मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

श्वान(शहाण)पण


शेवटची लोकल गेली आणि सगळीकडे सामसूम झाली होती. आता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मपासून ते जिन्यापर्यंत अनेक भटकी कुत्री जमली होती. दिवसभर भरपेट खाणं झाल्यानंतर शिळोप्याच्या गप्पा मारायला एकेक कुत्रं जमू लागलं. ‘भूभूभू’ हाका मारून कोसाकोसावरून अनेक कुत्री जमायला लागली.


काही अगोदरच जमलेली होती. ती स्थानापन्न झाली होती. कुणी मागच्या पायानं पुढच्या पायामागचा भाग खाजवत होतं. कुणी व्हायोलीन वाजवल्याप्रमाणे एक तार लावून तल्लीन होऊन खाजवत बसलं होतं. कुणी पालथे पडून पाठ खाजवत होतं. कुणी एकमेकांचा वास घेत होतं. कुणी अंगावरच्या पिसवा गोचीड्या काढण्यासाठी आपल्याचा दातांचा वापर करून चावत होतं. अशा वेगवेगळ्या मूडमध्येही कुत्री असतानाच एक त्यांचा नेता असलेला कुत्रा तिथे येतो. त्याच्याभोवती सगळी कुत्री जमा होतात.

तो कुत्र्यांचा नेता जोरात भुंकतो आणि सर्वांना एकत्र करतो. ‘भूभूभू.... इकडे या... की भूभूभू...’ तशी सगळी कुत्री रेल्वे ब्रीजच्या जिन्यापाशी जमतात. नेता कुत्रा बोलायला लागतो, ‘माझ्या भूभू बांधवांनो, आता आपले स्वातंत्र्याचे दिवस संपत येत आहेत. गेले आठ-नऊ महिने आपण भरपूर उंडारून घेतलं, पण आता आपल्याला पूर्वीसारखं मोकाट राहता येईलच, असे नाही.’


यावर तिथे उपस्थित असलेला आणखी एक ज्येष्ठ कुत्रा विचारतो, ‘भूउउउ... म्हणजे नक्की काय झालं? ’

त्यावर नेता बोलता, ‘या माणसांचं काही खरं नाही. केव्हा काय करतील याचा नेम नाही. गेल्या मार्च महिन्यात त्यांनी कोरोनाची साथ आली म्हणून सगळा देश बंद करून टाकला. कुणी बाहेर पडेनासे झाले. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण ना मास्क घातला, ना हात धुतले. ना सोशल डिस्टन्स पाळला ना काही खबरदारी घेतली. उलट माणसं बाहेर पडत नाहीत म्हणून आपण रस्त्यावर मोठ्या संख्येने जमत होतो; पण मग टप्प्याटप्प्याने सगळं सुरू व्हायला लागलं आणि आपल्या स्वातंत्र्यावर पुन्हा मर्यादा यायला लागल्या.’


यावर एक तपकिरी रंगाची भटकी कुत्री नखरा करत म्हणाली, ‘भाउउउ भू... आपल्याला कसल्या आल्यात मर्यादा? आपण बिनधास्त हिंडतोच की. आता तर आपली संख्या इतकी वाढली आहे की, घोळक्याने आपण जातो. पूर्वी पावसाळ्यातच असे घोळके माझ्याभोवती असायचे आता केव्हाही जमतात. काही मर्यादा बिर्यादा नाही.’

तसा नेता कुत्रा समजावणीच्या सुरात म्हणाला, ‘भूताईभू... अगं तसलं स्वातंत्र्य नाही गं... पण या लॉकडाऊनच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तसंच आपल्याला त्रासही सहन करावा लागला. त्याबाबत कुणीच बोलत नाही. म्हणून आज आपण ही चर्चा करणार आहोत. या स्टेशनच्या बाहेर इतके खाद्य पदार्थ विकणारे गाडे होते. विक्रेते होते. ते चायनीज आणि काहीतरी पदार्थ करून माणसांना खायला घालायचे. त्यांनी केलेल्या पदार्थांची उरलेली हाडं, कचरा ते आपल्याला घालायचे. आपण चायनीजवर ताव मारायचो; पण या लॉकडाऊनच्या काळात हे गाडे बंद झाल्यामुळे चौपाटीपासून ते ठिकठिकाणच्या खाऊगल्लीतल्या कचºयांचे ढिगारे कमी झाले. त्यामुळे आपली गैरसोय झाली त्याचे काय? यामुळे आपली मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली होती. आपल्याला जे आयतं खायला मिळत होतं, ते जाऊन रस्त्यावर यायला लागलं हे दु:खच नाही का भूभूनो?’


सगळ्या जमलेल्या कुत्र्यांनी माना डोलावल्या, कुणी शेपट्या हालवून प्रतिसाद दिला, तर कुणी कान फडकवले.

नेता बोलू लागला, ‘भूभूभ... आता आपल्याला सावध राहिले पाहिजे, नाहीतर आपले हाल. आपल्यासाठी या माणसांमधीलच काही आपल्यावर प्रेम करणारे दररोज सकाळ-संध्याकाळ बिस्किटाचे पुडे घेऊन येत असतात. या लॉकडाऊनच्या काळात आपला तो खुराक थांबला होता. त्यामुळे अनेक श्वानबांधवांचे कुपोषण झालेले आहे. ऐन उन्हाळ्यातही माणसं पाण्याचा अतोनात वापर करत होती आणि तळी, जलाशय बंद केले होते. त्यामुळे आपल्याला कुठे डुबकीही मारता आलेली नव्हती. त्यामुळे आपले हाल झालेच; पण आता म्हणे हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत आहेत. आपल्यालाही पूर्वीसारखा आहार मिळेल यात शंकाच नाही; पण चुकूनही लॉकडाऊनच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, असं कोणी समजू नका. आपण भक्षाच्या शोधात बाहेर पडत होतो, कारण माणसांचं रस्त्यावरचं खाणं थांबलं होतं. त्यामुळे ते घास कमी झाले होते; पण आता लवकरच आपले पूर्वीचे दिवस येतील, अशी आशा करूया.’


सर्वांनी शेपट्या हालवून आनंद व्यक्त केला. त्यावर एक ज्येष्ठ कुत्रा म्हणाला, ‘भूउउभू.. माझी आणखी एक सूचना आहे. विशेषत: या तरुण मंडळींना ती सूचना करावीशी वाटते. आता लोकल सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कुणीही रेल्वेलाइन ओलांडण्याचे माणसी धाडस करू नये. त्या माणसांनी वागू दे हवं तसं, पण आपण रेल्वे लाइन ओलांडण्यासाठी पुलाचाच वापर करायचा. विशेषत: तरुण, कुत्र्यांना सांगतो, एखादीला इम्प्रेस करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करू नका. लोकलखाली चिरडून फुकट मराल.’

यावर नेता कुत्रा म्हणाला, ‘भेूभूभू... ज्येष्ठ श्वानकाकांचे म्हणणे रास्त असले, तरी तशी चिंता करण्याचे कारण नाही. माणसांसारख्या चुका आपली भटकी कुत्री कधीच करत नाहीत. रेल्वे रुळ ओलांडताना जेवढी माणसं मेल्याच्या बातम्या येतात, तशा कधी कुत्री रूळाखाली सापडल्याचे दिसत नाही. इतकंच काय रस्त्यावरून जातानाही फक्त आपले बांधवच झेब्रा क्रॉसिंगचा वापर करतात, हे मी काही दिवसांपूर्वीच टीव्हीवर पाहिले होते, एका जाहिरातीत. त्यामुळे ही चिंता सोडून आता आपल्याला पुन्हा पूर्वीचे दिवस येतील आणि श्वानजीवन पूर्वपदावर येईल, अशा सर्वांना शुभेच्छा देतो. त्याशिवाय थोडेदिवस रस्त्यावर पडलेले चिकन, अंडी मेलेल्या कोंबड्या खाण्याचे टाळा, कारण तो बर्ड फ्लू आल्याची चर्चा आहे. आपल्याला काही होत नाही तसलं; पण माणसांत राहून वाण नाही पण गुण लागला असं व्हायला नको. म्हणून सांगितलं.’


या सगळ्या सभेच्या गप्पा आणि कुत्र्यांची भूभूभू भुंकत चर्चा चालल्यामुळे स्टेशनवर एका बाकड्यावर झोप काढणारा पोलीस जागा झाला. त्यानं काठी उगारली अन् सगळ्या कुत्र्यांना पिटाळून लावलं. सगळी कुत्री आपापल्या गल्लीच्या दिशेने शेर होण्यासाठी पळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: