शनिवार, ११ जुलै, २०२०

राहुल गांधींची अपरिपक्वता


काँग्रेसची अवस्था आज भरकटलेली अशी झालेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वैफल्याने ग्रासले आहे. कोणत्याही पातळीवर यश येत नसल्याने आणि पक्षाला साधा अध्यक्षही मिळत नसल्याने किंबहुना तो गांधी कुटुंबियांशिवाय असावा असे कोणा काँग्रेसजनांना वाटत नसल्याने पक्षात मरगळ आलेली आहे. ही मरगळ इतकी आहे की ती झटकता येईल अशीही परिस्थिती नाही. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीला मोदी किंवा मोदी सरकार किंवा भाजज हेच जबाबदार आहेत असे म्हणून दिवस काढण्याचे प्रयत्न काँग्रेस करत आहे. आज संकटग्रस्त परिस्थितीत म्हणजे कोरोना आणि चीन या दोन्ही परिस्थितीत काँग्रेसला जनतेचा विश्वास संपादन करण्याची संधी होती. पण राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकारणाने आणि त्यांना समजावून सांगेल असे कोणीही काँग्रेसमध्ये नसल्याने विनाशकाले विपरीत बुद्धी अशी काँग्रेसची अवस्था झालेली दिसते.
    म्हणजे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्वीटरवरून पंतप्रधानांना प्रश्न विचारायची ही वेळ आहे का? तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात. हे प्रश्न तेंव्हा विचारता येतील याचे भान राहुल गांधींना नाही का समजत नाही? नेमके काय आहे? ट्विटरवर निरर्थक बरळणे आणि विचित्र प्रश्न विचारणे म्हणजे लोकांच्या मनात संशयाचे बी पेरणे आहे. जे कुणी असे करीत आहेत, ते देशाच्या दीर्घकालीन हितांना बाधा आणत आहेत आणि आपल्या संकुचित राजकीय तसेच क्षुद्र स्वार्थांसाठी असे करीत आहेत.
   युद्धाच्या परिस्थितीत सैनिक आणि जनतेच्या दरम्यान शंकेचा कीडा उत्पन्न करण्यात आला, तर मोठ्यातली मोठी सेना पराभूत होऊ शकते. नेमके तेच काम राहुल गांधी करत आहेत. सत्तेसाठी तुम्ही देशाचा बळी कसा काय देउ शकता? देशाशी गद्दारी करण्याचे हे काम काँग्रेसकडून का होत आहे? म्हणजे एकीकडे सोनिया गांधी आम्ही सरकारच्या, भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत असे म्हणतात आणि त्याचवेळी त्यांचे तोंड बंद करण्याचे काम राहुल गांधी करतात. सेनेवर, सरकारवर अविश्वास दाखवतात? राहुल गांधी आणि एआयएमआयएमचे ओवेसी यांची भाषा एक कशी काय असते?
   भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार काँग्रेसकडून वारंवार होतो. सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल या प्रत्येकवेळी सैन्याच्या पराक्रमाचा अपमान राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेला आहे. आजही तेच करत आहेत. हा एकप्रकारचा देशद्रोहच म्हणावा लागेल. आपल्या नाकर्तेपणामुळे जनता आपल्याला सत्तेपासून दूर ठेवत आहे हे समजून न घेता लष्करावर राजकारण करणे यासारखा काँग्रेसचा मूर्खपणा कोणताच नसेल. संसदेत चर्चा करायच्यावेळी कुठे तरी मलेशिया नाहीतर अन्य देशात फिरत राहायचे, गुप्त व्हायचे आणि ट्विटरवरून शौर्य गाजवायला जायचे या राहुल गांधींच्या नीतीला कधीही भारतीय जनता स्विकारणार नाही.
  आज कोरोनाच्या संकटग्रस्त परिस्तितीत सगळे पक्ष रस्त्यावर उतरून सामाजीक कार्य करत आहेत. एकजुटीने लढण्याचा विचार करत आहेत. त्या कार्यात काँग्रेसचे योगदान काय? सरकारवर टीका करणे एवढेच फक्त. हीच राहुल गांधींची पालखी राज्यातील पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सचिन सावंत असे नेते उचलतात तेंव्हा ते जनतेच्या मनातून उतरत जातात. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याने खरं  ज्यांना केंद्रीय राजकारणाचा अनुभव आणि दिल्लीत गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांनी खरं तर राहुल गांधींना समजावयला पाहिजे. पण त्यांच्या सुरात सूर मिसळून गांधी घराण्याची तळी उचलण्याशिवाय ते काही करत नाहीत हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
   म्हणजे चीनच्या प्रश्नावर आमच्या 20 जवानांना धोक्याने मारण्यात आले. हेही सत्य आहे की, आमच्या वीर जवानांनी चीनच्याही अनेक जवानांना ठार केले आहे. आज चीन आम्हाला उघड आव्हान देत आहे. चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी तर या कपटी कारवाईसाठी भारताच्या सैन्यालाच दोषी धरले आहे.  एवढेच नाही, तर पाकिस्तान आणि अगदी नेपाळलादेखील उघडपणे भडकावून भारतावर तीन बाजूंनी हल्ला करण्याचे दुस्साहसही दाखविले आहे. भारताचे चीन, पाकिस्तान आणि नेपाळसोबत सीमेवरून भांडणे सुरू आहेत. म्हणून त्याला एकाच वेळी तीन आघाड्यांवर युद्ध लढावे लागेल. म्हणजे ज्या ज्या वेळी भारत आपल्या वाजवी हक्कांची गोष्ट करेल तर चीन युद्धाची धमकी देणार. ही परिस्थिती असताना राहुल गांधी आणि काँग्रेस चीनची भाषा करतात. पाकीस्तान विरोधातील बाब असते तेंव्हा राहुल गांधी पाकीस्तानची बाजू उचलून धरतात. आता चीनची बाजू मांडतात. मग अशा परिस्थितीत राहुल गांधीना भारतातील मतदारांनी का स्विकारावे याचे उत्तर काँग्रेस देईल का? आपली बावळटासारखी केलेली वक्तव्ये ट्विटरवरून करून जगभर देशाची निंदानालस्ती करताना जरा तरी शरम वाटली पाहिजे. तुमच्या मनातले प्रश्न सभागृहात विचारा ना, तिथे का तुम्हाला दातखिळ बसते? तिथे का डुलक्या घेता? सभागृहात सर्वात जास्त दांड्या का मारता? आज चांगले विद्वान अभ्यासू सहकारी आपल्याला सोडून जातात. ज्योतिरादित्य शिंदेसारखे लोक तुमच्यापासून तुटतात याचा विचार केला का कधी? दिग्विजयसिंग, मणिशंकर अय्यर, पृथ्वीराज चव्हाण अशा लाळघोट्यांपुढे तुमचे काय भवितव्य आहे याचा विचार राहुल गांधींनी कधी केला आहे का?
  वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसोबत संबंध चांगले करण्याचे लाख प्रयत्न केले आहेत, यात काही संशय नाही. पण आपण या क्षणी चीनसोबत युद्धसदृश स्थितीत आहोत. या युद्धाच्या अनेक आघाड्या आहेत. सध्याचा संघर्ष सामरिकही आहे, आर्थिकही आहे, वैचारिकही आहे आणि मनोवैज्ञानिकही आहे. त्यातच आपला देश कोरोनाशीदेखील एक युद्ध लढत आहे. देशात सात लाखांहून अधिक संक्रमण आणि 20 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
  चीन अतिशय चलाख, धूर्त आणि घातक शत्रू आहे.  आपल्या पाठीत सुरा खुपसू शकतो. तो तुमच्यासोबत शिखर बैठकीच्या वेळी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची हुकूमशाही कार्यप्रणाली जगातील कुठल्याच कायदे-कानून, आधी मान्य असलेले करार आणि नियमांना मानीत नाही. असे असताना त्या चीनची बाजू घेत सरकारला, पंतप्रधानांना लक्ष्य करणे हे राहुल गांधींच्या अपरिपक्वतेचे लक्षण म्हणावे लागेल. पण तुमचा बावळटपणा तुमच्या जवळ ठेवा. देशहिताच्या आड तो  येत असेल आणि शत्रूला फायदेशीर ठरत असेल तर राहुल गांधींवर कारवाई करावी लागेल. काँगे्रेस आणि राहुल गांधींना लोकशाही समजली नाही, फक्त घराणेशाही समजते याचीच ही साक्ष आहे. मनातील शंका, प्रश्न चर्चा करून त्याचे निरसन करता येते या लोकशाही मुल्यांवर त्यांचा विश्वास नसल्याने बावळटासारखे ट्विटरचा आधार घेत काहीही बरळत आहेत असेच दिसते. चीन आपल्या तंत्रज्ञान आणि झूम व टिकटॉकसारख्या अ‍ॅप्सचादेखील वापर या युद्धाच्या मनोवैज्ञानिक संघर्षात करीत आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे.
  गलवान खोर्यातील संघर्षाचे मूळ कारण काय आहे? याची दोन कारणे आहेत. पहिले, भारताने गेल्या काही वर्षांत आपल्या ईशान्य भागात सतत रस्ते, पूल आणि विमानतळे निर्माण करण्याचे काम केले आहे. यामुळे चीन विचलित झाला आहे.  1962 नंतर आम्ही चीनच्या सीमेवर पायाभूत संरचना निर्माण करण्याचे कामच केले नाही. कारणची काँग्रेसची तशी इच्छा नव्हती. चीनपुढे शेपूट घालण्याचे काम काँग्रेसने केले. तर तिकडे चीनने सतत रस्ते, रेल्वेमार्ग, धावपट्ट्या आणि पूल बनविले. त्यामुळे त्याचे सैन्य तसेच मोठमोठे शस्त्र फारच कमी वेळात आघाड्यांवर पोहचवू शकते. इकडे आम्ही विचारच करीत राहिलो की, जर आम्ही रस्ते आणि पूल बनविले तर चीनचे सैन्य त्याचा वापर करेल. असा नकारात्मक आणि नेभळट विचार एका पराजित मानसिकतेलाच दर्शवितो. काँग्रेसने कायम तेच केले. जे चीनला फायदेशीर होते. त्यामुळे आज मोदींच्या रणनीतीने चीनपेक्षा काँग्रेस आणि राहुल गांधी जास्त सैरभैर झालेले दिसतात. म्हणूनच जे आज सरकारला प्रश्न विचारीत आहेत, त्यांना विचारले पाहिजे की, भीतीची ही मानसिकता योग्य आहे का?
    मोदी सरकारने काँग्रेसने निर्माण केलेेल्या आपल्या या दुर्बलतेला ओळखले आणि गेल्या काही वर्षांपासून भारत-चीन नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी नवे रस्ते, पूल आणि विमानतळ बनविणे सुरू केले. म्हणून चीनने स्पष्ट म्हटले आहे की, सध्याच्या तणावाचे मूळ कारण भारताचे हे निर्माणकार्यच आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, जर आम्ही आमच्या प्रदेशांच्या विकासासाठी रस्ते आणि पूल बनविले, तर चीन त्याचा विरोध करेल आणि त्याच्या विरोधात तो संघर्षावरही येईल. जेव्हा चीन संघर्षावर उतरेल तर आम्ही तिथून पळू की खंबीरपणे त्याचा मुकाबला करू, हा प्रश्न आहे. गलवान खोर्यात हेच झाले. आमचे सैन्य, चीनने डोळे वटारले तरी घाबरले नाही. दृढपणे चीनच्या उद्दाम सैन्याशी सामना केला. ज्यात आमच्या काही जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले असले, तरी चीनचेही बरेच सैनिक मारले गेले. आम्ही देश सांभाळायला, देशाचे रक्षण करायला खंबीर आहोत हे सैन्याने आणि सरकारने दाखवले त्याची पोटदुखी काँग्रेसला झाल्याचे दिसून आले, हाच याचा अर्थ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: