सर्व प्रकारच्या भीतीमध्ये सर्वात मोठी भीती म्हणजे बदनामी - चाणक्य
कर्नाटक विधान परिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस. एल. धर्मे गौडा यांचा मृतदेह चार दिवसांपूर्वी रेल्वे रुळाजवळ सापडला. त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरूमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ सापडला. कादूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मे गौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाइड नोटही सापडली आहे. यामध्ये १५ डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. माणूस कशाला भीत असतो तर अपमानाला, बदनामीला भीत असतो. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिसूत्रांमध्ये नेमके हेच सांगितले आहे, सर्व प्रकारच्या भीतीमध्ये बदनामीची भीती जास्त असते. माणूस मरणाला भीतो असे म्हणतात, पण मरणापेक्षाही तो बदनामीला भीत असतो हे ताज्या उदाहरणावरून दिसत आहे.
कर्नाटक विधान परिषदेत १५ डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांकडून एस. एल. धर्मे गौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना खुर्चीवरून ढकललं होतं. धर्मे गौडा या घटनेने अतिशय दु:खी होते. देशभरातील सर्व वाहिन्यांवरून हे दृश्य संपूर्ण देशात पाहिले गेले. त्यामुळे आपल्या या अवस्थेला आपले निकटवर्तीय, आप्त हसतील, त्यांना आपले तोंड कसे दाखवायचे, अशा भावना मनात निर्माण होणे स्वाभाविक असते.
मनुष्य स्वभावच असा आहे त्याला अपमान सांगावा मना आणि सन्मान सांगावा जना असे जगायचे असते. अगदी लहान मूल घसरून पडते तेव्हा रडायला लागते. रडण्याइतके त्याला लागलेले नसते, पण लहान मूल काय किंवा कोणीही घसरून पडला की पाहणारा हसतो, त्याच्या वेदना त्याच्या मनात असतात. आपण पडलो हे जगाने पाहणे हा अपमान वाटतो आणि मूल रडते. तसाच प्रकार धर्मे गौडा यांच्याबाबतीत झालेला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या नियुक्तीचा विरोध करत होते. उपसभापती एस. एल. धर्मे गौडा खुर्चीवर बसताच गोंधळ एवढा वाढला की, काँग्रेस सदस्यांनी त्यांना खुर्चीवरून ढकललं. यावेळी काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. हे सहन न झाल्याने चिकमंगळुरू जिल्ह्यातील गुनसागरच्या काडूर तालुक्यात रेल्वेसमोर उडी मारून जीव देण्याची वेळ एका नेत्यावर आली. हे अत्यंत लज्जास्पद असेच आहे.
आपल्याकडे आत्महत्या का होतात? शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जबाजारी झाल्यावर बँका घरावर जप्ती आणतील, आपण रस्त्यावर येऊ , तोंड कसे दाखवणार, अपमानित होऊ , बदनामी होईल या भीतीने. नापास झालेली मुले अपयशाने खचून जातात ती लोकं नावे ठेवतील, निरुपयोगी ठरवतील, बदनाम करतील, जगाला तोंड कसे दाखवायचे या भीतीनेही आत्महत्या असते. अशीच वेळ एका नेत्यावर येत असेल तर आपण काय करतो आहोत याचा विचार केला पाहिजे.
पण हे प्रकार, अपमानित करण्याचे, बदनाम करण्याचे प्रकार सध्या खूपच वाढले आहेत. चार दिवसांपूर्वी एका आंदोलनात एका अधिकाºयाला धक्काबुक्की करून शर्ट फाडण्याचा प्रकार घडला होता. या आंदोलनात भावना गवळी होत्या. हे दृश्य दिवसभर दाखवले जात होते. त्या अधिकाºयाचा शर्ट खेचून त्याला होत असलेली मारहाण त्या अधिकाºयाच्या कुटुंबीयांनी, आप्तांनी पाहिल्यावर त्यांना काय वाटले असेल याचा विचार कोणीच करत नाही. आसपास होणारी कुजबूज, चर्चा फार वाईट असते. अमूक एक अधिकाºयाला धुतला, चोपला, हाणला, मारला, धोपटला, अशी चर्चा सुरू होतात. हाच तो, तो बघ तो चालला आहे ना त्याला धुतला. रस्त्याने जाताना त्याला तोंडही दाखवणे अशक्य होते. सहकारी कर्मचाºयांसमोर जाणे अशक्य होते. त्यातून तो बॉस असेल आणि शिस्तीचा बडगा हाताखालच्यांना दाखवत असेल, तर ते हाताखालचे कर्मचारी म्हणणार, लई भारी झाले, चांगले धोपटून काढले. हे फार वाईट आहे. कणकवलीला एका आमदाराने गेल्या वर्षी अशाच एका अधिकाºयावर रस्त्यातील चिखलाची बादली ओतली होती. काय चालले आहे हे? जरा आपल्या मनाविरोधात झाले की त्या माणसाला बदनाम करायचे, तोंडाला काळे फासायचे, चिखलफेक करायची. यामुळे माणसे अपमानित होतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. कारण माणूस पैसा नसला तरी मिशीला तूप लावून पोटभर जेवल्याचे दाखवेल, पण गेलेली अब्रू त्याला परत मिळवता येत नाही. सामान्य माणसाकडे पैशापेक्षा अब्रू आणि नाव हेच महत्त्वाचे असते, पण आजकाल बदनामी करण्याचे राजकारण होताना दिसत आहे. त्यामुळे कपडे फाडणे, मारहाण केल्याची क्लीप व्हायरल करणे, काळे फासणे हे प्रकार होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आणि वाईट आहे. उत्साहाच्या भरात कार्यकर्ते करतात, पण त्याचे दुष्परिणाम खूप असतात. एका नेत्याला कर्नाटकात अशाप्रकारे अपमानित होऊ न आत्महत्या करायची पाळी आली, तर सामान्यांची काय अवस्था असेल? असे प्रकार टाळता आले पाहिजेत. हा लोकशाहीचा मार्ग नाही. अॅमेझॉनविरोधात मनसेने आंदोलन केले, पण त्याआधी अॅमेझॉनला कल्पना दिल्याची बातमी का आली नव्हती? मराठी वापर करा असे का सांगितल्याची बातमी मनसेने सोडली? डायरेक्ट तोडफोड करून कार्यालयात ठिकठिकाणी नुकसान करून त्यांना नमवल्याची बातमी घेतली आणि आंदोलन थांबवले. असे केले नाहीत तर आम्ही आंदोलन?????? करू, असा अगोदर इशारा देण्याची गरज असते. अपमानित करण्याची गरज नाही. त्यामुळे हे बदनामी आणि अपमानित करण्याचे प्रकार थांबवणे फार महत्त्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा