 इतका आहे.  म्हणजे एकूण रूग्णांपैकी 64 टक्के लोक आत्तापर्यंत बरे झालेले आहेत. उर्वरीत 4 लाख 67 हजार 882 जे रूग्ण आहेत ते उपचार घेत आहेत. त्यापैकीही बरेच जण लवकर बरे होणारे आहेत. त्यामुळे इतकी चिंताजनक परिस्तिती दिसत नाही. पण आत्तापर्यंत जे 64 टक्के  लोक बरे झालेले आहेत ते औषधाविनाच बरे झाले ना? लस नाही, कोरोनावर औषध नाही म्हणून जगभर चिंता व्यक्त केली जात असताना हे लोक कसे बरे झाले? हे लोक आपोआप बरे झाले का? त्यांच्यावर जी उपचार पद्धती आहे ती अचूकच असणार आहे. किंवा दुसरी पोरकट शंका मनात आहे. तीच फार धक्कादायक असू शकते. ती शंका म्हणजे जे कोणी 64 टक्के म्हणजे जवळपास साडे आठ लाखांहून अधिक लोक बरे झाले त्यांना कोरोना झालाच नव्हता का? कोरोना आहे असे सांगून त्यांच्यावर उपचाराच्या नावाखाली लुटले नाही ना? म्हणजे जे काही तीस बत्तीस हजार लोक मृत झाले तेवढ्यांनाच फक्त कोरोना झाला असेल आणि या उर्वरीत लोकांना कोरोना झालेला नसतानाच त्यांच्यावर कोरोना आहे असे सांगून उपचार केले गेले नाहीत ना? म्हणजे मेडिकल सायन्समधील किंवा औषध उद्योगातील हा फार मोठा घोटाळा तर नाही ना? इथं शंकेला वाव आहे की नाही? आपण कोणीच याला आव्हान देउ शकत नाही. कारण आपण तज्ज्ञ नसतो. फक्त बावळटासारख्या शंका व्यक्त करत बसायचे. पण हे किती काळ चालणार?   खरं तर आपण या देशात फक्त कोरोनाच्या चाचण्या करत आहोत. पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट, तिसरी टेस्ट. मग फक्त वाट बघत बसायचे पॉजीटीव्ह की निगेटीव्ह. पण त्या टेस्टमध्ये कोरोनाचा व्हायरस खरंच आहे का? याला काहीच समजायला मार्ग नाही. मग आपण काय जे काही पैसे कमावतो ते घरच्याची टेस्ट करून खर्च करण्यासाठी, डॉक्टरांचे पोट भरण्यासाठी कमावतो का? कारण हा जर घातक रोग आहे तर सरकारने त्याचे औषधोपचार फुकट केले असते. देवीची लस पूर्वी आपण टोचून घेतली. दंडावर अनेकांच्या त्याच्या खुणा असतील. त्याला कोणी पैसे दिल्याचे कोणाला आठवते का? पल्स पोलीओचे डोस गेली तीन दशके दिले जात आहेत. त्यासाठी आपण कधी पैसे दिलेले नाहीत. कारण हे रोग या देशातून आपल्याला नाहीसे करायचे आहेत म्हणून सरकार त्याचे पैसे खर्च करत आहे. मग कोरोनाच्या टेस्ट फुकट का केल्या जात नाहीत? कोरोनाचे उपचार फुकट का केले जात नाहीत? हा रोग या देशातून घालवायचा आहे ना? का वैद्यक क्षेत्रातील, औषध उत्पादन क्षेत्रातील, मेडिकल, केमीस्ट व्यवसायातील लोकांचे हित पाहण्यासाठी हा रोग आपल्याला वाढवायचा आहे का? हा अतिशय भयानक रोग आहे आणि संपूर्ण जगाला उद्धवस्त करू शकतो अशी भिती घालून गेल्या चार महिन्यात आपल्याला घरात बसवले. प्रत्येकाचे वैयक्तिक नुकसान झालेच पण देशाची अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. असे असताना जनतेवर औषधोपचारांचा बोजा टाकणे चुकीचे आहे. ही सगळी औषधोपचाराची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पाहून अत्यंत नियोजनबद्ध रितीने त्याला त्या त्या रूग्णालयात दाखल केले जात आहे. कोणाला फाईव स्टार तर कोणाला साध्या हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट केले जात आहे. इथून औषधोपचार करून म्हणजे या रोगाची लस किंवा औषध सापडलेले नसताना लोक बरे होत आहेत. ही गोष्ट समाधानाचीच म्हणावी लागेल.काळजी म्हणून आपण मास्क घालत आहोत. पण या मास्कमुळेच माणसांना जास्त गुदमरते आहे. श्वासाद्वारे जेवढा ऑक्सीजन आपल्याला मिळायला हवा. पण मास्कमुळे शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊ लागते.शरीराला नको असलेला कार्बन डाय ऑक्साईड आणि शरीरातून बाहेर पडणारी दूषित हवा आपण पुन्हा पुन्हा मास्कमुळे परत शरीरात जात आहे. त्यामुळे मास्क लावून आजारी पाडण्याचे काही नवे तंत्र विकसीत केले गेलेले नाही ना अशीही एक पोरकट शंका मनात येते. म्हणजे आपण लहानपणापासून शिकत आलो की मोकळा श्वास घ्या. मोकळ्या हवेत फिरायला जा. पण आता कोंडमारा करा, गुदमरून जा असे सांगून हा रोग वाढवला जात आहे का अशीही शंका मनात येते.पण सगळ्यात  महत्वाची पोरकट शंका मनाला छळते आहे ती म्हणजे, आपल्याकडे कसलीही औषधोपचाराची यंत्रणा नसताना, कोरानावर औषध, लस सापडलेले नसताना हे साडेआठ लाख लोक बरे कसे झाले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: