माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे, चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे//
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभले निवारा, सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा//
- बहिणाबाई चौधरी
सासरच्या मंडळींनी टोमणे मारणे किंवा उपहासात्मक बोलणे हा वैवाहिक आयुष्याचाच एक भाग आहे, अशा निरीक्षणासह नुकतेच मुंबई सत्र न्यायालयाने शहरातील उच्चभ्रूंची वस्ती मानली जात असलेल्या मलबार हिल येथील एका दाम्पत्याला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले. त्यांच्या सुनेने ८० वर्षीय सासरे कांतीलाल गुप्ता आणि ७५ वर्षीय सासू मालती गुप्ता यांच्यावर हे आरोप केले होते, पण टोमणे मारणे हा काही छळवाद नाही असा निर्वाळा दिला हे खरोखरच कौतुकास्पद म्हटले पाहिजे. म्हणजे सासू आणि आई यांच्यातील नात्यांचा फरक बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेतून मांडला होता. माय म्हणताना ओठांची होणारी जवळीक आणि सासू म्हणताना पडणारे ओठांमधील अंतर. या दोन गोष्टींचा फरक लक्षात घेतला तर नाती गोड होतील.
खरं तर टोमणे काय फक्त सुनांनाच सहन करावे लागतात का? ते फक्त सासू-सासरेच मारतात का? प्रत्येकजण दुसºयाला टोमणा मारण्याची संधी शोधतच असतो. राजकारणात तर आपण ते नित्य पाहत असतो. मग अशा टोमणे मारण्याने जर कोणी गुन्हे नोंदवू लागला तर कसे होणार? शेवटी आपल्याकडे भांडत असावं पण नांदत असावं, अशीच म्हण आहे ती योग्य आहे. भांडण झाले, मतभेद झाले म्हणजे काही सर्वस्व संपले असे नाही. टोमणे मारणं हा मनुष्य स्वभाव आहे. तो काही आज सुरू झालेला प्रकार आहे का? प्रत्येक घराघरात दररोज चार-पाच तास टीव्हीपुढे बसून सासवा-सुना ज्या कुरघोडीच्या मालिका पाहतात त्यात टोमणेबाजीशिवाय काय असते? त्यामुळेही एक लाइफस्टाइल आहे असे समजायला हरकत नाही. त्यासाठी कोणत्याही सुनेने सासू-सासºयांना तुरुंगात बसवण्याचा प्रयत्न करणे हे चुकच आहे. म्हातारी माणसं ही नव्या पिढीला बोलणारच, जनरेशन गॅप असते ती. त्यामुळे लगेच त्याचा बाऊ करून चालत नाही. म्हणूनच न्यायालयाने केलेले हे वक्तव्य स्वागतार्ह आहे.
अर्थात ज्या खटल्याबाबत न्यायालयाने ही टिपण्णी केली त्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी होती. आरोपकर्त्या महिलेने केलेले हे आरोप पाहता या सहज होणाºया गोष्टी आहेत असेच त्याचे विश्लेषण करण्यात आले. विशेष न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी, (सुनेला) सासू-सासºयांनी उपहासात्मक बोलणे आणि टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचाच एक भाग आहे. सर्वच कुटुंबांमध्ये हा प्रकार घडतो. त्यामुळे ८० आणि ७५ वर्षांच्या या सासू-सासºयांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येऊ नये, असा निर्णय सुनावला. हा एक चांगला कौटुंबिक निकाल होता. या वयात का त्या म्हातारा-म्हातारीला तुरुंगात बसवणार आहात?
आपल्याकडे प्रत्येक संस्कृतीत सासवा-सुनांची भांडणे, वाद यावर खेळ आहेत. भोंडल्यासारख्या कितीतरी सांस्कृतिक कार्यक्रमांत सासवा-सुनांची भांडणे, टोमणे मारणे हा खेळाचा भाग आहे. माझ्या पाटल्या चोरल्यास का गं? म्हणून हातात लाटणी घेऊ न खेळला जाणारा खेळ, यादवराया सुनबाई रुसून बसली कैसी... सारखी लोकगीते काय सांगतात? सासू-सासºयांशी, नवºयाशी होणारे भांडण हा गुन्हा ठरवला जातो. अत्याचार ठरवला जातो, पण महिलांनी लक्षात घेतले पाहिजे आपण आपल्या भावाशी, बहिणीशी, आईशीही भांडत होतोच ना? तेव्हा आईवडीलही टोमणे मारत होतेच ना? त्यामुळे कौटुंबिक भांडण हा जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकारले पाहिजे. ते जिंकण्यासाठी केलेले युद्ध नाही याचे भान ठेवले, तर संसार सुखाचा होतो.
सगळ्या गोष्टी जर माहेरसारख्याच असतील तर त्या लग्नाला तरी काय अर्थ आहे? सासर आणि लग्नानंतरचे वेगळेपण जगता आलेच पाहिजे. आई ती आई आणि सासू ती सासूच. माहेर ते माहेर आणि सासर ते सासर. दोन्हींची तुलना कधीच करता कामा नये. तुलनेने माणूस दु:ख जवळ करत असतो. आयुष्य म्हणजे काय पोशाखी जीवन नाही. त्यात वैविध्य असले पाहिजे. आज आपण सून असलो तरी उद्या आपण सासू असणार आहोत हे काळाचे चक्र लक्षात घेतले पाहिजे. या काळाच्या चक्राला नाकारणे म्हणजे न्यायालयात वाद जाणे. संसार हा सामंजस्याने करायचा असतो. लग्न हे काही फक्त मुलगा आणि मुलगी यांचे होत नसते, तर तो दोन कुटुंबांचा जोडलेला दुवा असतो. दोन्हींचे स्वतंत्रपण, वेगळेपण जपण्यातच खरी रंजकता आहे. सासरी सगळं सुखात आहे, सून आमची लेक आहे हे छापील संवाद आहेत, पण दोन्हींत फरक असलाच पाहिजे तरच जगण्याला अर्थ आहे. मिळमिळीत आयुष्य जगण्यात काय मजा? सासू-सासºयांनी टोमणे मारले म्हणून काही अंगाला भोकं पडत नाहीत आणि आई-वडिलांनी टोमणे मारल्याने शिंग फुटत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा