रविवार, २६ जुलै, २०२०

उद्रेक होणारच....

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यावर त्याचा उद्रेक होतोच. त्याचे दुष्परिणाम समोर येतात. त्यामुळेच आपल्याकडे अती तिथं माती अशी म्हण आहे. आता या कोरोनाच्या लॉकडाउन, बंद, जनता कर्फ्यू याचा इतका अतिरेक झाला आहे की त्यामुळे जनतेतून उठाव होउन सरकार विरोधात जनता तुटून पडेल की काय अशी भिती वाटते. सरकारने जबाबदारी झटकून प्रशासनाच्या हातात सूत्र दिली आणि प्रशासनाने निमित्ताला टेकल्याप्रमाणे बंद करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सामान्य माणसांनी जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्रेक हा होणारच. त्याची सुरूवात नालासोपार्‍यातून झाली आहे. हळूहळू हा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी तरी शासन प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे.
   करोनामुळे गेली चार महिने घरातच थांबावं लागलेल्या प्रवाशांचा बुधवारी पार संयम सुटला. साहजिकच आहे. त्याचे समर्थनच करावे लागेल. कारण काम नसल्याने उपासमारीने मरण्यापेक्षा बाहेर पडून कोरोनाशी लढताना मरू असा विचार कोणी केला तर तो चुकीचा नाही. बिल्कूलच चुकीचा नाही. कारण प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे की किती दिवस तोंड लपवून, घाबरुन बसायचे? आमच्या पोटापाण्याचे काय? सरकारल, प्रशासनाला जर आम्ही घरात बसावे असे वाटते तर सर्वांच्या पोटापाण्याची व्यवस्था सरकारने करावी. घरपोहोच धान्य, पैसा अडका आणि सर्व गरजेच्या वस्तू सरकारने पोहोचवाव्यात. यातले काहीच होत नाहीये मग सरकारचे, प्रशासनाचे आम्ही का ऐकावे? असा विचार कोणी केला असेल तर तो बिल्कूल चुकीचा नाही.
आज मूठभर लोकांव्यतिरीक्त सर्वांना घरात बसायला सांगितले आहे. रेल्वे, बस कसल्याही प्रवासाच्या सुविधा सामान्यांना नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या अशी मागणी सामान्यांची आहे. पण शासन प्रशासन म्हणते आहे घरातच बसा. अरे, पण घरात बसून पोटाला चिमटा घेउन किती दिवस बसणार आम्ही? आम्हाला आमचे पूर्वीचे जीवन जगायचे आहे. नाही आम्हाला कोणी आता रोखू शकणार, असा जर सूर उमटला तर त्यात चुकीचे काय?
 बुधवारी एसटीची सेवा कमी पडतेय असं सांगत शेकडो संतप्त प्रवाशांच्या संतापाचा भडका नालासोपार्‍यात उडाला. या प्रवाशांनी आधी नालासोपारा एसटी स्टँडमध्ये जोरदार आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे रुळावर घुसून ठिय्या आंदोलन करत रेल्वे रोको केला. अचानक झालेल्या या गोंधळामुळे रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला घटनास्थळी पोलिसांची ज्यादा कुमक मागावावी लागली. नालासोपारा एसटी स्टँडमधून कामावर जाणार्‍यांसाठी रोज 100 ते 150 एसटी सोडल्या जात आहेत. बुधवारी सकाळी  बराचवेळ थांबूनही एसटी स्थानकातून एसटी सोडण्यात आली नाही. चौकशी केली असता एसटी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यामुळे कामावर जाणार्‍या प्रवाशांचा संयम सुटला आणि या संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनता एक एक करत शेकडो प्रवासी सहभागी झाले आणि एसटी स्थानकात एकच गोंधळ उडाला. आंदोलक प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला असला तरी अचानक शेकडो प्रवाशी एकत्र येऊन घोषणाबाजी करू लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वे स्थानकाच्या दिशेने कूच केली. रेल्वे स्थानकाबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून संतप्त प्रवाशांचा लोंढा अचानक रेल्वे स्थानकात घुसल्याने ड्युटीवरील पोलिसांचीही तारांबळ उडाली. हे अत्यंत स्वाभाविक आहे. खरं तर हे उशिराच झाले आहे. कारण किती दिवस तुम्ही सामान्य माणसांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणार आहात? कोरोनामुळे कुणी आजारी पडले, कोरोनाची बाधा झाली तर सरकार मोफत उपचार करत नाहीये. हजारो लाखो रूपयांची बिले वसूल केली जात आहेत. सामान्यांना लुटले जात आहे. मग आम्हालाच बिले भरायची आहेत तर भरू आम्ही पण त्यासाठी आम्हाला कमवायला बाहेर पडले पाहिजे. सरकार किंवा प्रशासन जर आम्हाला सगळं घरात बसून देणार असेल, उपचार मोफत करणार असेल तर कोणाला बाहेर पडायची हौस आलेली आहे? सरकार सामान्यांना कसली मदत करणार नाही, सोयी सुविधा देणार नाही, आर्थिक मदत नाही, स्वस्तात काही मिळणार नाही. उलट लूट करणारेच जास्त आहेत. तर जनतेचा उद्रेक हा होणारच. आता जर हा लॉकडाउन बंद करून 1 ऑगस्टपासून सर्व पूर्ववत सुरू झाले नाही तर हा उद्रेक राज्यात सर्वत्र होईल. महाराष्ट्र पेटून उठेल. कारण पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला असताना जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. नालासोपारा ही एक झलक होती. तो जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पण जर आता जास्ती लॉकडाउन झाला, कामधंदे सुरू झाले नाहीत, लोकांना रोजगार मिळाला नाही तर राज्यात अराजक माजेल. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागेल. चोर्‍या मार्‍या, दरोडे, डाके पडतील, माणसं एकमेकांना मारायला खायला उठतील इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सरकारने आता सगळे उद्योग कामधंदे सुरू कसे होतील हे बघितले पाहिजे.
 बुधवारी सकाळी नालासोपार्‍यात प्रवाशांनी घोषणाबाजी देतच रेल्वे स्थानकात प्रवेश करत रेल्वे रुळावर उतरून ठिय्या आंदोलन केलं. आम्हीही कामावर जातो. आम्हालाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रमाणे रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत या संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको केला. शेकडो प्रवासी रेल्वे रुळावर उतरल्याने रेल्वेचा खोळंबा झालाच पण रेल्वे प्रशासनाला या प्रवाशांना हटविण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली. पण लोक म्हणतील आम्हाला एकदाचे मारून टाका. तुमच्या सरकारी दंडुक्याने मारून टाका, लाठीमार करा, गोळीबार करा पण असे तडफडत कामधंद्याशिवाय उपाशी मारण्यापेक्षा लाठीमार करून, गोळीबार करून मारून टाका, नाहीतर सगळा कारभार सुरू करा. आता आम्ही कोरोनाला घाबरत नाही, आमची काळजी घेण्यास आम्ही  खंबीर आहोत, सरकारने आमची काळजी करू नये असाच जनतेचा हा इशारा आहे. सरकारला आम्ही घरातून बाहेर पडू नये असे वाटत असेल तर सरकारने आम्हाला पोटापाण्याची सोय करावी आणि शहाणपण शिकवावे. घरात बसून सरकार आणि मंत्र्यांनी भरल्यापोटी सल्ले देणे सोपे आहे पण उपाशी जनतेचे काय हा एकच सवाल या सरकारला कामाला लावील हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: