रविवार, २६ जुलै, २०२०

या त्रिसूत्रीची आवश्यकता

भारतात आता कोरोनाची समूह संसर्गाला सुरूवात झाल्याची बातमी रविवारी सकाळी सकाळी आली आणि थोडी मनात चिंता निर्माण झाली. पण तरीही आता लक्षात घेतले पाहिजे की आता आपल्याला इथून पुढे कोरोनाबरोबरच रहायचे आहे. जसे आपण मागच्या दशकात अनेक रोग स्विकारले आहेत तसेच कोरोनाला स्विकारणे भाग आहे. त्याला घाबरून आता व्यवहार आणि कामकाज बंद ठेवण्यात कसलाही शहाणपणा नाही. देवी, टीबी, एडस, लॅप्टो, डेंगू, स्वाईन फ्ल्यू अशा एकापाठोपाठ भयानक संसर्गजन्य रोगांना आपण तोंड दिल्यावर आता कोरोनाला घाबरून लपून बसण्याची गरज आहे का?
 मान्य आहे की .सध्या आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहोत. हा काळ, ही परिस्थिती आपण पहिल्यांदाच अनुभवत आहोत. पण आपले उद्दीष्ट आता समोर ठेवले पाहिजे. होय जगण्याचे उद्दीष्ट. या उद्दिष्टांमध्ये माणसांचे जीव आणि उदरनिर्वाहाची साधनं वाचवण्यावर भर द्यायला हवा. आपल्या सरकारचं हेच पहिलं प्राधान्य असायला हवं. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च करण्याची तसंच थेट खात्यात रक्कम भरण्याची तयारी सरकारनं ठेवायला हवी. नव्हे, त्यांनी ते करायला हवं. सरकार याबाबत पावलं उचलत आहे. सध्या आपण कोरोनाकाळात जगत आहोत. आजघडीला आपल्यापुढे दोन आव्हानं आहेत. पहिलं आव्हान आहे विषाणूपासून लोकांचं, त्यांच्या जीविताचं रक्षण करण्याचं आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी किंवा उत्पन्नाचं साधन उपलब्ध न झाल्यामुळे जाणारे बळी रोखणं. आजपासून जर समूह संसर्ग सुरू झाला असेल आणि खरोखरच इतका तो जीवघेणा भयानक रोग असेल तर आता संपूर्ण मनुष्य जातीचे अस्तीत्व धोक्यात आहे. ज्या चीनने या रोगाची निर्मिती केली आहे, त्या चीनला तरी यातून कसे सोडता येणार आहे? सगळे जगच नष्ट होण्याची भिती असेल तर चीनला तरी का सोडायचे हा प्रश्न असताना आपण आता आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे सरकारपुढे दोन प्रश्न आहेत. आपल्या माणसांना वाचवायचे की हा हल्ला करणारांना धडा शिकवायचा? या दोहोंमध्ये समतोल साधण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलावं लागणार आहे. उदरनिर्वाहाची साधनं नसल्यामुळेही अनेकांचे बळी जाऊ शकतात, ही दखल घेण्याजोगी बाब आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपण कशी हाताळतो, यावर बरंच काही अवलंबून आहे. कोरोनाकाळात घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव कोरोनानंतरच्या काळावरही पडणार आहे. म्हणूनच लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, ही आजच्या घडीची खरी निकड आहे.  सध्या मागणीत बरीच घट झाल्याचं दिसून येतं. मदतीच्या योजना राबवताना लोकांच्या खात्यात पैसे भरल्यामुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता असली तरी सध्या लोकांचा कल बचत करण्याकडे असल्याचं दिसून येतं. आपल्या बँक खात्यात पैसे असावेत, असं प्रत्येकाला वाटतंय. म्हणूनच खरेदी करताना हात आखडता घेतला जात आहे. कारण असलेला पैसा पुरवून पुरवून वापरण्याचे फार मोठे आव्हान सामान्यांपुढे आहे. देशात कोरोना विषाणूच्या साथीमुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. एप्रिल आणि मे असे दोन महिने टाळेबंदीत गेल्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. आता या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर नकारात्मकही राहू शकतो. हा विकासदर किती खाली जाईल, हे येणारा काळच ठरवेल. तसंच आपली अर्थव्यवस्था यातून कशी आणि केव्हा सावरते यावरही बरंच काही अवलंबून असेल. सध्याच्या नव्या युगात आपण भारताची नव्यानं उभारणी करत आहोत. यासाठी आपला पाया बळकट असायला हवा. कोरोनानंतरच्या काळाचा विचार करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. आता समूह संसर्ग झाल्यानंतर हा रोग लवकर जाणारा नाही याचा विचार करून आपल्याला लढण्यासाठी उतरायचे आहे ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे.
 त्यासाठी आता आपल्याला तीन आघाडयांवर प्रचंड काम करावं लागणार आहे. पहिली आघाडी म्हणजे आरोग्यसेवा. आता सर्वात प्रथम सरकारने आरोग्यसेवेवरील खर्चात वाढ करायला हवी. यात औषधोपचार, निर्जंतुकीकरण, स्वच्छता, डॉक्टर्स, परिचारिका, इस्पितळांची बांधणी, तिथल्या पायाभूत सोयी-सुविधा, ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणं या सगळ्या बाबींचा अंतर्भाव व्हायला हवा. त्यासाठी आता आरोग्यसेवेत अधिक गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात याकडे एक संधी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे.
  दुसरी आघाडी आहे ती  शिक्षणाची. शिक्षणक्षेत्रात बरंच काम व्हायला हवं. कोरोनानंतरच्या काळात भारताची उभारणी करताना शिक्षणक्षेत्राला प्रचंड महत्त्व असणार आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करणं ही काळाची गरज आहे. परिक्षा, निकाल आणि जवळपास सहा महिने शिक्षण यंत्रणा बंद राहिल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवतील. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येे आलेले जडत्व दूर करण्याची गरज आहे.
 याशिवाय तिसरी आघाडी म्हणजे अर्थातच पर्यावरण. आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय शाश्वत विकास साधता येणार नाही. आताचा कोरोना विषाणू असो, देशाच्या पूर्व तसंच पश्चिम किनारपट्टीला सतत धडकणारी चक्रीवादळं असोत किंवा अगदी विविध राज्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान करणारी टोळधाड असो हे सगळे आपल्याला जागे करण्याचे निसर्गाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी तरतूद करावी लागणार आहे. बदलत्या भारतात या तीन आघाडयांवर काम होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे जेवढी सीमेवरच्या संरक्षणाची गरज आहे तेवढीच देशांतर्गत या शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी नवा त्रिसूत्री कारभार सरकारने ठरवला पाहिजे. यातूनच रोजगार निर्मितीच्या कशा संधी निर्माण होतील याकडे आता लक्ष दिले पाहिजे. या मूलभूत आणि पायाभूत गोष्टींची पूर्तता करणे हे कोरोनाबरोबर लढण्यासाठी आणि कोरोनासह जगण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. लोकांचा रोजगार आणि आयुष्य वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करायला हवेत. यासाठी देशानं कर्ज घ्यायलाही हरकत नाही. मात्र आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रांबाबत निवड करण्याची वेळ आली तर निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे. शिक्षण आरोग आणि पर्यावरण या त्रिसूत्रीला जपूनच आपण या संकटाबरोबर राहू आणि लढू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: