शनिवार, ९ जानेवारी, २०२१

'तो मी नव्हेच'


साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे सैद काझी खटल्यावर आधारित 'तो मी नव्हेच' हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरचा अनमोल ठेवा आहे. हे नाटक पाहिले नाही असा मागच्या पिढीतला मराठी माणूस सापडणेच शक्य नाही. किंबहुना हे नाटक पाहिले नाही तो मराठी माणूसच नाही, असे म्हणावे लागेल. प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर पंचरंगी भूमिका केलेल्या या नाटकाचे १० हजारपेक्षा जास्त प्रयोग झाले होते.


'तो मी नव्हेच' हे नाटक अनेकवेळा पाहिले आहे. त्यात कालानुरूप आणि प्रभाकर पणशीकरांच्या वयानुसार अनेक बदल करण्यात आले, पण मला सर्वात आठवतो आणि आवडतो तो साधारण १९७० च्या दशकात केला जात असलेला प्रयोग. फिरत्या रंगमंचावर सादर होणारा नाट्यप्रयोग म्हणून सर्वांनाच आकर्षण असायचे. त्यामुळे या फिरत्या रंगमंचाची मजा प्रेक्षकांना देण्यासाठी नाट्यसंपदा पुरेपूर प्रयत्न करायची. ते म्हणजे रंगमंच फिरताना बघायला प्रेक्षकांना मिळायचा आणि टाळ्या पडायच्या. म्हणजे न्यायालयातून हे नाटक सुरू होते.

लखोबा लोखंडेची साक्ष, उलटतपासणी सुरू होते. एकेकाची छुट्टी करत तो मी नव्हेच असे सुरुवातीच्या दोन-तीन साक्षीदारांना हा लखोबा बाहेर घालवतो, पण एक पहिलीच महिला साक्षीदार येते सुनंदा दातार. तिथे पहिला रंगमंच फिरतो. गंगुताई घोट्टाळे यांच्या वधू-वर सूचक मंडळात या सुनंदा दातारची लखोबाशी म्हणजे दिवाकर दातारशी गाठ पडते. सुनंदा साक्षीदाराच्या पिंजºयात उभी राहून सांगत असतानाच फ्लॅशबॅक म्हणून रंगमंच बदलतो. ते फिरत असताना गंगुताईचे आॅफीस तयार होते. हे इतके पटापट होते की, प्रेक्षकांना ते उजेडात दाखवले जायचे. रंगमंच फिरेपर्यंत कपडे बदलून काही क्षणात प्रभाकर पणशीकर दाखल व्हायचे, हा चमत्कार पहायला प्रेक्षकांना आवडायचा आणि लोक पुन्हा पुन्हा हे नाटक पाहत असत, पण कालांतराने प्रभाकर पणशीकर यांचे वय जसजसे वाढत होते तसतशी ती चपळाई राहिली नाही. त्यामुळे ब्लॅकआऊ ट केला जायचा. रंगमंचावर अंधारातच सेट चेंज व्हायचा. फिरता रंगमंच प्रेक्षकांना दिसणे बंद झाले. रंगमंच फिरता असूनही तो बदलत असतानाची मजा प्रेक्षकांना मिळेनाशी झाली. मग पंतांची तयारी होईपर्यंत बाकीच्या पात्रांचा टाइमपास सुरू व्हायचा. म्हणजे याच प्रवेशात दिवाकर दातार जाऊ न त्याजागी त्याचे काका दाजीशास्त्री दातार यांच्या वेशभूषेत पणशीकर येतात तेव्हा तो बदल सत्तरच्या दशकात इतका पटकन बघायला मिळायचा की, नंतर तो सावकाश व्हायला लागायचा. मग तोपर्यंत गंगुतार्इंच्या आॅफीसमध्ये सुनंदा दातारची बहीण, मेहुणे काहीही गप्पा मारून टाइमपास करायला लागत. ते प्रेक्षकांनाही कळायचे. कारण वयोमानानुसार मेकअप, कपडे बदलण्यास प्रभाकर पणशीकरांना वेळ लागत होता.


त्यामुळे प्रत्येक वेळी रंगमंच बदलला की टाइम लॅब करण्यासाठी काहीतरी वाढवले जायचे. राधेश्याम महाराजांची एण्ट्री सुरुवातीला न्यायालयातून थेट मंचावर व्हायची, पण नंतर महाराज पूजा करत आहेत असे भासवून तोपर्यंत भक्तगण चक्क एक भजन साजरे करायचे. राधेश्याम महाराज येईपर्यंत हा भजनी टाइमपास चालायचा. चंद्राबाई चित्रावच्या साक्षीसाठी हा खटाटोप असायचा.

पण 'तो मी नव्हेच' या नाटकातून पणशीकरांनी प्रेक्षकांना चांगले गुंगवले होते हे नक्कीच. अनेक नावे बदलून लोकांना फसवणारा हा लखोबा सुरुवातीला मधुकर विनायक देशमुख नावाने अग्निहोत्री नावाच्या एका इसमाला नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुबाडतो. त्यावेळी हा तर माझा भाऊ हैदर असल्याचे भिवंडीचा एक खाटिक सय्यद मन्सूर सांगतो. त्यानंतर दिवाकर दातार या नावाने प्रत्यक्ष समोर येतो, तर पाचच मिनिटांत दाजीशास्त्री दातार नावाने येतो. पुढच्याच अंकात प्रमिला परांजपे या महिलेशी लग्न करतो आणि कॅप्टन अशोक परांजपे नावाने नौदल अधिकाºयाच्या वेशात येतो. अशाप्रकारे रंगमंचावर विविध भूमिकांतून येतो आणि प्रेक्षकांना गुंग करून टाकतो, तर दुसरीकडे न्यायालयात प्रत्येक साक्षीत साक्षीदाराची उलटतपासणी घेऊ न तो मी नव्हेच हा त्याचा नारा सुरू असतोच.


या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. आचार्य अत्रेंनी काझी खटल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाटक लिहिले आणि त्याचे सादरीकरण केले तेव्हा या खटल्याचा निकाल देणारे न्यायमूर्तीही हा नाट्यप्रयोग पहायला आले होते. आचार्य अत्र्यांची लेखनशैली ही पुन्हा एकदा सगळ्यांना या निमित्ताने भारावून टाकणारी दिसली, मात्र कालांतराने हे नाटक नक्की कोणाचे इतका प्रश्न प्रेक्षकांना वाटायचा. हे नाटक अत्र्यांचे की हे नाटक दिग्दर्शकाचे? हे नाटक पणशीकरांचे की नक्की कोणाचे? पण एक चांगले समीकरण जुळलेले मोठे नाटक प्रेक्षकांना पहायला मिळाले. जवळपास चाळीस वर्षं या नाटकाचे प्रयोग होत राहिले. सर्वाधिक रिपिट आॅडियन्स या नाटकाला मिळाला आहे. कारण पुन:प्रत्ययाचा आनंद काही औरच असतो तसे हे नाटक लोक पुन्हा पुन्हा पहात आले आहेत.

प्रभाकर पणशीकरांनी हे नाटक इतक्या उंचीवर नेऊ न ठेवले की आज त्या उंचीची तुलना होणार म्हणून हे नाटक करायला कोणी तयार होत नाही. मध्यंतरी काही प्रयोग डॉ. गिरीष ओक यांनी केले, पण ते प्रयोग केले इतकेच म्हणावे लागेल. त्यात फारशी चमक नव्हती, पण अशी नाटके पुनरुज्जीवित करण्याचे धाडस कोणीतरी दाखवायला पाहिजे. आजकाला दोन अंकी, दोन तास चालणाºया, छोटे संवाद असणाºया नाटकांच्या जमान्यात ही शब्दबंबाळ नाटके पेलण्याचे धाडस कोणी करत नाही, कारण यातील बचावाचा पवित्रा असलेले लखोबाचे स्वगत असेल, सरकारी वकील विप्रदास यांचे संपूर्ण खटल्याचा आढावा घेणारे स्वगत ही फार मोठी ताकदीची होती. इतके मोठे डायलॉग पाठ करण्याचे धाडस आजकाल कोणी करत नाही, कारण कोणाकडे एवढा वेळ नाही. प्रत्येकाची नजर मालिकांकडे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: