गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

आता वडिलांसाठी टाइमपास


बायकांशी लफडी करणं, थोडंसं प्रेम करणं म्हणजे आयुष्यात टाइमपास आहे असा विचार गेल्या आठ-दहा वर्षांत रूजला आहेच, पण असा टाइमपास आजकाल म्हणे प्रत्येक पिढीला आवश्यक वाटू लागला आहे. अनेक वळणे घेऊन गेली चार वर्षं प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात असलेल्या ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेत आता असाच एक नवा टाइमपास सुरू होताना दिसत आहे. तो म्हणजे सौमित्रचे वडील आणि शनायाची मम्मी यांच्यातील.


प्रेक्षकांनी आपलं डोकं वापरायचं नाही, भावना विचारात घ्यायच्या नाहीत, हे काय दाखवत आहेत याचा विचार करायचा नाही. फक्त दाखवतील ते पहायचं इतकंच या मालिकेचा उद्देश आहे. मुळात बायकांना अत्यंत मूर्ख समजणारी ही मालिका महिलांचे अवमूल्यन करणारी आहे. तरीही इतके वर्षं कशी काय चालू ठेवली आहे हाच प्रश्न आहे. राधिका, शनाया आणि माया तिघींना फसवणारा हा लफडेबाज गुरुनाथ इतक्या वेळा बायकांकडून चोप खातो, तरी सुधारत नाही आणि त्याला कोणी पोलिसांच्या हवाली करत नाही हे कसे काय असू शकते? पण फक्त बायकांशी लफडी जमवणे, अनैतिक संबंध प्रस्थापित करणे आणि टाइमपास करणे हा या मालिकेचा उद्देश आहे. यातील कलाकारही पैसे मिळतात ना मग चालतंय तोवर चालू दे करत काम करत आहेत.

गेल्या चार वर्षांतील कथानक काय? तर राधिकाचा नवरा गुरू. गुरूची मैत्रीण शनाया. राधिकाला हाकलून गुरू-शनाया लग्न करतात. राधिका बिझनेस उभा करते. तो बिझनेस मिळवण्यासाठी गुरू-शनाया प्रयत्न करतात. मध्येच शनाया पोपटरावशी लग्न करते. या कुरघोड्यांना कंटाळून राधिका सौमित्रशी लग्न करते. गुरुनाथ शनायाला सोडतो. गुरुनाथ मायाच्या मागे लागतो. श्रेयस शनायाच्या मागे लागतो. शनाया तिच्या जुन्या बॉयफ्रेंडशी लग्न करते. आता माया गुरुनाथला सोडते. मग श्रेयस मायाशी जमवायचा प्रयत्न करतो. दरम्यान, सोसायटीतील घटस्फोटिता रेवती त्या गुप्तेशी लग्न करते. लग्न केल्यावर गुप्ते गुप्त होतात. सौमित्रशी लग्न केल्यावर राधिकाचा मुलगा गायब होतो. तो सध्या कोण सांभाळत आहे याचा पत्ता नाही. म्हणजे नागपूरला पहिल्या आजोबांकडे आहे? मुंबई-ठाण्यात जुन्या आजीकडे आहे? नव्या आजीबरोबर गायब झाला आहे? नेमका कुठे आहे? पण वधू-वर सूचक मंडळाप्रमाणे लग्न लावणे, मोडणे असा झिम्मा खेळण्यापलीकडे काही या मालिकेत घडत नाही. त्यात आता नवीन कथानक आले आहे. ते म्हणजे शनायाची आई सुलोचना ही सौमित्रच्या वडिलांच्या प्रेमात पडली आहे. चांगला टाइमपास आहे म्हणून सौमित्रचे वडीलही त्याचा आनंद घेत आहेत. अरे काय चालले आहे काय?


सौमित्र आपल्या वडिलांसाठी या टाइमपासची जुळवाजुळव करतो आहे. खरं तर हे पाहून आज म्हाताºयांना वाटले पाहिजे की, आम्हालाही असा सौमित्रसारखा मुलगा असेल तर टाइमपास मिळवून देईल. आता एका पिकनिकला या सुलोचना आणि सौमित्रच्या वडिलांचा धुडगूस असणार आहे म्हणे.

साधारण १९८० च्या दशकात व. पु. काळेंची जनरेशन गॅप म्हणून कथा गाजली होती. त्यात झिंटू आपल्या वडिलांनी कसल्यातरी फालतू कुरूप बाईशी बोलताना पाहून संतापतो आणि त्यांचा चॉइस सुधारण्यासाठी सु च्या देखण्या आईला वडिलांबरोबर जमवण्यासाठी पाठवतो. तोच प्रकार आता सौमित्र करताना दिसतो आहे, पण आमच्या मालिकांचा स्तर आणि स्थर कुठल्या कुठे चालला आहे हे पाहून हसावे की रडावे समजत नाही.


गेली तीन वर्षं ३०० कोटींचा असलेला राधिका मसालेचा व्यवसाय फक्त एका कार्यालयात सगळेजण उभे राहून गप्पा मारताना आणि कुरघोड्या करताना दिसतात. मसाल्याचे विक्रीचे काम करताना कोणीच दिसत नाही. कसा वाढणार बिझनेस? आता या बाई खेडेगावात जाऊन महिलांचे सक्षमीकरण करायला उतरल्या आहेत. सगळ्या स्टाफला बरोबर घेऊन. त्यामुळे मसाला कुटायची सगळीच मुसळं आता केरात गेली म्हणावे लागेल. असे कामधंदे सोडून सगळे आॅफीस फिरायला लागले तर बिझनेस कसा आपोआप चालेल? कसलीही तार्किक सुसंगती नसलेली अशी या मालिकेची ख्याती झाली आहे. फक्त लफडी करणे, पुरुषांनी लफडी करायची आणि बायकांनी त्यांना धोपटायचे. म्हणून खेड्यातील कोण बायकांची काय अडचण आहे, कोणाच्या नवºयाची काय लफडी आहेत यावर आता पुढचे भाग बघायला लागणार आहेत. तोपर्यंत सौमित्रच्या वडिलांचा पूर्ण टाइमपास. कदाचित सौमित्रची आई अचानक येईल आणि आता ही माझ्या नवºयाची बायको म्हणून शनायाच्या आईला स्वीकारेल आणि मालिका संपवतील असे दिसते.

पण एकूेणच या मालिकेचा संदेश काय, तर बायका या टाइमपास करण्यासाठी असतात. एकदा राधिकाला मसाले कुटताना दाखवले की बाकीच्या सगळ्या टाइमपास. त्यामुळे श्रेयस शनायाच्या मागे लागतो, आता मायाच्या लागतो. आनंदचा जेनीबरोबर टाइमपास करता करता लग्न होते. सौमित्र अगोदर राधिकाच्या प्रेमात पडतो, पण राधिका गुरुनाथच्या प्रेमात पडते, कालांतराने राधिकाचा मित्र बनून येतो, शनायाशी टाइमपास करतो, मग तिला बहीण मानून मोकळा होतो. आता आपल्या वडिलांना मस्त टाइमपास म्हणून शनायाच्या आईला घेऊन येतो. हा असला संदेश देणारी ही मालिका महिलावर्ग अत्यंत आवडीने पाहतो आहे याचे आश्चर्य वाटते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: