रविवार, १० जानेवारी, २०२१

पक्षांचे मृत्यू काय सांगतात?

 जो हौसला रखते हैं आकाश को छूने का,

उन्हें परवाह नही होती हैं गिर जाने की।


पशूपक्षी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात, पण गेल्या काही दिवसांपासून अचानक पक्षी मरताना आढळत आहेत. एकीकडे देशात काही ठिकाणी बर्ड फ्लूची साथ असल्याचे बोलले जात आहे. ठाणे, नागपूर दिल्ली अशा ठिकाणी सातत्याने पक्षी मरत आहेत. याचा नेमका अर्थ काय आहे? याचे नेमके कारण काय आहे, याचा शोध घेतला पाहिजे. विशेष म्हणजे पक्षांवर असे काही संकट किंवा संक्रांत आली आहे असे म्हणावे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागात कबुतरांचे थवे आहेत तसेच आहेत. सध्या सर्वात उपद्रवी आणि रोगांचे वहन करणारा पक्षी म्हणून कबुतरांकडे बोट दाखवावे लागेल. मुंबईतील काही अतिशहाणे लोक भर वस्तीत, गर्दीतही धान्य खायला घालून सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, अशा प्रकारे त्या कबुतरांचे पालन करत असतात. ही कबुतरे आपल्या पंखांतून पिसवा आणि अनेक विषारी घटक पसरवत असतात. कुठेही तारेवर बसून विष्ठा टाकतात की, ती जाणाºया येणाºया लोकांच्या अंगावर पडते. अशी घाण अंगावर पडली की, त्या कबुतरांना खायला घालून पाळणारे लोक विकृत आनंदाने हसतात. तो माणूस अपमानीत होऊन जातो. हे प्रकार आपण नित्य पाहतो, पण अशा उपद्रवी पक्षांना काहीच होत नाही पण कावळे, गिधाडे आणि अन्य पक्षी मात्र मरत आहेत. हे अत्यंत विचित्र वाटल्याशिवाय राहात नाही.

एका शायरनं म्हटलं आहे की, ‘जो हौसला रखते हैं आकाश को छूने का, उन्हें परवाह नही होती हैं गिर जाने की.’ पक्षी हे माणसाला स्वप्न दाखवणारे असतात. स्काय इज द लिमीट, असे अमर्याद स्वप्न दाखवून भरारी घेण्याचे स्वप्न दाखवत असतात. शिकवत असतात. गरूडभरारी घेणे, कावळ्यासारखी नजर असणे, ही चांगली लक्षणे मानली जातात. आपणही अशीच भरारी घ्यायची आहे हे विचार पक्षीच आपल्या डोक्यात घालत असतात. कारण त्यांचा हौसला, निर्धार पक्का असतो. आम्हाला उडायचे आहे या विश्वासावर ते पंख पसरतात आणि लिलया आकाशात फिरतात. आमचे ध्येय साध्य होण्यासाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, आमच्या पंखात बळ येऊ दे. कारण आम्हाला गरूड झेप घ्यायची असते. त्यामुळे हे सगळे पक्षी आपल्या जिवनाशी निगडीत असे आहेत. जे आपल्याला ध्येय दाखवतात ते पक्षी मरत आहेत हे वाईट आहे. पोपटपंची करणारा असो किंवा पोपटासारखा गोड बोलणारा असो पण बडबड करणाºयाला त्याची उपमा देतात. चिऊताईचा घास तर प्रेमाचाच. कोंबडी तर आपला जीव देऊन माणसाची भूक भागवते. आज हे पक्षी मरत आहेत आणि माणसांना उपद्रवी असणारे कबुतरांचे थवे वाढत आहेत, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.


आपल्याकडे कावळ्याचे असे विशिष्ट महत्त्व आहे. एरवी आपण त्याची निर्भत्सना करत असलो तरी माणूस मेल्यानंतर मात्र या कावळ्यांचीच आपल्याला आठवण येत असते. कावळा शिवला की सगळे ठिक. श्राद्ध पक्षालाही आपल्याकडे कावळ्याला घास देण्याची प्रथा आहे. त्या कावळ्याने घास खाल्ल्याशिवाय आपल्या पोटात कितीही भुकेने कावळे ओरडत असले, तरी आपण अन्नग्रहण करत नाही, असे अनेकदा होते. त्यामुळे असे कावळेच जर मरून पडायला लागले तर होणार कसे?

लहानपणापासून आपण मुलांचे संगोपन करताना, त्यांना झोपवताना, जेवायला घालताना गोष्ट सांगतो ती चिऊ आणि काऊचीच. चिऊताई-चिऊताई दार उघड म्हणणारा कावळा हा आपल्या लहानपणापासूनचा सोबती आहे, पण तोच मरायला लागला तर आम्ही करायचे काय? कावळा कितीही काळा असला, तरी त्याचे महत्त्व आपल्या आयुष्यातून वेगळे करता येत नाही. लहानपणी काऊची चिऊची गोष्ट ऐकत शाळेत गेल्यावरही हा कावळा आपला पिच्छा सोडत नाही. शाळेतही आपल्याला बाई गोष्ट सांगतात ती तहानलेल्या कावळ्याचीच, म्हणजे ही गोष्ट पिढ्यानपिढ्या आमच्याकडे दशकानुदशके सांगितली जात आहे, पण त्या कावळ्याची गोष्ट सांगणाºया, रचणाºया लेखकाचा शोध कोणीच घेतला नाही. कारण तळाला असलेल्या पाण्यात दगड टाकल्यावर ते पाणी वर येईल हे आमच्या कावळ्याला कळतं. म्हणजे कोणताही पदार्थ हा आपल्या आकारमानाएवढा पदार्थ पुढे ढकलतो हा भौतिक शास्त्रातील सिद्धांत त्या कावळ्याला माहिती होता. आम्ही उगाचच त्या आर्कीमिडीजच्या युरेका युरेकाचे कौतुक करत राहिलो, पण हाच सिद्धांत कावळ्याने तहान भागवण्यासाठी वापरला होता हे शास्त्र आपण लहान वयात शिकलो याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपल्या जीवनाचा खºया अर्थाने सोबती असलेल्या या कावळ्यांवर हे आलेले संकट चिंताजनकच म्हणावे लागेल. पक्षी का मरून पडत आहेत? कबुतरांसारखे उपद्रवी पक्षी वाढत आहेत. कोंबड्या मरत आहेत, पोपट मरत आहेत, गिधाडे मरत आहेत. हे सगळे उपयुक्त, पर्यावरणाला पुरक प्राणी आहेत. पण मुंबई आणि शहरातून रोगांचा झपाट्याने प्रसार करणारी कबुतरे, पारवे मात्र मोकाट आहेत. ही विसंगती फार वाईट आहे. त्याचा तपास केला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: