शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

रिमेक

 


एखादा चित्रपट दुसºया कोणत्यातरी चित्रपटावरून घेतला आहे, असे आपण सहजपणे बोलतो. पण चांगली रंजक कथानके, स्टोरी आपणही करावी, असे निर्माता, कलाकारांना नेहमीच वाटत असते. त्यातून अन्य भाषांतील चित्रपट आपल्या भाषेत आणण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. मराठी माणसांनी या चित्रपटसृष्टीचा पाया घातला तेव्हा व्ही. शांताराम, प्रभात यांसारख्या कंपन्या एकाचवेळी मराठी आणि हिंदीत चित्रपट बनवत असत, पण कालांतराने प्रत्येक भाषेतील चित्रपटांची खासियत बनली आणि आपल्या मातीतील चित्रपट बनू लागले, पण दुसºया मातीतील कथानके आपल्या मातीत चपखल बनवणे हा प्रकारही जोरात सुरू झाला. त्यामुळे अनेक हॉलिवूडचे चित्रपट बॉलिवूडमध्ये येऊ लागले. अनेक हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीत होऊ लागले. तसेच कित्येक मराठी चित्रपटांचे हिंदीतही चित्रपट येत गेले. यातून आमचा रुपेरी पडदा गाजत राहिला आहे.

‘जेम्स बाँड’च्या बाँड पटाचे हॉलिवूडला एकेकाळी वेड लागले होते. त्यामुळे हिंदीत जितेंद्रच्या रूपाने नवा बाँड आणला गेला. ‘फर्ज’ हा त्यातला पहिला चित्रपट होता, पण त्या मालिकेतील दुसरा चित्रपट ‘बाँड 303’ यायला जवळपास २५ वर्षं लागली आणि तोपर्यंत जितेंद्र हा बाँड न राहता कौटुंबिक, पोषाखी, विनोदी, दाक्षिणात्य चित्रपटातील आणि महिलांना आवडणारा चॉकलेट हीरो बनून गेला, पण जेम्स बाँडचे चित्रपट येतच होते. शॉन कॉनरी, रॉजर मूर असे कालानुरूप जेम्स बाँड 007 बदलत गेले, पण चित्रपट येत राहिले. हे सातत्य हिंदी सिनेमाला जमले नाही. त्यानंतर असाच एक बाँड आणला तो १९७९ च्या दरम्यान. कराटे खेळणारा असा ‘गनमास्टर जी 9’च्या रूपाने. गरीबांचा अमिताभ अशी ओळख असलेला मिथुन चक्रवर्ती अवतरला. ‘गनमास्टर जी 9’ या बाँड नेमने त्याने ‘सुरक्षा’, ‘वारदात’ असे काही चित्रपट काढले, पण नंतर तोही दाक्षिणात्य हिंदी चित्रपटात गुंतला आणि आमचा बाँड संपला.


पण विनोदी आणि कौटुंबिक कथानकांचे चित्रपट जसेच्या तसे काढले किंवा त्यांच्या रिमेक केला तर मात्र आमच्याकडे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो हे सातत्याने दिसून आले आहे. १९८५ साली महेश कोठारे यांनी चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यापूर्वी बालकलाकार ते कलाकार असा त्यांचा प्रवास झाला होता, पण निर्माता म्हणून त्यांनी धुमधडाक्यात ‘धुमधडाका’ने सुरुवात केली. हा चित्रपट ‘प्यार किये जा’ या १९६६ च्या चित्रपटाची रिमेक होती. यात शशी कपूर, मेहमूद, किशोर कुमार, ओमप्रकाश, मुमताज हे कलाकार होते. तुफान विनोदी चित्रपट म्हणून त्या चित्रपटाला त्या काळात यश मिळाले होते. त्याची वीस वर्षांनी मराठी रिमेक महेश कोठारेंनी केली. ‘धुमधडाका’ या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांची चांगली भट्टी जमली. याशिवाय निवेदिता, प्रेमा किरण, सुरेखा राणे या नवोदित अभिनेत्री होत्या. शरद तळवलकर यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर या चित्रपटात बाजी मारली होती, पण या चित्रपटाने रिमेकच्या माध्यमातूेन एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर रिमेक करण्याची चटकच महेश कोठारेंना लागली.

महेश कोठारेंनी आपला पुढचा चित्रपट आणला तो ‘सुपर स्नुपर’ या इंग्रजी चित्रपटाची कथा होती. ‘धुमधडाका’चे यश या चित्रपटाला मिळाले नाही, पण हा चित्रपट चांगला चालला, पण त्यानंतर नव्या कथानकाचे चित्रपट काढायला त्यांनी सुरवात केली, मात्र दोन चित्रपट त्यांनी मराठीतून हिंदीत केले. ते डब केले होते, त्यामुळे त्याला रिमेक म्हणता येणार नाही. त्यामध्ये ‘माझा छकुला’ हा चित्रपट ‘मासूम’ म्हणून हिंदीत काढला होता, तर ‘झपाटलेला’ हा तुफान गाजलेला महेश कोठारेपट ‘खिलौना बन गया खलनायक’ या नावाने काढला, पण रिमेकला प्रतिसाद चांगला मिळाला होता.


दादा कोंडके यांनी हिंदीत चित्रपट काढायचा विचार केला तेव्हा त्यांनी आपल्याच मराठी चित्रपट ‘राम राम गंगाराम’ची रिमेक केली होती. नायक दादा, नायिका उषा चव्हाणला घेऊन ‘तेरे मेरे बीच में’ हा ‘राम राम गंगाराम’चा रिमेक बनवला. मराठीतील द्वयर्थी विनोदांची मजा हिंदीत येत नाही हे दादांना समजले होते. तरी विनोदाचा अस्सलपणा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्यांनी ‘मला घेऊन चला’ या चित्रपटाचाही त्यानंतर ‘आगे की सोच’ नावाने रिमेक केला होता.

१९७० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड असा ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’. या चित्रपटाचा व्ही. शांताराम यांनीच हिंदीत ‘पिंजडा’ नावाचा चित्रपट केला होता. श्रीराम लागू, संध्या ही प्रमुख भूमिका असलेली पात्रं असली तरी अस्सल बिहारी ग्रामीण भागात जाऊन त्याचे चित्रीकरण करून माधोपूरचे वातावरण तयार केले होते. नीळू फुलेंच्या जागी या चित्रपटात राजा गोसावींना हिंदीत संधी मिळाली होती. मराठी ‘पिंजरा’चे यश हिंदी ‘पिंजरा’ला मिळाले नाही, पण चांगल्या प्रकारे रिमेक केला होता.


१९७० च्या दशकातील उत्तरार्धात आलेल्या ‘सासुरवाशिण’ या मराठी चित्रपटाचा हिंदीत ‘सौ दिन सास के’ नावाने रिमेक झाला होता. मराठीत या चित्रपटात ललिता पवार, निळू फुले, आशा काळे, रंजना, कृष्णकांत दळवी, यशवंत दत्त, अशोक सराफ असे कलाकार होते. ललिता पवार आणि निळू फुले यांच्या खल प्रवृत्तीभोवती फिरणारा हा चित्रपट असल्याने यात रंजनाला थोडा वाव होता. मराठीत हा चित्रपट फत्तेलाल यांनी काढला होता. त्याचा रिमेक हिंदीत बनवताना चंदन सदनाह यांनी ललिता पवार आणि निळू फुले यांना त्याच भूमिका दिल्या होत्या. आशा काळेची भूमिका आशा पारेखने केली होती, तर रंजनाची भूमिका रिना रॉयने केली होती. अन्य भूमिकांत अशोक कुमार, राज बब्बर आदी कलाकार होते. हा चित्रपट मराठी आणि हिंदीतही तुफान गाजला होता.

कथानकं चांगली असतील आणि त्याचा आपल्या भाषेत चपखल प्रयोग केला, तर चांगली रिमेक यशस्वी होते हे चित्रपटसृष्टीने दाखवून दिले आहे. चित्रपटसृष्टीत असे असंख्य चित्रपट या ना त्या चित्रपटावरून बनत असतात. ‘रोझा’, ‘बॉम्बे’सारखे कितीतरी दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत बनले आहेत. ते सातत्याने बनत राहणार. कारण रिमेक म्हणजे पुन: प्रत्ययाचा आनंद असतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: