कोरोनाचे वाढते संकट आणि त्यामुळे बंद पडत चाललेल्या उद्योगांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. आज लाखो लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘महाजॉब्स पोर्टल’ नावाचे जॉब नोंदणी पोर्टल सुरु केले. बेरोजगारांसाठी हा नक्कीच दिलासा आहे. या पोर्टललला पहिल्याच दिवशी 700 उद्योजकांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दिला आहे, तर सुमारे 15 हजारांहून अधिक इच्छुकांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे. त्यामुळे अशा एखाद्या पोर्टलची खूपच आवश्यकता होती आणि हे पोर्टल रोजगार देण्याच उपयुक्त ठरेल असे दिसते.
आज राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात काम मागणार्या हातांची संख्या बेसुमार आहे. त्या तुलनेत काम देणार्यांची संख्या अपुरी पडते आहे. अर्थात हे काही आजचे दृष्य नाही. अगदी स्वातंत्र्यापासून बेरोजगारीचे प्रमाण आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. काम मागणार्यांना काम देण्यास आपले सरकार कायम कमी पडत आलेले आहे. सरकार कोणतेही असो, त्या सरकारपुढचा पहिला प्रश्न असायचा तो बेरोजगारीचा. त्यामुळे अनेक दशके आपल्याकडे यावर फक्त चर्चा घडत राहिल्या, त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न फार कमी झाले. या कालावधीत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी कमी करणे, रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे हा मुद्दा असायचा. अर्थात त्याला फारसे यश कोणालाच आले नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे होते. त्यामुळे हे नवे पोर्टल सुरू करण्याचे काम सरकारने केले असेल तर ती चांगली गोष्ट आहे. अर्थात पोर्टल सुरू केले म्हणजे लोकांना रोजगार मिळेल असे नाही. कारण पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज होतेच की. त्यांच्याकडून कोणाला कधी रोजगार मिळाला? तिथे जाउन फक्त नाव नोंदणी करून यायचे. एम्प्लॉयमेंट कार्ड काढले की तरूण वर्षानुवर्षे वाट पहात असायचे. तोच प्रकार या डिजीटल योजनेत होणार का असाही प्रश्न आहे. पण आज वाढती बेरोजगारी आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे हे कोरोनाचे संकट आलेले आहे. आता कोरोना, लॉकडाऊन यामुळे संपूर्ण जगभरात महामंदीचे, महाबेरोजगारीचे संकट आहे. एप्रिल 2019 पासून देशातील बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर अलेली ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी असून बहुतांश संस्थांनी त्यांची नोकर भरती प्रक्रिया थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात केली जात आहे. या अडचणीमुळे नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना संधी शोधत असताना योग्य वेळेत नोकरी मिळण्याकरिता अडचणी येत असल्याचे भारतातील सर्वात मोठ्या आयपी संचलित ‘इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन एलएलपी’द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमधील जवळपास 1 हजारच्या आसपास विद्यार्थ्यांदरम्यान केल्या गेलेल्या या सर्वेक्षणातून इंजिनिअर्सना नोकरीसाठी सक्षम बनवण्यात कौशल्यातील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. अर्थात सर्वच प्रकारच्या पदवीधरांची ही परिस्थिती आहे. या सर्वेक्षणात फक्त इंजिनीअर्सचा उल्लेख असला तरी सर्वांची अवस्था तीच आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता, नोकरी शोधणार्यांसाठी एखाद्या मजबूत कौशल्य समूहाची गरज आहे. जी परिस्थिती इंजिनिअर विद्यार्थ्यांची आहे, तशीच अवस्था एम.बी.ए., एम.ए. आणि इतर पदवीधारकांचीही आहे. जवळपास सर्वच विभागातील नोकरभरती ठप्प आहे. जे नोकरीवर आहेत त्यांनाही कमी करण्याचा आणि खर्चात कपात करण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आलेली आहे. त्यामुळे कोणतेही नवे खर्च त्याला झेपणारे नाहीत.
त्यामुळेच या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘महाजॉब्स पोर्टल’ नावाचे जॉब नोंदणी पोर्टल सुरु केले, ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे. आज लाखो तरूणांनी यावर आपली नोंद केल्याचे दिसते आहे. यातून रोजगाराच्या प्रतिक्षेत किती जण आहेत हे चित्र समोर येते. महाराष्ट्रातील तरूणांचा विचार केला तर त्यांची तक्रार असते की परप्रांतीय आमचा रोजगार हिरावून घेतात. प्रत्येक राज्यातील स्थानिकांची ही तक्रार असतेच. लॉकडाउन झाल्यावर जे परप्रांतीय सोडून गेले त्यांच्या जागी अनलॉक झाल्यावरही नवी भरती करण्याचे धाडस अनेक कंपन्यांनी केलेले नाही. आज अनेक कंपन्यांनी अजूनही आपल्याकडे असणार्या परप्रांतीय मजुरांची, कर्मचार्यांची ते परतून येतील यासाठी वाट बघणे पसंत केले आहे, तर औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणच्या एमआयडीसी विभागातील अनेक कंपन्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बंद करण्यात आल्यानेही नोकर भरती ठप्प आहे. राज्य सरकारने सुरु केलेल्या या जॉब्स पोर्टलचा कितीजणांना फायदा होणार हे आज तरी सांगता येणार नाही. याचे आणखी एक कारण असे की आपल्याकडे काम नाही झाले तरी चालते पण श्रेय कोणाला मिळणार याचा हिशोब केला जातो. रोजगार मिळाला नाही तरी चालेल पण दिखावा झाला पाहिजे. सरकार काहीतरी करते आहे हे दिसले पाहिजे. पण जे काही सरकार करणार आहे त्याचा फायदा राजकीय पक्षांना कसा मिळेल याचाच विचार अधिक केला जातो. त्यामुळेच हे महापोर्टल सुरू केले असले तरी एकाच वेळी दोन नावाने हे पोर्टल चालवले जात आहे. एक शिवसेनेच्या मार्फत तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत. यातून काय साध्य होणार आहे? सरकार महाविकास आघाडीचे आहे. पोर्टल सरकारचे आहे मग त्यावर आपला हक्क सांगून तरूण शक्ती आपल्या पक्षाकडे ओढण्याची ही घाई का केली जात आहे? ही पक्षाची सदस्यता नोंदणी नाही. नुकतीच इंदिरा गांधी इन्स्टिट्यूूट ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांचा 34 हजार कोटी रुपयांचा मोबदला बुडाला आहे. म्हणजे 25 मार्च ते 14 एप्रिल या काळात करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये 11.6 कोटी श्रमिकांचे रोजगार गेले. दुसर्या टप्प्यात 15 एप्रिल ते 3 मे या दुसर्या लॉकडाऊनमध्ये 7.9 कोटी श्रमिकांना रोजगार गमवावा लागला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये ज्या श्रमिकांचे रोजगार गेले, ते ज्या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती त्या राज्यांतील होते. कोरोना रुग्ण सर्वाधिक असणार्या आघाडीच्या पाच राज्यांतून 40 टक्के श्रमिक आहेत, तर रोजगार गमावलेले 70 टक्के श्रमिक कोरोना रुग्ण असलेल्या आघाडीच्या 10 राज्यांतील आहेत. या संस्थेने केलेल्या अभ्यासातून रोजंदारीवर काम करणारे किंवा अनौपचारिक क्षेत्रातील श्रमिकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. दोन्ही लॉकडाऊनचा विचार करता, शहरी भागात काम करणा-या श्रमिकांना या काळात सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ग्रामीण भागात हालचालींवर कमी प्रतिबंध असल्यामुळे ग्रामीण भागातील श्रमिकांना फायदा झाला आहे.
ग्रामीण भागातूनच देशभरात शेतमाल व अन्य खाद्यपदार्थ वितरित होत असल्यामुळे या भागांत प्रतिबंध कडक केले गेले नव्हते. त्यामुळे येथील लोकांच्या रोजगारावर मोठा विपरित परिणाम दिसून आला नाही. या अहवालाशिवाय इंडस्ट्री चेंबर फिक्की व इंडियन एंजेल नेटवर्क यांनी ‘भारतीय स्टार्टअपवर झालेला कोरोनाचा प्रभाव’ या विषयावर एक पाहणी केली. या पाहणीनुसार, देशातील 12 टक्के स्टार्टअप बंद पडले आहेत. त्यामुळे या पोर्टलचा फायदा काय होतो हे बघावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा