बुधवार, १५ जुलै, २०२०
पवारांचा इशारा शिवसेनेलाच
एक शरद बाकी गारद या मुलाखतीचा तिसरा भाग सोमवारी प्रसारीत झाला आणि नक्की कोण गारद झाले असा प्रश्न यातून निर्माण होतो. म्हणजे पहिल्या भागात शिवसेनेला, दुसर्या भागात काँग्रेसला गारद केले तर तिसर्या भागात जे वास्तव पवारांनी पुढे आणले त्यावरून शिवसेनेलाच आता आंतर्मुख होउन विचार करावा लागणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासासाठी सेना भाजपत फूट आपणच पाडली असे कबूल करणारे पवार सेनेचा आदेश किती काळ मानणार? असा संदेश वजा इशारा देतानाच दिसतात.
शरद पवारांनी या मुखाखतीत सांगितले की,
महाराष्ट्रामध्ये 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बाहेरुन पाठिंबा का दिला होता. यासंदर्भातील खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. अर्थात याबाबतचा प्रश्न विचारून तसे खासदार संजय राउत हे तोंडघशीच पडले आहेत. कारण शरद पवारांच्या तोंडून एक कटूसत्य बाहेर पडले आहे. त्याची जाणिव जर शिवसेनेला आणि सच्चा शिवसैनिकांना झाली तर ते बिथरल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये राज्यामध्ये भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत होते असं म्हटलं होतं. यावरुनच विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 2014 साली राष्ट्रवादीने सरकारला बाहेरुन पाठिंबा का दिला होता या गोष्टीवरील पडदा उठवला. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीतच पवारांनी 2014 मधील पाठिंब्यांमागील रहस्य सांगितलं.
राउत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी दोन गंभीर आरोप तुमच्यावर केले. त्यांच्या सांगण्यानुसार हे गौप्यस्फोट आहेत. त्यातील पहिला आरोप त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केला की 2014 साली तुम्हाला भाजपाबरोबर सरकार बनवायचं होतं. तुम्ही आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करत होते असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं, असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला. यावेळेस पवारांनी त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असण्या इतका अधिकार नव्हता असं मत व्यक्त करताना 2014 ला भाजपा देण्यात आलेला पाठिंबा ही केवळ राजकीय चाल होती असं म्हटलं आहे.
फडणवीस यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना पवारांनी, ते (फडणवीस) म्हणतात त्याप्रमाणे त्या काळामध्ये मी सेना आणि भाजपाचं सरकार बनू नये असं एक वक्तव्य मी जाणूनबुजून केलं. माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की सेनेने भाजपासोबत जाऊ नये. पण ते जातील असं ज्यावेळी दिसलं त्यावेळी मी जाणीवपूर्व वक्तव्य केलं की आम्ही तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देतो. हेतू हा होता की सेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. ते घडलं नाही त्यांनी सरकार चालवलं त्यात वाद नाही. मात्र आमचा हा सतत प्रयत्न होता की भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही, असं सांगितलं.
हे उत्तर बरेच काही सांगून जाते. महाराष्ट्रात स्वत:चे महत्व वाढवायचे असेल तर भाजपला संपवले पाहिजे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात फूट पडली पाहिजे. ही फूट पडली तरच आपण सत्तेवर येउ यासाठी शरद पवारांनी गेल्या पाच वर्षात प्रयत्न केले. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांचा वापर केला आहे. कधी राज ठाकरेंचा वापर केला तर आता संजय राउत यांचा वापर करून सेना आणि भाजपमध्ये फूट पाडण्याचे काम शरद पवारानी केले हे स्पष्ट झाले आहे. सेनेच्या हातात पाच वर्षांसाठी म्हणून सत्ता द्यायची, त्यांचा मुख्यमंत्री करायचा आणि राज्य आपले चालवायचे. त्याचा फायदा करून घेउन नंतर सेनेला बाजूला करायचे हे शरद पवारांचे थेट राजकारण आहे. भाजपने सत्ता स्थापन केली नाही पाहिजे ही जशी पवारांची इच्छा आहे तसेच शिवसेनेच्या हाताखाली काम करायचे नाही हे देखिल आहे. पण एकेकाला संपवून मग आपले पाय पसरायचे ही नीती यामध्ये आहे. शिवसेनेला जवळ करून मित्र बनवून भाजपला संपवायचे आणि मग शिवसेनेला लांब करायचे हे पवारांचे स्पष्ट धोरण असल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट झालेले आहे.
शरद पवारांनी या मुलाखतीत अनेक गुगली टाकले आहेत. ते शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना तरी कळतीलच. किंबहुना शिवसेना स्थापनेत ज्यांचा पुढाकार होता अशा ज्येष्ठ शिवसैनिक, ठाणेकर, मुंबईकरांना तर याची नक्कीच खंत वाटल्याशिवाय राहणार नाही.
या मुलाखतीत पवार म्हणतात, दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्यातील सत्ता म्हणजेच मुख्यमंत्री त्यांच्या हातात यामुळं सेना किंवा अन्य पक्षाला लोकशाहीमध्ये काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते आज ना उद्या निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आम्ही 2014 साली भाजपला न मागताच पाठिंबा दिला. ती एक राजकीय चाल होती, असं पवार पुढे बोलताना म्हणाले. फडणवीस यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत पवारांनी, फडणवीस सांगतात हे मला अजिबात मान्य नाही. पण आम्ही भाजपा आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढावं यासाठी मी जाणीवपूर्व पावलं टाकली हे कबूल करतो, असंही म्हटलं.
याप्रश्नाच्या अगोदरच संजय राउत यांनी विचारले होते की काँग्रेसची संवाद नसल्याची तक्रार आहे. त्यावर स्पष्टपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदेश देतात. ती त्यांची शिवसेनेची प्रथा आहे. शिवसेनेत आदेश दिल्यावर पुढे कोणी बोलत नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तसे नाही. इथे एकमेकांचे विचार समजून घेतले जातात, म्हणणे ऐकून घेतले जाते, पण शिवसेनेत तसे नाही. त्यांची ती प्रथा आहे, माझी त्याबाबत तक्रार नाही, पण आघाडीचे सरकार असताना डायलॉग असला पाहिजे, संवाद असला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. याचा अर्थ या सरकारमध्ये परस्परांचा संवाद नाही. पोलीस अधिकारी बदल्या रद्द करण्याचा आदेश कसा झोंबला आहे हे यातून स्पष्ट झालेले आहे. साहजिकच पाच वर्ष हे सरकार चालेल असे एकीकडे म्हणत असतानाच संवाद नाही, आदेश देतात, लोकशाही नाही असे म्हणून आपल्या सोयीचे वातावरण तयार झाल्यावर शरद पवार सेनेला लांब करणार याचेच हे संकेत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा