हर कोई सुख की चाबी ढुंढ रहा हैं।
पर सवाल ये हैं की, सुख को ताला किसने लगाया हैं? - नरिंदर नसवा
रोजगारावर नेहमीच चर्चा होते. अनेक जण काम नाही म्हणून घरी बसून राहतात; पण काही क्षेत्र अशी आहेत की, तिथे माणसं मिळत नाहीत, म्हणून ओरड होते. हे असे विषम गुणोत्तर का आहे? याचे कारण आम्ही एक ठराविक प्रकारचेच काम करू, अशा आम्ही आमच्याच पायात बेड्या बांधून घेतल्या आहेत. ही जोखडं तोडून आम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही. हा या रोगाचा खरा व्हायरस आहे. तो नष्ट होईल तेव्हाच बेरोजगारी दूर होईल. काम करणाºयाला काम आहे, पण कामचुकारांना मात्र ते मिळणार नाही. कारण ते निमित्त शोधत असतात काम न करण्याचे.
आमची शिकण्याची तयारी नाही, जे शिकलोय त्याचा उपयोग नाही, अशी अवस्था झालेली आहे. जे शिक्षण घेतले त्याच विषयाशी संबंधित काम मी करू शकेन, अशा मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. त्यामुळे नोकºया असूनही अनेक जण त्याचा फायदा घेत नाहीत. आम्ही इंजिनिअर झालो. आम्ही वकील झालो, अमूक एक डिग्री घेतली; पण त्याचे काम मिळत नाही. पण दुसरे काम केले तर काय हरकत आहे? तर लोक काय म्हणतील ही भीती; पण असे लोक आयुष्यभर पोसणार नाहीत हेही विचारात घेण्याची गरज असते. मॅकेनिकल आणि आॅटोमोबाइल क्षेत्रात इंजिनिअरिंग केलेले सर्वात जास्त बेरोजगार आहेत, कारण त्यांना त्यांच्या योग्यतेचा जॉब मिळत नाही. पण दुसºया क्षेत्रात संधी मिळाली, तर तिथेही कष्ट करण्याची तयारी नसते, असे एक निरीक्षण आहे. त्यामुळे अनेक जण दु:खी होतात. वैफल्यग्रस्त होतात. आपल्या आयुष्यात आपण कधीच सुख मिळवू शकणार नाही, असे वाटून नैराश्याने ग्रासले जातात. यावर एका शायरचा शेर फार छान आहे. तो म्हणजे, हर कोई सुख की चाबी ढुंढ रहा हैं। पर सवाल ये हैं की, सुख को ताला किसने लगाया हैं? खरंच आम्हीच आमच्यावर बंधने घालून घेतली आहेत. मी धंदा करणार नाही, मी अमूक एक नोकरी मिळाली तरच करेन, मी आमच्या गावातच नोकरी करेन, मी लांब जाणार नाही, मी मुंबईत जाणार नाही, मी महाराष्ट्राबाहेर जाणार नाही. अशा स्वत:वर बंधने घालून घेणाºयांनी आपल्या सुखाला ताळा लावला आहे.
शिक्षणाचा आणि नोकरी कामधंद्याचा काही संबंध नसतो. आज वैद्यकीय क्षेत्रात शिकलेले अनेक डॉक्टर लोक अभिनेते आहेत. कायद्याचे शिक्षण घेतलेले अनेक लोक विविध कंपन्यांमध्ये काम करतात, तसेच आपण वेगळे काम केले तर बिघडले कुठे? शिक्षणाने आपण शहाणे व्हायचे आहे, त्याचा फायदा घेऊन नोकरी-धंदा करायचा आहे. त्यामुळे आपल्याकडे कुठली डिग्री आहे याचा विचार न करता काम करणे ही गरज आहे, तरच बेरोजगारी दूर होईल नाही तर आपण बेकार ठरणार आहोत. आज आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक जण वेगवेगळे उद्योग करताना दिसतात. लॉकडाऊनच्या काळात आयटी क्षेत्रातून जॉब गेलेल्या अनेकांनी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला आहे, म्हणजेच ज्यांना काम करायचे आहे ते कुठलेही चांगले काम करून रोजगार मिळवू शकतात. पण जे मिळेल ते काम करण्यास नकार देतात ते बेरोजगार राहतात. मी याचे शिक्षण घेतले आहे, ते काम कसे करू हा विचार डोक्यातून काढला पाहिजे. बीकॉम झालेल्या किती तरुणांना बँकेत खाते उघडण्याचा फॉर्म कोणाला न विचारता भरता येतो? त्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती किती जण अचूक भरतात? सही असा कॉलम असला तरी सही कुठे करू, असे विचारतात. मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? म्हणूनच ज्याच्यापासून रोजगार मिळतो आहे ते शिक्षण हेच खरे. अशा विचाराने मिळेल ते काम केले तरच बेरोजगारी दूर होईल. कोणताही नेता, पक्ष, सरकार दरवर्षी इतका रोजगार देऊ, असे म्हणून देऊ शकणार नाही, तुमचा रोजगार तुम्हालाच मिळवावा लागणार आहे. नाहीतर तुम्ही बेकार व्हाल हे नव्या पिढीने लक्षात घेण्याची गरज आहे.
आज मुंबईत यूपी बिहारवरून आलेली माणसं आपल्याला वेगवेगळे व्यवसाय करताना दिसतात. कुणी फळांच्या डीश तयार करून विकतो, कुणी सिक्युरिटीमध्ये जातो, कुणी हॉटेलमध्येही काम करतो. हे सगळे काही अडाणी लोक आहेत असे नाही. कित्येक हॉटेल बारमध्ये नोकरी करणारे वेटर हे पदवीधर आहेत. छोटे-छोटे व्यवसाय करणारे, फिरती विक्री करणारे सुशिक्षित आहेत. टेक्निकली फीट आहेत. काही विकताना अगदी चहा विकतानाही ग्राहकाला सुट्टे पैसे असतील तरच या असा संदेश न देता गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा तंत्राचा वापर करून कॅशलेस झालेले आहेत. अगदी फळ विक्रेतेही कॅशलेस झाले आहेत; पण आपण मराठी तरुण हे उद्योग करू शकत नाही. कारण शिक्षणाच्या बेड्या पायात बांधून ठेवल्या आहेत; पण कसलेही काम करा पण रोजगार मिळाला पाहिजे हे ध्येय आता बाळगायचे दिवस आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा