मंगळवार, २८ जुलै, २०२०

जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर

  5 ऑगस्टला राममंदीराचे भूमीपूजन होत आहे. वर्षानुवर्षे , दशकानुदशके सुरू असलेल्या वादाचा आता अंत होणार आहे. देशाची फार मोठी अस्मिता जपली जाणार आहे. न्यायालयात हा विषय भरपूर चर्चा होउन त्याचा योग्य निवाडा झाला. न्यायालयानेच पुढाकार घेउन कालबद्ध कार्यक्रमाचा आग्रह धरला आणि आता मंदीर निर्माणाची प्रक्रीया मार्गी लागत आहे. तमाम भारतीयांना याचा अभिमान आहे. काही विरोधक असतील पण ते केवळ राजकारणासाठी विरोधक करतात. मनातून त्यांनाही आनंद झालेला आहेच. कारण 6 डिसेंबर 1992 ला जेंव्हा बाबरी पाडली गेली तेंव्हा भारतातल्या प्रत्येकाच्या मनात आनंद होता. त्यानंतर काही दुष्ट प्रवृत्तींनी दंगली घडवल्या असल्या तरी स्वातंत्र्यानंतर सर्वात आनंदाची बाब म्हणूनच या घटनेकडे पाहिले गेले होते. त्यामुळे हे आता मंदीर निर्माण होत आहे ती समाधानाची बाब आहे. बाबरी ढाचा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील, देशातील पुरोगामी नेत्यांनी त्याची निर्भत्सना केली होती. पण तो केवळ विरोधासाठी विरोध होता. पण त्यांनीही आता हे आंदोलन का उभारले हे समजून घेण्याची गरज आहे. रामजन्मभूमीमुक्ती आंदोलन, हे हिंदूचे आत्मभान जागृत करणारे आंदोलन होते. हिंदू स्वतःची अस्मिता विसरून सिंहअसूनही बकरी झाला होता. तो म्हणू लागला होता, “मी हिंदूनाही, सेक्युलर आहे. मी मानव आहे. मी सर्वधर्मसमभावी आहे. पण थोडा तेरा देशाभिमान, संस्कृती सन्मान हा असलाच पाहिजे. कालच एका वाहिनीवर या आंदोलनातील एक महत्वाची भुमिका निभावणार्‍या उमा भारती यांची मुलाखत दाखवली. त्यात त्यांनी ही मतं स्पष्ट केली होती.   राम मंदीराला विरोध करणारे फक्त राजकीय नेते होते. राजकीय पक्ष होते. त्यांच्या मनात भीती होती ती वेगळ्या कारणाची. त्याच्या मनात खोलवर मुसलमानांची भीती दडलेली असते. पण स्वातंत्र्यानंतर मुसलमानांची भीती बाळगणारेच राज्यकर्ते झाले. स्वाभाविकपणे ते हिंदुविरोधी झाले. हिंदुपणाची अस्मिता व्यक्त करायची तर सत्तेचा विरोध सहन करावा लागे, यामुळे हिंदू सोडून काही म्हणा या स्थितीत हिंदू माणूस गेला. त्याच्या मनातील मुसलमानांची भीती काढणे आवश्यक होते. हिंदुविरोधी राज्यसत्तेला हादरविणे आवश्यक होते. संघ, जनसंघ आणि संघ परिवाराला कायम मुसलमान विरोधी ठरवण्यात या पक्षांची हयात गेली. त्यामुळे राममंदीर हा मुद्दा मुसलमान विरोधी ठरवण्याचे षडयंत्र काँगे्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केले. त्यामुळे राममंदीराला विरोध झाला. तो प्रश्न कारण नसताना न्यायप्रविष्ठ झाला. काँग्रेसने केलेल्या या घोडचुकीचा देशाला फार मोठा फटका बसला होता. जी गोष्ट तुमचीच आहे, ती आमची आहे बरं का असे सांगायच्या नादात, ती दुसर्‍या कोणाची नाही ना? असे संशयाचे वातावरण निर्माण केले गेले. पण या जाचातून, काँग्रेसच्या पापातून यावर्षी भारत मुक्त झाला आणि राममंदीराचा मार्ग मोकळा झाला. त्याचा देशात सर्वत्र आनंद आहे.  खरं तर रामजन्मभूमीवर मंदिर बांधणे, ही प्रतीकात्मक लढाई झाली. हिंदू तत्त्वज्ञान हे सांगते की, देव देवळात नसतो आणि मूर्तीतही नसतो, तो चराचर सृष्टीत असतो. तो चैतन्यमय आहे. त्याचा निवास प्रत्येक प्राणिमात्रांत आहे. मंदिर बांधल्याने देवाची पूजा होते, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगत नाही, मग मंदिर कशाला हवे? असा बिनतोड प्रश्न उपस्थित केला जाउ शकतो. केला गेला. त्याचमुळे प्रश्न वादग्रस्त झाला. पण मंदिर एवढ्यासाठी हवे की, ईश्वर हा निर्गुण निराकार असतो. निराकाराची पूजा सर्वांना शक्य होत नाही. ईश्वर हा पवित्र, विमल, निःष्कलंक, नित्यशुद्ध असतो. तो प्रतीकात बघावा लागतो. ते प्रतीक म्हणजे देवाची मूर्ती. आपण पूजा त्या देवाच्या मूर्तीची करतो. ईश्वराचे पावित्र्य, निर्मलता, शुद्धता आपल्यात यावी, यासाठी भक्तिभावाने त्याची पूजा करायची असते. अशी पूजा करून समाजातील काही थोर व्यक्ती इतक्या मोठ्या होतात की, त्या ईश्वरसदृश वाटू लागतात. हीच आपली संस्कृती आहे. पण मूर्तीपूजक नसलेल्यांना ही जागा देण्याची अहमहमिका मात्र विनाकारण चालवली गेली त्याची कुठे चर्चा होत नाही. असो आता राजकारण संपले आहे आणि रामाचा वनवास संपला आहे. आता त्याची मंदीरात स्थापना करणे आवश्यक आहे. पुढच्याच आठवड्यात आता तो  योग येत आहे. हे आज हयात असणार्‍या प्रत्येकाच्या दृष्टीने एका इतिहासाचे साक्षीदार होण्याचे चित्र असेल.आपण भगवान रामाचा विचार करतो आहोत, त्याला विष्णूचा अवतार लोकांनी मानले. रामाने स्वतःला असे कधी मानले नाही. माझे नाव राम असून, मी कौशल्येचा आणि दशरथाचा पुत्र आहे, असाच परिचय रामाने दिला आहे. रामाच्या जीवनात चमत्काराच्या कथा नाहीत. पुत्र, भाऊ, मित्र, पती आणि राजा, याबाबतीत रामाने मानवी जीवनात आदर्श निर्माण केलेला आहे. राम मानव असल्यामुळेच रामचरित्रामध्ये काही गोष्टी खटकणार्‍या आढळतात. त्यामुळे रामाचे मानवीपण उत्तम प्रकारे सिद्ध होते. राम देव झाला, कारण त्याने जीवनभर देवत्वाचा व्यवहार केला, त्यात तडजोडी केल्या नाहीत. संघर्ष हा रामाच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्याच्याशी तो लढत राहिला आहे. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्षच करावा लागतो. अगदी कोरोनाशीही आपण लढत आहोतच. हे दुःखमय जीवन रामाप्रमाणे धैर्याने जगायचे असते. आपली दुःखे रामाच्या दुःखापुढे शीतल वाटू लागतात. यासाठी रामकथा प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसलेली असते. संघर्ष करून देव होण्याचे ध्येय प्रत्येकाच्या मनात रूजण्यासाठी या राममंदीराची आवश्यकता आहे. मनातील रामभाव जागृत करणे म्हणजे हिंदूअस्मिता जागृत करणे होय. हे ज्यांना समजले आणि समजते, ते अग्रेसर होतात आणि ज्यांना समजतच नाही, ते पुरोगामी होतात.पण आता हा प्रश्नही मिटला आहे. रामाच्याच कृपेने हा प्रश्न निकाली लागून त्याच्या मंदीराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तो एक आनंदाचा क्षण आपल्या सवार्ंंच्या आयुष्यात 5 ऑगस्टला येणार आहे, त्याचे स्वागतही मोठ्या मनानेच केले पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: